Story of Let us go wave : चलो तरंग गाव गोष्ट.
माझा मुलगा सकाळी सकाळी मैदानावरून क्रिकेट खेळून येताना घरात धावत धावत शिरला. अतिशय आनंदाने ओरडून मला म्हणाला, ‘आई, चल आवर लवकर. आम्हाला म्हणजे मी, सुध्या, मन्याला तरंग गावात तरंग मैदानावर क्रिकेट खेळायला जायचे आहे. आमची पुण्यातून निवड झाली आहे. अनायसे तुझी तरंग गावात सैर होईल. तारे, ग्रह, नक्षत्र विरुद्ध पृथ्वीवरील काही जिल्ह्यांतील मुले अशी टीम आहे.’ मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी त्याला काही विचारण्यापूर्वीच मला तो म्हणाला- ‘लवकर आवर. शंभर प्रश्न नकोत. आपल्याबरोबर सुध्या, मन्याची आईसुद्धा आहे.’ मी म्हटले, अरे खायला-प्यायला तरी घेऊ का, हे ऐकायलासुद्धा तो थांबला नाही. मला म्हणाला ‘मी उबरवर यान- व्हॅन बुक केली आहे. आता येईलच.’
खरेच नंतर थोड्याच वेळात यान व्हॅन आली अगदी आपल्या व्हॅनसारखीच. वेगळे काहीच वाटले नाही. गुगल मॅपवर लावलेल्या मॅपप्रमाणे आम्ही तरंग मैदानावर वेळेत पोहोचलो.
ढगांचे डोंगर, घाट, बोगदे, ढगांचे स्पीड ब्रेकर पार करत आम्ही आभाळ राज्यातील तरंग गावात पोहोचलो. काय सांगू किती मज्जा आली मला प्रवासात. तरंगत्या गावात ढगांच्या घरांना ढगांच्या भिंती, ढगांचेच छप्पर, त्यावर चमचमणारी रेखीव नक्षी. काय दिसत होती घरे अप्रतीम.
तरंग मैदानावर टीममध्ये बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून ग्रह; तर सूर्य, मित्रक, श्रवण तारे, स्वाती, रोहिणी नक्षत्र यांची वर्णी लागली होती. क्रिकेटचे स्टेडीयम ग्रह, तारे, नक्षत्र यांनी खचाखच भरले होते. तरंग गावातील माणसेही हजर होती. ध्रुवतारा पंच होता. ग्रह, ताऱ्यांच्या टीमचा कॅप्टन सूर्य होता. आमचा कॅप्टन माझा मित्र सुध्या होता.
टॉस सूर्याने जिंकला व मॅच जोरदार सुरू झाली. मैदानावर प्रथम आलेले शुक्र, शनी मस्तच खेळले. सूर्याचा स्टॅमिना सॉलीड होता. माझ्या मुलांच्या पृथ्वी टीमची बॉलिंग सॉलीड पडत होती. सूर्यानंतर खेळायला आलेल्या मंगळाचा स्कोअर झिरो झाला. तो रागाने लालेलाल झाला आणि नंतरचा खेळाडू नेपच्यून याला त्याने मैदानावर यायला मना केले. तेवढ्यात मैदानावरील हवामान बदलले. पाऊस भुरभुर सुरू झाला. ध्रुवपंचाने मॅच बंदची घोषणा केली.
आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही तिथे असलेल्या तरंग गावातील चंद्राच्या ग्रह या प्रसिद्ध हॉटेलमध्ये खाण्यासाठी गेलो. तिथे गरमागरम बटाटेवडा, भेळ, केक, मसाला दूध, चहा असे पदार्थ खाण्यासाठी होते. माझ्या गप्पीष्ट मुलाने चंद्राला बोलते केले. विचारले, इथे हॉटेल चालते का चांगले? कल्पना कशी आली इथे हॉटेल काढण्याची ? चंद्र म्हणाला- मी पृथ्वीवर बघतो ना दररोज रात्री. कोजागिरी पौर्णिमेला तर रात्री सारी माणसे जागरण करतात. एकत्र जमून मजेने वेगवेगळे पदार्थ – भजी, बटाटेवडे, भेळ खातात. मसाला दूध पितात.
रात्रभर जागून तरंग गावात पहारा क्रण्याच्या कामाचा मला कंटाळा आला होता. वाटले- चला आपणही हॉटेल सुरू करून पाहूया. धंदा चांगला चालला तर चांगले पैसे मिळतील, तेवढाच कामात बदल होईल. माझ्या या हॉटेलमुळे चांदण्यांनाही काम मिळाले. दिवसा त्या शाळेत जातात. रात्री माझ्या हॉटेलमध्ये काम करतात. आता मस्त चालले आहे हॉटेल.
also read : Information on Raksha Bandhan In marathi
रोजच सर्व ग्रहांची, गि-हाइकांची वेगवेगळ्या पदार्थांची ऑर्डर असते मला. शुक्राची ऑर्डर असते. स्पेशल बटाटेवडा हवा. मंगळापेक्षा रंगाने तांबूस तळलेला खमंग बडा, तर बुधालाही केक आवडतात त्याची स्पेशल ऑर्डर असते. शनीभोवती कड्या असतात, तशा चॉकलेट क्रीमच्या कड्यांची नक्षी असलेला केक हवा. त्यात दूधगंगेतील पांढरेशुभ्र दूध आटवून मसाला दूध, चहाही बनवतो.
चंद्राचे बोलता बोलता काम, धावपळ चालू होती. चंद्र ग्रह म्हणाला- पार्सल सेवा सुरू केली आहे. शुक्र, बुधा बरोबरच काही नक्षत्र, ताऱ्यांची ऑर्डर पोहोचवायची आहे. तेवढ्यात हरिणांची गाडी आली. त्यात असणाऱ्या ससुल्यांकडे चांदण्यांनी गिऱ्हाइकांची ऑर्डरची पार्सल सुपूर्द केली.
आम्ही बिलाचे पैसे गुगलपे करून निघालो. चंद्र म्हणाला- आलाच आहात तर आमच्या गावातील आभाळ राज्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहून जा. त्याने आमच्या बरोबर गाईड दिला. त्याला सांगितले- तरंग खरेदी बाजार दाखव. आभाळ राज्यातील तरंग गावातील माणसे विचित्रच होती. छोटी, बुटकुली, निळी, जांभळी माणसे, त्यांच्या डोक्यावर छोटी काळी काळी शिंगे होती. त्यांची भाषा समजत नव्हती; पण आमचे काही अडले नाही. खुणेच्या भाषेवर सारे चालून गेले.
गाईडने आम्हाला देवांचे महाल, त्यांची विविध आयुधे असलेले संग्रहालय, नक्षत्रांची झुंबरे, इंद्राचा रथ, कल्पवृक्षाचे झाड, स्वर्गनगरी, पांढऱ्याशुभ्र दुधाची खळखळ वाहणारी दूधगंगा, पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरलेली काठावरची आहे, उगांची देवळे दाखवली. ते सारे पाहून डोळयांचे पारणे फिटले. अप्सरांचे मृत्यही पाहिले. नंतर तरंग खरेदी बाजारात पोहोचलो. तिथे आपल्या सारखीच दुकाने होती. दुकानांत सुंदर सुंदर वस्तू विकायला होत्या. इंद्रधनुचे झुले, ढगांचा पांढराशुभ्र कापूस, हत्ती, घोडे, उंट असे मऊमऊ टेडी, निळी-पांढरी, आकाशी मऊ मखमल, त्यांच्या विणलेल्या माळा, बांगड्या, ठूल, फुले. त्यांचा सूर्यपिवळा, सूर्यकेशरी, सूर्यलाल रंग एक ना अनेक मोहक गोष्टींनी बाजार भरला होता. मी मखमखलीच्या बांगड्या, माळा, कानातले मॅचिंग सेट घेतले.
दुकानात असलेल्या पाट्यांवर लिहिले होते- येथे वर्षा ऋतूत पावसाच्या धारांसोबत गारा, श्रवणात इंद्रधनुचे झुले मोफत मिळतील; तर चंदेरी वेली तर सर्वच वस्तूंवर मोफत होत्या.
आम्ही आनंदाने परत निघालो. वाटेत तरंग गावातील चंद्राची ग्रह बँक, त्यात काम करणाऱ्या नटलेल्या चांदण्या मुली पाहताना गंमत वाटत होती. त्यांचा चुटपुटीतपणा थक्क करणारा होता.
चंद्राचा निरोप घेताना चंद्र म्हणाला- या परत आमच्या गावात. पृथ्वीवरील माणसे इथे आली, तर आमचा धंदा अजून छान चालेल. मी खूप कष्ट करून पैसे कमावले, चांदण्या मुलींना कामही मिळवून दिले. आता सारे छान चालले आहे; पण सूर्य तारा फार त्रास देतो. मधल्या काळात तरंग गावातील व्यवसायकर ऑफिसच्या मुख्यांनी फतवा काढला होता. आधी व्यवसाय कर भरा, नाही तर वारंवार ग्रहण लावून अंधार करू. पण मी तर नियमित कर भरतोच. नाहीतो व्याप आहे इथे. काही ताऱ्यांना, ग्रहांना माझा चालणारा धंदा पाहून हेवा वाटतो माझा. आता मी रानांची खाणच विकत घेतली आहे. त्यामुळे उजेड, प्रकाशाचा प्रश्च मिटला कायमचा.
तरंगत पुढे येऊन चंद्राने आम्हाला बाय बाय केले. आम्ही चंद्राला, चांदण्या मुलींना पृथ्वीवर यायचे आमंत्रण दिले.
तेवढ्यात आम्ही बुक केलेली यान-व्हॅन आली. आम्ही दोन तासांत घरी पोहोचलो.
माझी मुलगी व यमजानांनी विचारले कशी झाली मॅच, तुझी आभाळ राज्यातील तरंग गावातील सैर… मी तर अत्यानंदाने हवेतच तरंगत होते. माझ्या मुलालाही खूप आनंद झाला होता तरंग गावात क्रिकेट मॅच खेळून.
आमच्या दोघांचे जणू फुलपाखरू झाले होते. मी व जय दोघेही एकाच वेळी माझ्या यजमानांना व मुलीला म्हटले- मज्जा करायला, मज्जा बघायला चलो तरंग गाव. स्वातीने म्हणजे माझ्या मुलीने लगेचच रविवारची ट्रीप प्लॅन केली तरंग गावची !
Leave a Comment