Story of The Chocolate Factory

Story of The Chocolate Factory : चॉकलेट फॅक्टरी गोष्ट.

2 min read

Story of The Chocolate Factory : चॉकलेट फॅक्टरी गोष्ट.

चार्लीच्या घरात तो सोडून सहा माणसं होती. आई-पप्पा, आजी-आजोबा आणि दादा-दादी. चार्लीचे आई-पप्पा सोडल्यास आजोबा मंडळी म्हातारी असल्यानं कोणत्या ना कोणत्या आजारांनी त्रस्त असत. चार्लीचे आई-वडील एका फॅक्टरीत कामाला जात, पण त्यांचा पगार तुटपुंजा असे. या साऱ्या परिस्थितीमुळं चार्लीच्या घरात खूप गरिबी होती. बऱ्याचदा त्याच्या घरात एकवेळच स्वयंपाक केला जायचा.

चार्लीची शाळा घरापासून चार किमी अंतरावर होती. तो रोज पायीच जायचा. काहीवेळेला दुपारचा डबाही त्याला मिळत नसे. फक्त एकच गोष्ट चार्लीला आवडायची. त्याच्या शाळेच्या मार्गावर ‘मेहरा चॉकलेट फॅक्टरी’ होती. तिचे गेट नेहमी बंद असायचे; पण त्या फॅक्टरीतून विविध प्रकारच्या चॉकलेटचा सुगंध यायचा.

रोज रात्री जेवण झाल्यावर चार्ली आजोबा लोकांच्या खोलीत जायचा. आजोबा मंडळी त्याला गोष्ट सांगत, पण त्याला कुतूहल मेहरा चॉकलेट फॅक्टरीचे होते. त्यामुळे तो त्या फॅक्टरीसंबंधी प्रश्न विचारायचा. पप्पाआजोबांना त्या फॅक्टरीविषयी थोडीफार माहिती होती ती त्याला सांगत. त्यानं एकदा विचारलं, फॅक्टरीचं दार नेहमी बंद का असतं? पप्पाआजोबा म्हणाले, ‘मेहरांची कीर्ती दूरवर पसरत होती. एकदा पाँडेचरीच्या राजानं त्याला चॉकलेटचा राजवाडा बनवायला सांगितलं. त्यानं चॉकलेट फॅक्टरी हजारो कामगार कामाला लावले. दरवाजा, झाड, पलंग, खिडक्या, भिंती सारं काही चॉकलेटचं बनवलं, अन् तो राजपुत्राला म्हणाला, ‘आता हा चॉकलेटचा राजवाडा खाऊन टाक.’ राजपुत्रानं विचारलं, ‘एवढा सुंदर राजवाडा खाऊन टाकू?’

‘खाल्ला नाहीस तर उन्हानं वितळेल, मग त्याचा कुणालाच उपयोग होणार नाही.’ पण राजपुत्रानं ऐकलं नाही. एक दोन दिवसात कडाक्याचं ऊन पडलं आणि तो चॉकलेटचा सुंदर राजवाडा वितळून गेला. चॉकलेटची नदी झाली अन् राजपुत्र त्यात वाहून गेला. चॉकलेटची नदी म्हटल्यावर चार्लीच्या तोंडाला पाणी सुटलं; पण राजपुत्र चॉकलेटच्या नदीत वाहून गेला हे ऐकल्यावर तो हळहळला.

आजोबा म्हणाले, ‘तेव्हापासून मेहरानं त्या फॅक्टरीचं मुख्य गेट बंद केलं. कुणाला आत येऊ द्यायचं नाही अन् कुणाला बाहेर सोडायचं नाही. फॅक्टरीतले कामगार कधी आत-बाहेर करताना तू पाहिले आहेस का?’

नाही आजोबा !’

‘अरे, तीच तर जादू आहे की रहस्य आहे कोण जाणे. मला भेटलेली माणसं म्हणतात, कित्येक वषात त्या फॅक्टरीत कुणाला काम करताना पाहिलेलं नाही. दिवसेंदिवस चार्लीचं कुतूहल वाढतच होतं. तो आजोबांना अनेक प्रश्न विचारू लागला.

एक दिवस चार्लीचे पप्पा वर्तमानपत्र घेऊन आले. त्यांनी त्यात आलेली एक बातमी वाचून दाखवली. त्यात म्हटलं होतं- मेहरा फॅक्टरीच्या मालकांनी त्यांची फॅक्टरी पाहण्यासाठी जगातील पाच मुलांची निवड करायचं ठरवलं आहे. त्यासाठी मुलांनी/त्यांच्या पालकांनी त्याच्या फॅक्टरीत तयार झालेली चॉकलेट विकत घेतली पाहिजेत. फक्त बारमध्ये सोनेरी तिकीट लपलेलं आहे. ज्याला ते मिळेल त्यानं ते जपून ठेवायचं व आठ एप्रिलला ते घेऊन फॅक्टरीच्या गेटपाशी यायचं. जॉली मेहरा स्वतः तिकीट तपासतील व पाच मुलांना फॅक्टरीत प्रवेश देतील. मुलांबरोबर दोन पालक येऊ शकतील. या भेटीत चॉकलेट कशी तयार होतात, याची माहिती ते देतील व विशेष म्हणजे प्रत्येक मुलाला आयुष्यभर पुरेल एवढी चॉकलेट्स भेट म्हणून दिली जातील.

बातमी ऐकून साऱ्यांचे डोळे विस्फारले. शंका-कुशंका सुरू झाल्या. प्रत्येकाला आपणच तो ‘भाग्यवंत’ असं वाटायला लागलं. वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विकी मेंडीस नावाच्या नऊ वर्षे वयाच्या मुलाला पहिलं सोनेरी तिकीट मिळाल्याची बातमी आली. विकी हा एक लड्नु मुलगा होता. त्याच्या पोटाचा घेर ५० इंच होता. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बातमीदारानं त्याच्या आईची मुलाखत छापली होती. त्यात तिनं म्हटलं होतं, ‘माझ्या विकीला पहिलं तिकीट मिळेल याची खात्री होती. कारण तो रोज एवढी चॉकलेट फस्त करतो, की त्याला तिकीट मिळणार नाही असं झालंच नसतं.’

चार्लीचा वाढदिवस जवळ येत चालला होता. वर्षभर जमा करून ठेवलेल्या थोड्याफार पैशातून चार्लीचे आई-वडील त्याला चॉकलेटचे दोन बार घेऊन देणार होते. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मुंबईतील रीटा सक्सेना नावाच्या मुलीला दुसरं तिकीट मिळाल्याची बातमी येते. तिच्या वडिलांनी तिला तिकीट मिळावं म्हणून ट्रकभर चॉकलेट खरेदी केले होते व चॉकलेटचे वेष्टन काढायला ४०-५० कामगार लावले होते. या साऱ्या बातम्या ऐकून तिकीट मिळण्याची चार्लीची आशा धूसर होऊ लागली आणि झालेही तसेच ! वाढदिवसाच्या दिवशी आई-पप्पांनी दिलेल्या चॉकलेटमध्ये सोनेरी तिकीट मिळालं नाही. सर्वांनाच वाईट वाटलं. पप्पा आजोबांना त्यांची नाराजी पाहवली नाही. ते त्यांच्या औषधासाठी ठेवलेल्या पैशातून पाच रुपये चार्लीला दिले व चॉकलेट आणायला सांगितलं; पण त्यातही ते सोनेरी तिकीट निघालं नाही. दरम्यान सतत च्युईंगम खाणाऱ्या साक्षी मल्होत्रा या मुलीला तिसरं तिकीट मिळाल्याची बातमी येते.

पप्पाआजोबांच्या आग्रहावरून त्यांनी दिलेले पाच रुपये घेऊन चार्ली दुकानातून एक चॉकलेटचा बार आणतो, अन काय आश्चर्य! त्यात ते सोनेरी तिकीट असतं.

शेवटचं तिकीट माईक टीवी या मुलाला मिळतं. त्यानं पत्रकारांना सांगितलं, मला चॉकलेट फॅक्टरीचं तिकीट मिळाल्याचा फारसा आनंद झाला नाही. त्याऐवजी मला मोठ्या स्क्रीनचा टीव्ही आणि शंभर हाणामाऱ्याच्या सीडीज दिल्या असत्या तर बरं झालं असतं.

आठ एप्रिलला सकाळी दहा वाजता ज्या मुलांना तिकीट मिळालेलं आहे त्यांनी त्यांच्या पालकांसह फॅक्टरीच्या गेटजवळ यावं अशी सूचना तिकीटामागे लिहिलेली होती. चार्लीबरोबर कोणी जायचं यावर चर्चा सुरू होते. अखेर पप्पा आजोबांनी जावं असं ठरतं.

आठ एप्रिलचा दिवस उजाडला. सारीजण दहाच्या पूर्वीच आली. मेहरांनी मुलांना मिळालेली तिकीटे तपासली व पालकांसह सर्वांना आत नेले.

मुलं आणि त्यांचे पालक मेहराच्या सूचना पाळत होते; पण यांत्रिकपणे, आजूबबूच्या भव्य यंत्रांमुळे सर्वजण अचंबित झाले होते. एके ठिकाणी चक्क चॉकलेटची नदी वहात होती. आजूबाजूला चॉकलेटची झाडी होती. थोड्याच अंतरावर ड्रिंकिंग चॉकलेटचा धबधबा होता. त्यातून दूध व कोकोचे मिश्रण पाण्याप्रमाणे वाहात होते. फॅक्टरीमध्ये हाताच्या पंजाच्या उंचीएवढी माणसं काम करीत होती. रीटानं मेहराना विचारलं, ‘काका, ही एवढी बुटकी माणसं कशी?’

also read : Story of Laborer Add in Marathi

‘हो ना ! तेच तर आश्चर्य आहे ! आम्ही त्यांना ओरांग उटान म्हणतो. वेस्ट इंडिया बेटावर एका ठिकाणी या माणसांची वस्ती आहे. अतिशय कामसू, प्रामाणिक व आज्ञाधारक आहेत. सुरुवातीला आम्ही त्यांच्याशी खाणाखुणांच्या भाषेत बोलत होतो. आता त्यांना आपली भाषा कळते, बोलता येते.’

धबधब्यातून पडणाऱ्या ड्रिंकिंग चॉकलेटचं मोठं तळं झालं होतं. त्या जागेला कठडे लावले होते. त्यावर वाकून विऽकी ड्रिंकिंग चॉकलेटची चव पाहण्यासाठी द्रवात हात घालत होता.

‘दूर हो, आत पडशील.’ मेहरा ओरडले.

‘नाही काका, मला ते आताच द्या.’

‘अरे बाबा, तुम्हा सर्वांनाच मी छानशा ग्लासमधून ते देणार आहे, थोडा दम धरा.’

‘नाही मला आताच पाहिजे’ असं म्हणून तो खाली वाकला अन् तोल जाऊन त्या द्रवात पडला.

सारीजणं ओरडली, ‘अरे पडला तो, त्याला वाचवा कुणी तरी.

ड्रिंकिंग चॉकलेटचा द्रव खोलीला जोडलेल्या मोठ्या पाईपमधून बाहेर खेचला जात होता. बघता बघता विकी त्या द्रवातून पाईपच्या तोंडाशी गेला अन् दिसेनासा झाला. त्या बरोबर एकच गोंधळ माजला. विकीच्या वडिलांनी मेहरांचा कोट धरला. ते त्यांना मारणार इतक्यात मेहरा मोठ्या आवाजात म्हणाले, ‘न ऐकणाऱ्या मुलांना अशीच शिक्षा मिळते. त्यात माझी काही चुकी नाही. तुम्ही आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला नको का?’

विकीची आई स्फुंदून स्फूंदून रडू लागली. मेहरा त्यांना म्हणाले, ‘काही होणार नाही तुमच्या मुलाला ! चार-पाच पाईपमधून फिरून तो सुखरुप परत येईल. तोपर्यंत आपण दुसरी दालनं पाहू !’

थोडं अंतर चालून गेल्यावर त्यांना चॉकलेटची नदी लागली, त्यात होती एक सुरेख बोट. ती एवढी सुंदर होती की रीटा पप्पांना म्हणाली, ‘पप्पा मला अशी बोट पाहिजे आणि बोट चालवणारे ओरांग उटानही पाहिजेत. मी तुम्हाला किती दिवसांपासून म्हणतेय, मला चॉकलेटची नदी पाहिजे. काही झालं तरी मला चॉकलेटची नदी घेऊन द्याच.’

‘किती छान दिसतेय नाही?’ चार्ली आशाळभूतपणे नदीकडं पहात नी आपल्या पप्पा- आजोबांना बिलगत म्हणाला. मेहरांनी ते शब्द ऐकले. चार्लीच्या बोलण्यातली निरागसता, साधेपणा त्यांच्या मनाला भावला. ते उठून चार्लीशेजारी बसले. नावेतला पेला उचलला व चॉकलेटच्या नदीत बुडवून चार्लीपुढं धरला व म्हणाले, ‘घे, पी. किती अशक्त दिसतोस अन् थकलेलाही !’

चार्लीनं साशंकतेनं त्यांच्याकडं पाहिलं. ‘नको नको माझं पोट भरलंय !’

मेहरांनी त्याच्या पाठीवरुन हात फिरवला. ‘अरे बाबा, लाजू नको. तुझ्या आजोबांनाही देतो.’

नदी अरुंद होत चालली होती. नाव एका खोलीपुढं थांबली. त्याच्या दरवाजावर पाटी होती. येथे सर्व प्रकारची क्रीम तयार केले जातात. डेअरी क्रीम, कॉफी क्रीम, अननस क्रीम, जांभूळ क्रीम आणि हेअर क्रीम.

अतिचौकस असलेल्या माईक टीवीनं मेहरांना विचारलंच, ‘हेअर क्रीम ? अन् ते कशाला लागत तुम्हाला?’

मेहरांनी त्याच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करीत सर्वांना एका दुसऱ्या एका मोठ्या खोलीत नेलं. मेहरा म्हणाले, ‘मी एका नवीन चघळायच्या गोळीचा शोध लावला आहे. त्याचं नाव ‘हेअर टॉफी’, ती जराशी खाल्ली तरी आपल्या गालावर केस येतात. मिशीदेखील येते.’ तिथंही रीटानं विचारलंच, ‘मग मी खाऊ थोडी ?’

मेहरा म्हणाले, ‘तुझ्या गालावर, ओठांवर दाढी- मिशा येतील.’ सारीजण हसली. मेहरा पुढे म्हणाले, ‘ऐका. हेअर टॉफीपेक्षाही वेगळा असा शोध मी लावला आहे, तो म्हणजे च्युइंगमचा! त्यात दिवसभरातले तिन्ही वेळचे जेवण समाविष्ट आहे. हा च्युइंगम खाल्ला तर जेवणाची गरजच पडत नाही.”

सतत च्युइंगम खाणारी साक्षी मेहरांना, ‘आम्हाला तो खायला द्या’ असा आग्रह करू लागली; पण मेहरा म्हणाले, ‘अजून तो खाण्यासाठी तयार झालेला नाही. त्याच्यावर प्रयोग चालू आहेत.’

‘मी हा च्युइंगगम घेतल्याशिवाय हालणार नाही’ असं म्हणत साक्षीनं इकडंतिकडं पाहिलं. कुणाचं लक्ष नाही असं पाहून उडी मारून समोरच्या टेबलावर ठेवलेला च्युइंगम उचलला आणि खाल्ला. हळूहळू तिचं नाक निळं होऊ लागलं. ती फुग्याप्रमाणं फुगू लागली. तिचे हातपाय दिसेनासे झाले. इतक्यात दहा-पंधरा ओरांग उटान पुढं झाले व तिला ढकलत ढकलत एका खोलीत घेऊन गेले.

मेहरासाहेब काय केलंत तुम्ही आमच्या मुलीला ? असं म्हणून साक्षीचे आई-वडील रडू लागले.

‘काळजी करू नका. आपण फिरून परत येईपर्यंत सारं काही ठीक होईल.’ मेहरा म्हणाले.

मेहरा पुढच्या दालनाकडं निघाले. सारीजण त्यांच्यामागं जाऊ लागले. एका खोलीच्या दरवाजावर लिहिलं होतं-
खाण्याच्या उशा’, दुसऱ्यावर लिहिलं होतं- ‘चाटण्याचा भिंत कागद’, तिसऱ्यावर लिहिलं होतं- ‘चॉकलेटचं दूध देणारी गाय’, तर चौथ्या खोलीच्या दरवाजावर लिहिलं होतं- ‘गोलाकार दिसणारी चौकोनी मिठाई’.

अशी गमतीदार शीर्षकं पाहून साऱ्यांनाच मजा वाटत होती. ‘आता आपण बदामाच्या चॉकलेटच्या खोलीत शिरतो आहोत.’ मेहरा म्हणाले.

ती खोली पूर्ण काचेची होती. आत एक विलक्षण दृश्य दिसत होतं. शंभर खारी बदाम सोलत होत्या.

रीटा तिच्या पप्पांना म्हणाली, ‘मला यातली एक एक खार पाहिजे. आपल्याकडं ससा आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, कासव आहे, फक्त खारंच नाही.’ तेवढ्यात मेहरा तेथे आले. त्यांनी रीटाच्या दंडाला धरून खेचले व दटावून म्हणाले, ‘अजिबात मिळणार नाही. त्या खारी दिसायला सुंदर असल्या तरी शक्तिमान आहेत. त्यांनी तुला पकडले तर सोडणार नाहीत. चला पाहू दुसऱ्या खोलीत.’

सारीजण मेहरांच्या पाठोपाठ वळली. रीटा मुद्दाम मागं राहिली. कुणाचं लक्ष नाही, असं पाहून तिनं त्या खोलीचा दरवाजा उघडला व एका खारीला आपल्या हातात पकडलं. त्याबरोबर इतर खारींनी रीटावर हल्लाच केला. ती मोठमोठ्यानं ओरडू लागली. रीटाच्या आई-वडिलांनी ते पाहिलं. तेही ओरडू लागले.

‘फारच हट्टी आणि बेजबाबदार दिसते तुमची मुलगी’ असं म्हणत मेहरांनी टाळ्या वाजवल्या. तशी ओरांग उटान आले; पण तोपर्यंत खारींनी रीटाला ओढत ओढत आतल्या खोलीत नेले होते. थोड्याच वेळात ओरांग उटान, रीटा व खारी दिसेनाशा झाल्या.

‘मला टीव्ही पाहायचाय, आज मी टीव्ही पाहिला नाही.’

‘होय बाळा, आता आपण टीव्हीच्याच खोलीत चाललो आहोत.’

लिफ्टनं सर्वजण एका खोलीच्या समोर आले. ‘मी तुम्हाला टीव्ही-चॉकलेटची खोली दाखवणार आहे.’ असं म्हणत मेहरांनी सर्वांना एका भव्य दालनात नेले. तेथे एवढा प्रकाश होता की त्यानं सवाँचे डोळे दीपले. मेहरांनी टाळ्या वाजवल्या. त्याबरोबर दोन ओरांग उटांग आले. त्यांच्या हातात काळे चष्मे होते.

‘सर्वांनी चष्मे घाला, म्हणजे डोळ्यांना प्रकाशाचा त्रास होणार नाही.’

मेहरांनी चॉकलेट टीव्हीचं कार्य सांगायला सुरवात केली. एका टोकाला एक मोठा सिनेकॅमेरा असतो. त्यातून तुम्ही शूटिंग करू शकता. ज्याचे फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत किंवा प्रक्षेपण करायचे आहे, त्यावर कॅमेरा केंद्रित करायचा, नंतर या फोटोग्राफ्सचे असंख्य बारीक बारीक सूक्ष्मदर्शी कणात रुपांतर केले जाते. नंतर हे कण विजेच्या साह्याने आकाशात फेकले जातात. हे कण टीव्हीच्या अँटिनाला लागले की वायरच्या साह्याने ते तुमच्या घरातील टीव्ही सेटकडे आणले जातात. टीव्ही सेटमध्ये वेगवेगळ्या क्षमतेची, आकाराची, रंगांची घरे (कप्पे) असतात. त्यात हे सूक्ष्मदर्शी कण बसले की टीव्हीच्या पडद्यावर प्रकाशमान होतात व तुम्हाला चित्र दिसते.

माईकनं बरेच प्रश्न विचारले. उत्तरादाखल महेरांनी प्रात्यक्षिकच करून दाखवले. त्यांनी चॉकलेटचा मोठा बार आणला. ओरांग उटांगच्या साह्यानं प्रक्रिया केल्या. थोड्यावेळाने तो बार टीव्ही स्क्रीनवर दिसू लागला. नंतर काही वेळानं त्यांनी आणखी काही प्रक्रिया केल्या. त्याबरोबर टीव्ही सेटमध्ये पुन्हा तो चॉकलेट बारं अवतरला.

माईकचे प्रश्न संपले नव्हते. त्यानं विचारलं, ‘काका, जसा चॉकलेटबार तुम्ही टीव्हीतून पाठवू शकता माणसंही तशीच पाठवू शकत असाल, नाही?”

माइक टीव्हीच्या वेडानं एवढा उतावीळ झाला होता की आई-वडिलांच्या परवानगीची वा मेहरांच्या उत्तराची वाट न पाहता जागेवरून उठला व कॅमेऱ्याच्या कक्षेत गेला. प्रखर प्रकाशझोत त्याच्या अंगावर पडले. ‘अरे काय करतोस हे’ असं म्हणत मेहरा त्याच्यामागे धावले, पण तोपर्यंत प्रकाशाचे प्रखर झोत त्याच्या अंगावर पडले होते व तो दिसेनासा झाला होता.

माईकचे आई-बाबा धाय मोकलून रडू लागले. मेहरांवर भलतेसलते आरोप करू लागले. तशी ते उसळून म्हणाले, ‘तुम्हाला काय म्हणायचंय, मी मुलांना मारण्यासाठी इथं आणलंय? चूक कोणाची, माझी की तुमची? काळजी करू नका. संध्याकाळपर्यंत येईल तो परत.

आता फक्त चार्ली, पप्पा-आजोबाच राहिले होते. मेहरा त्यांना म्हणाले, ‘या दुसऱ्या लिफ्टमध्ये बसा. ती एखाद्या हेलिकॉप्टरप्रमाणे आहे. आकाशात भरारी मारू. आकाशातून तुमचं घर कसं दिसतं ते पाहू.’

‘आमचं घर?’ चार्लीनं आश्चर्यानं विचारलं.

‘होय ! ही लिफ्ट तुमच्या घराजवळच्या मोकळ्या जागेत थांबेल. मला तुझ्या आई-वडिलांनाही भेटायचं आहे.’

लिफ्टची घरघर ऐकून चार्लीचे आई-पप्पा घराबाहेर आले. मेहरांनी त्यांना नमस्कार केला. ‘अभिनंदन ! तुमच्या चार्लीनं आजची भेट जिंकली. मी फार खूश झालो त्याच्यावर. उद्यापासून तुमची राहण्याची व्यवस्था चांगल्या घरात करतो. चार्लीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी मी घेतो आणि तो जेव्हा मोठा होईल तेव्हा ही फॅक्टरी त्याच्या मालकीची होईल, असं लिहून देतो.’

Share This News

ताज्या बातम्या

Leave a Comment

आमच्या विषयी

Hello Beed मध्ये आपले स्वागत आहे. बीड शहरातील ताज्या बातम्यांचे हे आपले विश्वसनीय ठिकाण आहे. आम्हाला तुमच्यापर्यंत अचूक आणि वेळेवर बातम्या पोहोचवायच्या आहेत. आजच्या वेगवान जगात अद्ययावत राहणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला बीडमधील बातम्या, सरकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती देतो.