Don’t do to earth Gas-chamber… in Marathi : नका करू धरतीला गॅसचेंबर… गोष्ट.
सुनिधी होमवर्क करत होती आणि बाबा पेपर वाचत होते. बाबा म्हणाले, ‘सुनू, अभ्यास नंतर केलास तरी चालेल. उद्या सुट्टीच आहे.’ सुनिधीला आश्चर्य वाटले.
‘पण उद्या रविवार नाहीये बाबा. कुठला सण आहे का? कशाची सुट्टी ?’
बाबांनी पेपर बाजूला केला आणि ते म्हणाले, ‘अग, तसं नाही. सण- बिण नाही, बातमी आहे की इथं, आपल्या दिल्लीत प्रदूषणाची पातळी खूपच वाढली आहे. ir Quality Index म्हणजेच QI ३०० च्या वर गेला आहे, म्हणजे खूपच धोकादायक आहे. म्हणून शासनानं शाळांना सुट्टी दिली आहे.’ सुनिधीला फारसं काही कळलं नाही, पण सुट्टीच्या बातमीनं ती खूपच खूष झाली आणि मैत्रिणींबरोबर काय काय मजा करायची याचे प्लॅन करू लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच सुनिधी फिरायला बाहेर पडली. पण सगळीकडं दाट धुकं पसरलं होतं आणि तिला फारच अस्पष्ट दिसत होतं. थोडे दूर जाताच तिचे डोळे चुरचुरू लागले आणि घशात आगही होऊ लागली. तिला नीट श्वास घेता येईना आणि ती जोरजोरात खोकू लागली.
‘अगं, कशाला आलीस बाहेर एवढ्या प्रदूषित हवेत? असं फिरणं फार धोक्याचं आहे, माहीत नाही का तुला?’ अनोळखी आवाज ऐकून सुनिधी डोळे चोळत इकडे तिकडे बघू लागली.
‘कोण आहे? मला नीट दिसत नाहीये.’
त्या धुक्यातून हलके-हलके एक अस्पष्ट, पण मानवासारखी आकृती तयार झाली आणि म्हणाली, ‘मी आहे मी, म्हणजे ही दूषित हवा. आत्ता यावेळी माझा QI ३०० पेक्षा जास्त आहे, म्हणजे हे वातावरण खूपच धोकादायक आहे. अशावेळी लहान मुलं, आजी-आजोबा आणि आजारी लोकांनी घरातच बसलं पाहिजे. कळलं? जा बरं घरी.’
सुनिधी म्हणाली, ‘अरे बापरे ! हवा आहेस तू? किती काळपट दिसते आहेस. फारच भयंकर दिसतेय तुझी परिस्थिती आणि तुझ्यामुळे आमचीही. पण हे QI म्हणजे काय? बाबापण सांगत होते काहीतरी.’
‘होय गं.. बरं, हे QI म्हणजे ir Quality Index. इथं भारतात सप्टेंबर २०१४ पासून राष्ट्रीय प्रदूषण मंडळानेही मोजमाप ठेवायला सुरुवात केली आहे. यामध्ये आकडे आणि रंग वापरून माझी म्हणजे हवेची गुणवत्ता मोजतात.’
‘हो का? मला याबद्दल अजून सांग ना.’
‘हां, ऐक. QI जर० ते ५० दरम्यान असेल तर हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण असते आणि ती गडद हिरव्या रंगाने दाखवतात. QI जर ५० ते १०० असेल तर समाधानकारक स्थिती आणि या स्थितीचा रंग फिकट हिरवा. १०१ ते २०० ही रेंज थोडं प्रदूषण दाखवते आणि याचा रंग आहे पिवळा. २०१ पासून ३०० पर्यंतची स्थिती अनारोग्याची, जास्त प्रदूषित आणि याचा रंग केशरी रंगाने दाखवतात. त्यानंतर ३०१ ते ४०० म्हणजे भयानक प्रदूषित हवा आणि याचा रंग रक्तवर्णी लाल. त्यापुढची पातळी म्हणजे अतिप्रदूषित, अति गंभीर आणि या रेंजचा रंग मरून.’
‘OK… हे लक्षात आलं माझ्या. पण हे QI कसं मोजतात?’
‘ते हवेतल्या ८ घटकांवर अवलंबून असतं. तुला माहीत असेल ना, नायट्रोजन डाय ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, ओझोन, अमोनिया, लेड आणि काही लहान, अतिसूक्ष्म कण हवेत असतात. हे घटक वासाबरोबर फुफ्फुसात जातात आणि शरीराला अपाय करतात.’
‘पण हे छोटे कण कसे घुसतात हवेत?’ सुनिधीचे प्रश्न सुरूच होते.
मानवरूपी हवा म्हणाली, ‘धूळ, कचरा जाळणे, कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणारा धूर यांमुळे हे कण हवेत मिसळतात आणि श्वासाबरोबर छातीत शिरतात. हे म्हणजे, बरं का, २०-२२ सिगारेटी एकदम जाळल्यावर जेवढा धूर होतो, तेवढा…! भयंकर धोकादायक. ह्या प्रदूषणाचा सगळ्या प्राण्यांना, वनस्पतींना आणि सगळ्या वातावरणालाही त्रास होतो.’
‘बापरे ! फारच सिरीयस आहे हे. पण हे प्रदूषण रोज-रोज कसं काय वाढत जातं?’
‘कारण कारखाने आणि फॅक्टऱ्या वाढताहेत ना आणि त्यांच्या चिमण्यांमधून जास्त-जास्त धूर बाहेर पडत आहे. शिवाय तुम्ही माणसं प्लास्टिक, कचरा, फटाके जाळणं काही थांबवत नाही. त्यामुळे सुद्धा प्रदूषण वाढतं. आणि वाटेल तशी, विचार न करता झाडं तोडणं आणि नवीन झाडं न लावणं हीही कारणं आहेतच.’
‘हो, बरोबर, मी वाचलं आहे सायन्सच्या पुस्तकात… झाडं दूषित हवा शोषून घेतात, ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि प्रदूषण कंट्रोल करतात. हो ना?’
‘अगदी बरोबर. झाडं हवेतला कार्बन शोषतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू, झाडे ही नैसर्गिक प्युरीफायर, शुद्धीकारक आहेत, पण माणसं झाडे तोडतात आणि ही शुद्धीकरणाची क्रिया मंदावते. एका माणसाला एका दिवसाला ५०० लिटर ऑक्सिजन लागतो आणि पूर्ण वाढलेलं एक झाड रोज ३०० लिटर ऑक्सिजन बाहेर टाकतं.’
‘म्हणजे आपल्याला सगळीकडे जास्तीत जास्त झाडांची गरज आहे. जितकी माणसं जास्त, त्यापेक्षा जास्त झाडं हवीत, बरोबर ना?’
‘हो, बरोब्बर, प्रदूषणामुळे माणसं, पशु-पक्षी मरू शकतात. तुला भोपाळची वायू दुर्घटना माहीत आहे का? २ डिसेंबर १९८४ मध्ये घडली, ती अति भयानक औद्योगिक दुर्घटना. कारखान्यातून मिथिल आयसो सायनाईड या विषारी रसायनाची गळती झाली आणि हजारो माणसं मेली, हजारो माणसं अपंग झाली…! आजही अंगावर काटा येतो त्या आठवणीनं.’ हवेचाही आवाज गहिवरला. सुनिधीला काही सुचेना.
also read : Story of The Chocolate Factory
त्या घटनेची स्मृती म्हणून आणि प्रदूषणावर नियंत्रण यावं, जनजागृती व्हावी म्हणून २ डिसेंबर हा दिवस ‘प्रदूषण नियंत्रण दिवस’ म्हणून आपण साजरा करतो. भाषणं, मोर्चे निदर्शनं, वृक्षारोपण असे कार्यक्रम करून जनजागृती करतात.
‘ही गंभीर समस्या अजून कशानं कमी होईल?’ सुनिधीने विचारलं.
हवाही गंभीरपणे बोलू लागली, ‘हे बघ, पहिल्यांदा औद्योगिक प्रदूषण नियंत्रित केलं पाहिजे. रस्त्यांच्या कडेला झाडं लावली पाहिजेत. वाहनांचा वापर कमी केला पाहिजे. CNG आणि बॅटरीवरची वाहनं चालवली तर फार मदत होईल. झाडं न तोडणं, कचरा, प्लास्टिक न जाळता त्यांचा पुनर्वापर करणं, हेही चांगले उपाय आहेत. बरं का सुनू, ही वेळ आहे आपल्या देशातली शक्तीसाधनं आणि पेट्रोलियम उत्पादनं वाचवण्याची. प्रत्येक वस्तूचा पुनर्वापर हा अतिशय उत्तम मार्ग आहे. आणि हे सर्व तुम्ही लहान मुलांनी आतापासूनच करायचं आहे.’
‘मी सायकल वापरते शाळेत जाताना. बाबा आठवड्यातून दोनदा सायकलने ऑफिसला जातात आणि आई वेगवेगळी झाडं लावते, त्यांची काळजी घेते.’ सुनिधीला हे बोलताना फार अभिमान वाटला.
‘व्हेरी गुड. असंच प्रत्येकाने केलं पाहिजे. सुनू, तू तुझ्या मित्रमैत्रिणींना, सर्वांना हे सगळं नीट समजावून सांग. या धरतीला, आपल्या पृथ्वीला, या देशाला आणि आपल्या दिल्लीला गॅसचेंबर होऊ देऊ नका. जर प्रदूषणाची पातळी अशीच वाढत राहिली तर तुम्हाला तोंडाला कायम मास्क वापरावे लागेल आणि ऑक्सिजनचे सिलेंडर पाठीवर कॅरी करावे लागेल.’
‘बापरे! किती कठीण होईल मग सगळंच…! नाही, नाही, आम्ही मुलं यासाठी नक्की प्रयत्न करू. मी सांगते सगळ्यांना काळजी घ्यायला.’ सुनिधी निर्धाराने म्हणाली.
तोच सुनू, अशा खराब हवेत बाहेर जायचं नसतं. चल, घरात ये… असा बाबांचा आवाज ऐकून सुनिधी म्हणाली, ‘हो बाबा, आलेच.’ जाता जाता तिनं वळून बघितलं, ती आकृती हळूहळू अदृश्य होत हवेत विरून गेली. तिच्याकडे बघून हात हलवत सुनिधी मनाशी काही ठरवत घरात शिरली.
Leave a Comment