Story of When the king gets scared…

Story of When the king gets scared… : बादशहा घाबरतो तेव्हा… गोष्ट.

1 min read

Story of When the king gets scared… : बादशहा घाबरतो तेव्हा… गोष्ट.

एकदा बादशहा अकबराच्या स्वप्नात एक राक्षस आला. त्याने घाबरून आपल्या शयनकक्षा-भोवतीची सुरक्षा वाढवली. असं असूनही परवा त्याच्या स्वप्नात एक वाघ आणि सिंह आले. ते दोन्ही धिप्पाड प्राणी आपणास खाऊन टाकतील, अशी अकबरास भीती वाटली. त्यामुळे ते स्वप्नातच जोरजोरात ओरडू लागले, वाचवा वाचवा, मला वाचवा, वाघ सिंहापासून वाचवा.

बादशहाच्या या ओरडण्यामुळे सुरक्षा सैनिक धावत शयनकक्षात आले. अकबर आपल्या मंचकावर थरथर कापत बसले होते.

‘खाविंद, काय झालं? आपण असे कां ओरडलात?’

‘ओरडणार नाही तर काय करणार? माझ्या स्वप्नात वाघ आणि सिंह आले होते. ते मला खाणार होते.’ बादशहा त त प प करत सैनिकांवर डाफरले.

त्या परिस्थितीतही एका सैनिकास हसू आले.

‘हसतास काय ? तुझ्या समोर वाघ आणि सिंह येतील तेव्हा समजेल तुला… कशी फे फे फे होते ते !’

‘क्षमा असावी खाविंद, पण वप्नातल्या सिंह आणि वाघास असं घाबरायचं नसतं. खरे सिंह आणि वाघ आपल्या शयनकक्षात प्रवेश करण्याची हिम्मतच करू शकत नाहीत.’ तो सैनिक कसाबसा बोलला.

‘ते मला काही माहीत नाही. ताबडतोब आपल्या साम्राज्यातील वाघ-सिंहांना ठार करा… आत्ताच्या आत्ता.’ अकबर गरजले.

‘पण खाविंद, इतक्या रात्री कसं शक्य आहे ते?’

‘ते वाघ-सिंहसुद्धा रात्रीच माझ्या स्वप्नात आले होते ना. तेव्हा त्यांना रात्रीच शिक्षा झाली पाहिजे.’

‘पण खाविंद…’

‘मुर्खा, तू हिंदुस्थानच्या सर्वसमर्थ बादशहास दुरुत्तर देतोस. सैनिकांचं काम आदेश पाळण्याचं असतं, इतकंही तुला ठाऊक नाही,’ असं म्हणून रागावलेल्या बादशहाने आपली तलवार काढली. त्या सैनिकावर वार करणार तोच, त्यांच्या आईंचा आवाज शयनकक्षात घुमला.

‘अकबरा, अरे हा काय वेडेपणा चाललाय तुझा? एकतर मध्यरात्री तू ओरडतोस आणि आमच्या सगळ्यांची झोपमोड करतोस. जे तुझे संरक्षण करतात त्यांच्यावर तलवार चालवतो. अकबरा, तू कशासाठी इतका आरडाओरडा करत होतास, सांग बघू,’ आई म्हणाल्या.

also read : Don’t do to earth Gas-chamber… in Marathi

‘तेव्हा अकबराने स्वप्नात आलेल्या वाघ- सिंहापासून ते प्रत्यक्षात वाघ-सिंहाना ठार करण्यापर्यंतच्या आदेशाचा घटनाक्रम सांगितला.

‘अरे वेड्या, हे तुझे सैनिक सांगताहेत तेच बरोबर ना. एवढ्या रात्री जंगलात जाणं धोक्याचं नाही का? सकाळ झाली की दरबारात जा. सगळ्यांसोबत सल्लामसलत कर आणि मग तुला जे काही करायचं ते कर? आता झाला तो एक वेडेपणा पुरे, दुसरा करू नकोस.’

‘अम्मीजान, तुम्ही म्हणता तसंच उद्या दरबारात सर्वांच्या सल्ल्याने निर्णय घेतो.’

आपले प्राण वाचवल्याबद्दल सैनिकाने आईंचे आभार मानले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच अकबराने दरबार बोलावला. अकबराने काल रात्री घडलेली घटना त्यांना सांगितली आणि त्याचा निर्णयही सांगितला.

खाविंद, तुमचा निर्णय अगदी बरोबर आहे.’ एक दरबारी म्हणाला. ‘कोण ते यश्चवकिंचित वाघ – सिंह, सर्वश्रेष्ठ अशा बादशहाच्या स्वप्नात येऊन त्यांची झोपमोड करण्याची हिम्मत तरी कशी करू शकतात?’ दुसरा दरबारी म्हणाला. ‘याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे, खाविंद.’ तिसरा म्हणाला. ‘आपला निर्णय योग्यच आहे खाविंद.’ चौथा म्हणाला.

सर्वजण अकबराच्या निर्णयास सहमती दर्शवत होते. मात्र बिरबल काहीच बोलत नव्हता.

‘बिरबला, तुला काहीच सांगायचं नाही का?’ त्याच्याकडे कटाक्ष टाकत अकबर म्हणाले.

बिरबल काही बोलणार, तोच प्रधानजी उत्तरले,

‘खाविंद, बिरबल बोलला नाही याचा अर्थ, तो तुमचा निर्णय कसा चुकीचा आहे, हे सांगणार. त्याला तशी सवयच लागलीय सर्व दरबाऱ्यांच्या विरोधात जाऊन बोलण्याची.’

‘अहो प्रधानजी, मी आपण होऊन तर काही माझं मत देत नाही ना. खाविंद विचारतात तेव्हा मला जे योग्य वाटतं ते मी सांगतो. त्याचं काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं. मी कधी कोणत्याही दरबाऱ्यांच्या विरोधात गेलो नाही.’ बिरबलाने आपली भूमिका मांडली.

‘अहो प्रधानजी, आम्ही बिरबलास बोलायला सांगितलं असताना, तुम्ही मध्ये कशाला बोललात. बिरबल जे काही सांगतो ते योग्यच असतं, हे काय आम्हास कळत नाही. तुम्ही फक्त आम्ही खूष व्हावे एव्हढंच बघता.’ अकबर प्रधानजीकडे जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाले.

काहीही केले तरी बादशहावरची बिरबलाची मोहिनी जात नाही, असं स्वतःशी पुटपुटत आणि चरफडत प्रधानजी खाली बसले. अकबराने बिरबलास बोलण्यास सांगितलं.

‘खाविंद, सर्व वाघ-सिंहांना ठार करण्याचा याचा निर्णय घेण्याआधी तुम्ही मला एका गोष्टीबद्दल खरं खरं सांगाल का?’

‘म्हणजे काय?’ बादशहा म्हणाला.

‘खाविंद, तुमच्या स्वप्नात आलेले वाघ-सिंह तुम्हास खरोखरच खाणार होते का? त्यांनी तशी काही कृती केली का?’

‘नाही म्हणजे…त्यांनी काहीच केलं नाही. ते दिसताक्षणीच मी घाबरलो आणि जागा झालो.’ अकबर म्हणाला.

‘म्हणजे, याचा अर्थ ते तुम्हाला ठार करण्यासाठी आले नव्हते. बरोबर ना.’

‘तुला म्हणायचं तरी काय?’

‘खाविंद अहो, आपला जसा या भूमीवर हक्क आहे, तसाच वाघ-सिंहाचाही आहे ना. वाघ-सिंह आहेत, म्हणून आपलं जंगल सुरक्षित आहे. जंगल सुरक्षित आहे म्हणून जमिनीची धूप होत नाही. पावसाळ्यात ढगांना अटकाव होतो. मग पाऊस पडतो. नदी-नाले पाण्याने भरून जातात. पाणी म्हणजे जीवन हे तर तुम्ही जाणताच ना. ज्या वाघ- सिंहामुळे हे शक्य होतं त्यांना ठार करणं पटतंय का तुम्हास ?’

‘बघा बघा, खाविंद, मी मघा म्हणालो ना, हा तुमच्या निर्णयाच्या विरोधात बोलणार म्हणून. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवायची बिरबलास फार हौस आहे. हा घ्या त्याचा पुरावा.’ प्रधानजी जागेवरुन उठून बोलले.

‘खामोश!’ अकबर गरजले.

अकबराच्या या गरजण्याने प्रधानजी थरथर कापू लागले. अकबराची क्षमा मागून ते आसनस्थ झाले. अकबराने बिरबलास त्याचे म्हणणे पूर्ण करण्यास सांगितले.

‘खाविंद, आपल्या जंगलात वाघ-सिंह खूप आहेत. पण त्यांना शोधणार कुठे? आपण गेलो की ते हजर होतील असे, नाही ना. मग तुम्ही म्हणाल, जंगल कापून काढा.’

‘बरोबरच आहे. त्यांना ठार करायचं तर मग जंगल कापायलासुद्धा आपण मागेपुढे पाहायला नको.’ दुसरा एक दरबारी म्हणाला.

‘म्हणजे आपण जंगल कापण्याची एक चूक आधी करणार आणि नंतर वाघ- सिंहांना ठार करण्याची दुसरी चूक करणार. खाविंद अहो, जंगल कापलं तर आपले राज्य वाळवंट होईल वाळवंट. जंगल संपलं की समृद्धी गेलीच म्हणून समजा.’

‘बिरबला, तू म्हणतोस ते खरंही असलं तरी, माझ्या स्वप्नात येऊन माझी झोपमोड करणाऱ्या वाघ-सिंहाला शिक्षा तर झालीच पाहिजे.’ अकबर म्हणाले.

‘खाविंद, अहो ते तुमच्या स्वप्नात कशासाठी आले होते, याचा आधी शोध घ्यायला नको का? त्यांना काही सांगायचं असताना तुम्ही भिऊन जागे झालात. तेव्हा त्यांची संधी गेली.’

‘बिरबला, तू काहीतरी असं कोड्यात बोलतोस नि मग आम्हाला त्यात अडकवून टाकतोस. सरळ सरळ बोल ना.’

‘अहो खाविंद, त्या वाघ-सिंहांना कदाचित हे सांगायचं असेल ना, की तुम्ही म्हणजे बादशहा अकबर, हे वाघ-सिंहासारखा समर्थ शक्तिशाली असताना गेल्या आठवड्यात स्वप्नात येऊन गेलेल्या एका क्षुल्लक राक्षसास घाबरतात तरी कसे ?’

‘असं म्हणतोस,’ अकबर प्रसन्न मुद्रेने म्हणाला.

‘दरबाऱ्यांनो, आपले बादशहा आहेत ना वाघ- सिंहासारखं सामर्थ्यशाली.’ बिरबलाने सर्व दरबाऱ्यांना विचारलं. सर्वांनी एका सुरात ‘हो’ म्हटलं. ‘तर मग आपल्या खाविंदाच्या सामर्थ्याचं जिवंत प्रतीक असलेल्या वाघ-सिंहांना ठार करणं शहाणपणा की मूर्खपणा?’ बिरबलानेच पुन्हा दरबाऱ्यांना विचारलं.

यावर दरबारात स्मशान शांतता पसरली. वाघ-सिंहांना ठार करणं हा तर शहाणपणा नव्हता. पण मूर्खपणा म्हटलं तर बादशहाचा अपमान! अशा कात्रीत सर्व दरबारी सापडले. आपण भलतंच काहीतरी बोलून चुकलो, हे बिरबलच्याही लक्षात आलं. त्याने मान खाली घातली. काही क्षण असेच गेले.

‘मूर्खपणा!’ बादशहा जोराने म्हणाले आणि खो खो हसू लागले. या हसण्याने दरबारातील तणाव कुठल्या कुठे पळून गेला.

Share This News

ताज्या बातम्या

Leave a Comment

आमच्या विषयी

Hello Beed मध्ये आपले स्वागत आहे. बीड शहरातील ताज्या बातम्यांचे हे आपले विश्वसनीय ठिकाण आहे. आम्हाला तुमच्यापर्यंत अचूक आणि वेळेवर बातम्या पोहोचवायच्या आहेत. आजच्या वेगवान जगात अद्ययावत राहणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला बीडमधील बातम्या, सरकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती देतो.