Story of Follow The Lizard On The Forest Path in Marathi

Story of Follow The Lizard On The Forest Path in Marathi : सरड्याच्या मागे रानातल्या वाटेवर गोष्ट.

1 min read

Story of Follow The Lizard On The Forest Path in Marathi : सरड्याच्या मागे रानातल्या वाटेवर गोष्ट.

त्या दिवशी आम्ही आमच्या घरामागच्या शेराच्य कुपाटीवर एक लालतोंड्या सरडा घेरला होता. मी, अंक्या आणि भिलहाटीतला मछ्या माझ्यासोबत होते. मछ्याच्या हातात पाखरं मारायची गलोल होती. जो पक्षी-प्राणी आपण खात नाही त्याला गलोलीतून खडा मारायचा नाही, असा नियम भिलहाटीत होता; पण माझ्या मैत्रीमुळे मछ्या इच्छा नसताना सरड्यांवर खडे मारत होता.

शनिवार असल्यामुळे शाळेला दुपारनंतर सुट्टी होती. सायकलवर टांग मारून गुरुजी आपल्या लांबच्या गावाला निघून गेले होते. त्यामुळे लोखंडी घंटा वाजवून शाळा भरवायची घाई आज माझ्यामागे नव्हती. शाळेची चावी मी कमरेच्या करगोट्याला असल्याची खात्री करून घेतली आणि सरड्यामागे लागलो. मागे एकदा माझ्या खिशातून शाळेची चावी हरवली, तेव्हा सगळी शाळा चावी शोधायला आमच्या मळ्यात आली होती. शेवटी एका मुलाला ती घासाच्या शेतात सापडली. डोळा पडलेली पपई काढायला मी झाडावर चढलो तेव्हा ती पडली असणार. त्यानंतर गुरुजी चावी पुन्हा माझ्याकडे देणार नाहीत असं सगळ्या मुलांना वाटत होतं; पण त्यांनी ती चावी माझ्या कमरेच्या करगोट्याला बांधून टाकली. तेव्हापासून रानात हिंडताना सतत करगोट्याची चावी चाचपण्याची सवय मला लागली होती.

आम्ही घेरलेला सरडा आपलं खरखरीत अंग शेराच्या ताटीआड लपवत वर वर जात होता. काही वेळापूर्वी लालभडक दिसणारं त्याचं तोंड आता काळंठिक्कर झालं होतं. त्याचं पांढरं, गुबगुबीत, फुगलेलं पोट मला अधूनमधून दिसत होतं. दुसरं कुठलं झाड असतं तर मी वर चढून फांद्या हलवून तो सरडा खाली पाडला असता; पण शेराच्या झाडावर तो कोणालाच नीट दिसत नव्हता. त्यात आधी मारलेल्या दगडांमुळे शेराच्या झाडावरून पांढरे शुभ्र शेराचे थेंब एकसारखे खाली पडत होते. अंगातला सदरा घाण व्हायला नको म्हणून अंक्या आणि मछ्या झाडाखाली येत नव्हते. मी एकटाच हट्टाला पेटून हातात दगडं घेऊन सरडा शोधत होतो. अंगावर पडणारे शेराचे थेंब चुकवत माझी नजर सरडा शोधत होती. शेराच्या उंच ताटीवर एका ठिकाणी होल्याचं घरटं आहे की सरडा हे मी बारकाईने पाहत होतो, तेवढ्यात शेराचा एक थेंब माझ्या डोळ्यात पडला. हातातला दगड खाली टाकून मी सदऱ्याच्या बाहीने डोळ्यातला चीक पुसू लागलो. डोळ्यात आग पेटली होती.

लहानपणी डोळ्यात शेराचा चीक गेल्यावर आंधळा झालेला वाघ्या मला नेमका त्याच वेळी आठवला. मला रडायलाच यायला लागलं. मला शेराच्या ताटीखालून दूर ओढून अंक्या माझ्या डोळ्यात फुंकर घालू लागला. आमच्या रांजणातून पाणी आणून मछ्याने माझे हात आणि चीक गेलेला डोळा धुऊन काढला. मी हळूहळू डोळा उघडायला बघत होतो, पण तो उघडेचना. डोळा उघडत नाही म्हणजे आपण आंधळे झालो असं वाटून मी पुन्हा मोठ्यांदा रडू लागलो. तेव्हा मछ्या म्हणाला, “रडतो काहाला? आपण तुह्या डोळ्यात शेरडाचं दूध टाकू. त्यानं अख्खी घाण निघून जाईल.”

मछ्याला असे सगळे उपचार माहिती होते. मागे बाभळीच्या काट्यांच्या फासाजवळून अनवाणी पळताना एक लांब, टोकदार काटा खसकन माझ्या पायात घुसला होता. दोन्ही हातांत काटा भरलेला पाय तसाच धरून मी बसून राहिलो. माझ्या पुढे पळत गेलेला मछ्या पुन्हा माघारी आला. मला म्हणाला, “वर बघ.” मी वर पाहिलं, तेवढ्यात त्याने माझ्या पायातला काटा उपटून काढला. काटा भरलेल्या जागेवर मछ्याने जोराचा चावा घेतला. असं केल्यामुळे काटा भरलेली सगळी घाण निघून जाते, असं तो म्हणाला. नंतर त्या जखमेवर त्याने रुईचा पांढरा चीक भरला. मी लंगडत लंगडत चालायला लागल्यावर तो मला म्हणाला, “काही होत नाही. शाळा सुटल्यावं आपण पायाला बिब्यांचा कडका देऊ.” शाळा सुटल्या सुटल्या मी अडगळीतून एक जुना बिब्बा शोधून काढला. मछ्याने आमच्या घरातली रॉकेलची चिमणी पेटवली. सुईत बिबा खपसून लगेच तो पेटलेल्या चिमणीवर धरला. काळा धूर सोडत बिबा चर चर वाजत पेटला आणि खाली ओघळू लागला. बिब्याचा कडका मछ्याने माझ्या टाचेवर ठेवला तेव्हा मी जोरात बोंब ठोकली, पण सकाळी बघतो तर काटा भरलेला पाय बरा झाला. असा मछ्या !

तर माझ्या चीक गेलेल्या डोळ्यात शेळीचं दूध टाकायचं होतं; पण आमची शेळी तर सकाळीच आईने रानात चरायला नेली होती. मछ्या आणि अंक्या माझा हात धरून मला आमच्या मळ्यात घेऊन निघाले. वाटेने भेटणारी माणसं विचारत होती, “काय झालं?” अंक्या म्हणायचा, “वहीची पानं चिटकवताना शेराचा चीक डोळ्यात गेलाय.” बोळातल्या चिंचेजवळ आम्हाला विकाशा शेळ्या चारताना भेटला. पण त्याच्या आईने शेळ्यांच्या सडाला साबरीचा काटा लावलेली आळापणी लावलेली होती. आणि शेळीच्या भांडणं झाली होती.

त्यामुळे आम्हाला पाहताच विकाशा आपल्या शेळ्या दूर हाणत पळून गेला. आता भराभर पावलं उचलून आम्हाला आमचा मळा गाठायचा होता. कधी एकदा डोळा शेळीच्या सडांखाली धरतोय असं मला झालं होतं. आम्ही हरीच्या मळ्याजवळ आलो, तेव्हा रस्त्याच्या कडेला घामोळीवर एक मोठा सरडा डोळे मिटून झोपला होता. हातातली काठी त्या सरड्याच्या पाठीत सहज हाणता आली असती; पण आत्ता आधी डोळ्यांतला चीक काढायला हवा होता. त्या सरड्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय इलाज नव्हता.

also read : The Horse, Me and Our Friendship in Marathi

हरी त्याच्या मळ्यावर एका हाताची तुटलेली बोटं चाळवत बसला होता. मला म्हणाला, “पुढच्या वर्षी मला दूर अंपगांच्या शाळेत टाकणारेत. त्या शाळेत सगळीच हात-पाय तुटलेली मुलं-मुली आहेत. तुमचं आहे रे. तुम्ही इथेच राहणार.” माझ्या पोटात कसंसंच झालं. दुसरीत असताना हरीने विहिरी फोडणारा सुरुंगाचा ताईत सहज गंमत म्हणून पेटलेल्या चुलीत टाकला होता. चूल स्फोट होऊन बाहेर उडाली. हरीचा एक डोळा फुटून खाली लोंबला. चुलीत हात घातलेली बोटं तुटून अंगणात पडली. हरीला दवाखान्यात नेताना त्याच्या वडिलांच्या कोपरीच्या खिशात ती बोटंही टाकली. ‘ही बोटं जोडता येतील का?’ असं त्यांनी डॉक्टरला विचारलं तेव्हा ते चिडून म्हणाले, “त्या बोटांमधला जीव गेलाय. तुमचा मुलगा जगला हेच खूप झालं.” मीही आता हरीसारखाच असे मला वाटत होतं. मलाही अपंगांच्या शाळेत टाकतील का ?

आम्ही मळ्याजवळ पोचलो तेव्हा अंक्या आणि मछ्या म्हणाले, “तुझी आई आम्हाला पण रागवेल. आम्ही इथूनच माघारी जातो.”

मी एकटाच बांधणीच्या मळ्याकडे चालू लागलो. माझा रडका चेहरा पाहून आईने ओळखून घेतलंच, की काही तरी झालं आहे. आईला पाहून मला अजूनच रडू फुटलं. शेराचा चीक गेलेला डोळा मी आईच्या पुढे धरत मी म्हणालो, “डोळ्यात शेराचा चीक गेला. आता माझा डोळा जाणार?” हातातलं खुरपं खाली टाकत आई तोंडाला हात लावत उभी राहिली. माझी चुलती तिकडून मोठ्याने ओरडली, “अगं, ऊठ. अशी मुकाट काय बसलीस? शेळीच्या दुधाची धार सोड आधी त्याच्या डोळ्यात.” आपल्या पदराने माझा डोळा पुसत आई शेळीकडे धावली. आग आग होणारा डोळा हाताने झाकून मी लिंबाच्या सावलीत बसून राहिलो. रुईच्या झुडपाला बांधलेली शेळी सोडून आईने तिला माझ्याकडे ओढत आणलं. आता चुलतीसुद्धा माझ्या पाठीवर हात फिरवत जवळच उभी होती. आईने मला मांडीवर झोपवलं. शेळीचा एक सड पाण्याने धुऊन आईने माझ्या डोळ्यात दुधाची उष्ण धार सोडली. शेळीचं गोड कच्चं दूध डोळ्यातून, गालावरून थेट माझ्या ओठात जात होतं. हळूहळू आग कमी कमी होत गेली. आईने लुगड्याच्या पदराने माझा डोळा हळुवार पुसला. मी भीत भीतच चीक गेलेला डोळा उघडला. त्या डोळ्याने मला आईचा रडू फुटलेला चेहरा दिसला. आईच्या मागेच भुईमुगाचं ऐसपैस हिरवंगार रान दिसलं. आडव्या बांधावर लावलेलं सीताफळाचं झाड दिसलं. होता, माझा डोळा अजून शाबूत होता!

तेवढ्यात तालुक्याच्या गावी शिकणारा माझा मोठा भाऊ सायकल मारत मळ्यावर आला. चीक निघालेला माझा लालभडक डोळा पाहून म्हणाला, “काही काळजी करू नको रे. उद्या मला सुटी आहे. मोहोळाचा मथ तुझ्या डोळ्यात टाकू, सगळी घाण बाहेर येईल.” पण चीक डोळ्यात कसा गेला ते काही मी त्याला सांगितलं नाही. कारण सरडे, फुलपाखरांना मारताना पाहिलं की तो मला खूप ओरडायचा. एकदा त्याच्या हातून सरड्याला चुकून दगड लागला आणि तो सरडा मेला. त्याला काळ्या मुंग्यांनी खाताना भावाने पाहिलं आणि तो खूप रडला होता. मी आजवर किती तरी सरड्यांना दगड मारले होते. सरडा मेला की नाही याची खात्री करायला थांबून पुन्हा त्याच्या पाठीत दगड घातले होते. आत्ताही शेराच्या झाडावरचा सरडा अजून मेलेला नाही, एवढंच माझ्या डोक्यात चाललं होतं. त्यामुळे मी भावाला काही न बोलता गप राहिलो.

तालुक्यावरून सायकल मारत दमून आलेला भाऊ घरी येऊन झोपला तेव्हा मी अंक्या आणि मछ्याबरोबर सरड्याचं काय झालं बघायला घरामागच्या शेराच्या कुपाटीजवळ गेलो. दुपारी आमच्या अंगावर टिपटिपणारं शेराचं झाड आता गोठून गेलं होतं आणि झाडाखालीच तो सरडा मरून पडला होता. मेलेल्या सरड्याच्या अंगावर शेराचे असंख्य पांढरे ठिपके होते. मला वाटलं, अंगावर शेराचा चीक पडल्यामुळेच तो सरडा मेला असावा. मछ्याने हातात लांब काडी घेतली आणि तो सरडा उलटापालटा करून पाहिला. त्याचं पोट फुगलेलं होतं. त्याच्या पोटावर मछ्यानं काडी दाबली तेव्हा पोटातून लिंबोळीएवढं पांढरं अंड सुळकन बाहेर आलं. आज-उद्या त्या सरड्धाने अंडी घातली असती.. त्यातून पिलं बाहेर आली असती.. सरडा उगीच मेला, असं मला वाटू लागलं. पहिल्यांदाच. आपणच त्याला मारलं का? मेलेला सरडा साबरीच्या कुपाटीत फेकताना मछ्या म्हणाला, “गलोलीचा खडा घासून गेला असंन का? उलीशा जीवाला काय लागतंय मरायला!”

मछ्याचे ते शब्द माझ्या काळजात गलोलीच्या खड्यासारखेच घुसून बसले.

Share This News

ताज्या बातम्या

Leave a Comment

आमच्या विषयी

Hello Beed मध्ये आपले स्वागत आहे. बीड शहरातील ताज्या बातम्यांचे हे आपले विश्वसनीय ठिकाण आहे. आम्हाला तुमच्यापर्यंत अचूक आणि वेळेवर बातम्या पोहोचवायच्या आहेत. आजच्या वेगवान जगात अद्ययावत राहणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला बीडमधील बातम्या, सरकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती देतो.