The Horse, Me and Our Friendship in Marathi : घोडा, मी आणि आमची दोस्ती गोष्ट.
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी असेन बावीस- तेवीस वर्षांचा. दुपारची वेळ होती. दारावरची बेल वाजली. पाहिलं, तर मुंडासं घातलेला एक माणूस दारात उभा होता. तो खूप मोठा प्रवास करून आल्यासारखा दिसत होता. त्याने माझ्यासाठी काही तरी आणलं होतं, ते दाखवायला त्याने मला खाली बोलावलं. हा तर आपल्या ओळखीचाही नाही. याने काय आणलंय बुवा आपल्यासाठी, असं मनात म्हणत मी खाली आलो, समोर काय असावं? चक्क एक घोडा ! तुकतुकीत पाठीचा, झुबकेदार शेपटीचा घोडा. माझ्या बाबांनी खास माझ्यासाठी मागवला होता. मी पाहतच राहिलो. घोडा ? आपल्यासाठी ? मला खूप आनंदही झाला होता. माझ्या हातात त्या घोड्याचा लगाम सोपवून तो माणूस निघूनही गेला. आता या घोड्याचं करायचं काय, असा प्रश्न पडला होता. त्याला ठेवायचं कुठे, खायला काय घालायचं, किती घालायचं, काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे त्याच्यासाठी गवत पैदा कर, पाणी आण, अशी माझी गडबड उडाली.
बाबांनी हा घोडा मला भेट देण्याला कारणही तसंच होतं. तीच गंमत आधी सांगतो…
मला घोडे आवडायचे; पण वयाच्या बाविसाव्या वर्षापर्यंत माझा प्रत्यक्ष घोड्यांशी काहीही संबंध आला नव्हता. मात्र, एके दिवशी अचानक बाबांनी मला घोडेस्वारी शिकायला पाठवायचं ठरवलं. का, कशासाठी- यातलं बाबांनी काहीच सांगितलं नाही. मी जरा गोंधळलोच; पण दुसरीकडे मला आनंदही झाला होता. घोडेस्वारी शिकायला मला आवडणार, हे बाबांनी बरोबर ओळखलं होतं
बाबांनी ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी पुण्यातल्या शिवाजी मिलिटरी प्रिप्रेटरी स्कूलच्या मैदानावर पोचलो. तिथे सैन्यातून निवृत्त झालेले अधिकारी घोडेस्वारी शिकवायचे. आपल्याला कोणी शिकवायची गरज नाही, हे आपल्याला येणारच, असा मला मोठा (खरंतर फाजीलच) आत्मविश्वास वाटत होता. मी सरळ तिथल्या अधिकाऱ्यांना म्हटलं, “तुमच्या इथे जो सगळ्यात बदम सावकाश घोडा असेल तो द्या मला चालवायला.”
ते म्हणाले, “साब, ऐसा नहीं होता। आज आपका हिला दिन है। आप अच्छावाला घोड़ा ले लो।”
पण मी ऐकायला तयार नव्हतो. खूपच हट्ट धरल्यानंतर त्यांनी शेवटी एका पोऱ्याला आवाज दिला, “जरा डिंपल’ को सॅडल लगाव।” तो मुलगा ‘डिंपल’ नावाच्या घोडीला घेऊन आला. घोडी कसली, खेचरासारखीच दिसत होती ती. तिच्यावर ‘सॅडल’ म्हणजे खोगीर चढवलं गेलं.
इकडे त्यांनी मला घोड्यावर बसण्यापूर्वी काय काळजी घ्यायची, खोगीर कसं चढवायचं, पाय कसा ठेवायचा, लगाम कसा धरायचा, अशा सगळ्या सूचना दिल्या; पण माझं त्याकडे लक्ष नव्हतं. कधी एकदा त्या घोडीवर बसतो, असं मला झालं होतं. त्या जोशातच मी रिकिबीत पाय ठेवला आणि दुसरा पाय पलीकडे टाकला, तशी डिंपल अचानक मागच्या पायांवर उभीच राहिली. मला कळेना, आता करायचं काय ? मी घाबरून माझ्याही नकळत लगाम ओढला, तसे डिंपल आणि मी दोघंही मागे उताणे पडलो. आपण खाली पडलोय हेही मला थोडा वेळ कळलं नाही. धडपडत उभा राहिलो. सगळे माझ्याकडेच बघत होते. मी हट्टाने पुन्हा डिंपलवर बसण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा पडलो. उठलो, तर डिंपल त्या लाकडी रिंगणावरून उडी मारून जाताना दिसली. दोघं-तिघंजण मला सावरायला आले. काही झालं नाही, असं म्हणत मी त्यांना बाजूला केलं; पण माझ्या डोक्याला एक मोठी खोक पडली होती आणि पांढऱ्या शर्टावर रक्ताचा एक मोठा डाग दिसायला लागला होता.
घोड्याची आणि माझी ओळख झाली ती अशी. मनातून मी घाबरलो होतो. तरीही दुसऱ्या दिवशी मी परत गेलो. मला एक साधा, शहाणा घोडा देण्यात आला. मग जास्त आगाऊपणा न करता मी शांतपणे घोडा समजून घेण्याच्या कामी लागलो. चार महिने न कंटाळता मी तिथे घोडा चालवत राहिलो. सकाळ-संध्याकाळ मी तिथेच पडीक असायचो. घोड्यांचं वेडच लागलं मला. घोड्याची चाल, घोडेस्वारीचे प्रकार, चांगले घोडे, बदमाश-अडेलतट्टू घोडे असं काहीबाही मला कळू लागलं. आपण घोड्यावर बसतो तेव्हा आपला जीव घोड्याच्या ताब्यात देतो; घोडा आपल्याला सांभाळून घेतो, तसंच आपणही त्या घोड्याला समजून घ्यायचं असतं हे मला त्या चार महिन्यांमध्ये समजलं. हळूहळू मला घोडा चांगला चालवता यायला लागला.
आणि मग पुढे काही दिवसांनी अचानक मला बाबांकडून हा घोडा भेट मिळाला. समशेर त्याचं नाव. तेही बाबांनीच ठेवलं होतं. आपल्या मुलाला घोडा चालवणं आवडतंय हे पाहिल्यावर त्यांनी चाळीसगावच्या डॉ. पूर्णपात्रे यांच्याकडून खास हा घोडा मागवला होता.
आज कुणाला खरं वाटणार नाही, पण स्कूटरला किक मारून भाजी आणायला जावं तसा मी समशेरवर बसून पुण्यात फिरायला बाहेर पडायचो. बँकेत जायचं असो, मित्रांना भेटायला जायचं असो किंवा कोणाच्या घरी, मला समशेरच हवा असायचा. ही गोष्ट असेल २०-२५ वर्षांपूर्वीची. तेव्हा रस्त्यांवर तुलनेने वाहनं कमी होती तरीही वर्दळ असायचीच; पण घोड्यावरून फिरताना मला त्याचा कधी त्रास झाला नाही, आणि रस्त्यातल्या लोकांनी मुद्दाम आपल्याकडे बघावं म्हणून आपण काही तरी करतोय असंही मला कधी वाटलं नाही. माझा घोडा कसा चाललाय, त्याच्या डोक्यात काय चालू आहे याच्याकडेच माझं सारं लक्ष असायचं. घोडेस्वारीच्या भाषेत असं शांतपणे घोडा चालवण्याला ‘शाही सवारी’ म्हणतात. अशी शाही सवारी करण्यात एक वेगळीच मजा असते. ही मजा मी अनेक वर्षं घेतली.
पुढे समशेरवर ताण पडू नये म्हणून बाबांनी आणखी एक घोडा घ्यायचं ठरवलं. असं करत करत चाळीसगावजवळच्या सारंगखेडा बाजारातून आमच्याकडे १० घोडे आले. आमच्या घराच्या खालच अख्खं गॅरेज घोड्यांनी भरून गेलं. समशेर, सर्जा, बादल, राणा, समीर, मस्तानी अशी खास बाबांनी त्यांच्या आवडीने ठेवलेली नावं होती या घोड्यांची. घोड्यांचा एक वास असतो. घोड्याशी संबंध नसलेला कोणताही माणूस त्याला नाक मुरडेल; पण मला तो वास आवडायला लागला होता. घोड्यांचं खाणं-पिणं, त्यांची मशागत, त्यांचं खिंकाळणं, त्यांचे मूड्स, त्यांचं झोपणं-उठणं, त्यांची आजारपणं…. हे सगळंच माझ्या आवडीचं झालं होतं.
एकदा मी आणि माझा एक मित्र आमच्या दोन घोड्यांवर बसून सिंहगडावर गेलो होतो. डांबरी रस्त्याने नव्हे, पाऊलवाटेने. निसरडी वाट, उभा चढ आणि आसपास इतर कुणीच नाही. भन्नाट वाटलं होतं गडावर जाताना. रात्री आम्ही गडावरच मुक्काम ठोकला आणि भल्या पहाटे कोंढणपूरच्या बाजूने कात्रजवरून डोंगर- दऱ्यांमधून घोडे दौडवत पुण्यात परत आलो. त्यानंतर तर घोडे माझे फारच जवळचे मित्र झाले.
घोड्यांसोबत अनेक वर्षं राहिल्यावर मला आणखी एक वेगळेपण जाणवतं. ते असं, की घोडा जवळजवळ माणसासारखाच आहे. त्याला काही गोष्टी हव्या असतात, काही नको असतात. तो खूष होतो. कधी तरी त्यालाही राग येतो. हे सगळं त्याच्या वागण्यातून दिसून येतं. कधी तो खिंकाळून आपला आनंद व्यक्त करतो, कधी अडून बसतो आणि काय वाट्टेल ते होवो, त्याला जिथे जायचं असेल तिथेच जातो, किंवा हलायचं नसेल तर अजिबात जागचा हलत नाही. तो माणसावर खूप प्रेम करतो. त्याला एखाद्या माणसाचा राग आला तर तो त्याला नडतोसुद्धा. आपण जितके घोड्यासोबत राहू तितकं आपल्याला हे कळत जातं. आपल्याला काय म्हणायचंय हे हळूहळू घोड्यालाही कळायला लागतं. आपण त्याला काही तरी शिकवतो; तोही आपल्याला शिकवतो.
also read : Bulbul Comes Home… in Marathi
जवळपास १० वर्षं आमच्या घरी हे घोडे होते. एकदा आमच्या घोड्यांना काही तरी विषबाधा झाली. त्यात चार घोडे एक-दोन दिवसांच्या अंतराने मेले. त्यांना आम्ही जे गवत खायला द्यायचो त्याच्यावर बहुतेक कीटकनाशक मारलेलं असावं. तीनच घोडे शिल्लक राहिले. काय करावं ते मला कळेना. रेसकोर्सवरच्या डॉक्टरांना विचारलं, सरकारी हॉस्पिटलमध्ये विचारलं; पण कोणालाच काही सांगता येईना. त्यानंतर उरलेले घोडे एका माणसाकडे सोपवले. पुढचे सहा महिने ते घोडे आमच्या घरी पळून यायचे. शेवटी एकेक करून घरातले सारे घोडे संपले. माझे हे जिवलग मित्र अचानक मला सोडून गेले. मन सुन्न झालं
त्यानंतर अचानक एका वेगळ्याच निमित्ताने पुन्हा एकदा माझी आणि घोड्यांची भेट झाली. एकदा माझे मित्र जयंत मुळे यांच्याबरोबर मी ‘एनडीए’मध्ये मेजर जगत सिंगना भेटायला गेलो. मेजर जगत सिंग एक इक्विटेशन ऑफिसर होते. इक्विटेशन ऑफिसर म्हणजे लष्कराच्या घोडदळातला अधिकारी. आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. माझं घोडाप्रेम, घरचे घोडे वगैरे ऐकल्यावर त्यांनी विचारलं, “प्रसादसाब, घोड़ा चलाओगे?” मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. आम्ही त्यांच्या तबेल्यात गेलो. त्यांनी मला त्यांचा एक आवडता घोडा चालवायला दिला. आम्ही एकत्र घोडेस्वारी केली, घोड्यांवर गप्पा मारल्या. नंतर मी तिथे अनेकदा गेलो. पुढे जगत सिंग यांची बदली झाली. नवे अधिकारी आले. त्यांनाही घोड्यांचं वेड होतं. त्यांच्याशीही माझी मैत्री झाली.
‘एनडीए’ मध्ये भारतीय सैन्याचे अधिकारी तयार होतात. आपल्या सैन्यात अजूनही घोडदळ आहे. फार कमी देशांनी असं घोडदळ सांभाळलं आहे. कारण प्रत्यक्ष युद्धात घोड्यांची आता गरज राहिलेली नाही. आपल्याकडेही हे घोडदळ फक्त लष्करातल्या समारंभांसाठीच आहे, पण ते आहे हे महत्त्वाचं. ‘एनडीए’च्या कॅडेट्सना घोडेस्वारी शिकवली जाते. त्यामुळे लष्कराने तयार केलेले दोनशे उत्तम घोडे एनडीएत आहेत.
‘एनडीए’ मधल्या या घोड्यांना सांभाळणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या तिथल्या माणसांना ‘ग्रूम’ असं म्हणतात. तिथे रोज सकाळी घोड्यांना एका विशिष्ट पद्धतीने अंघोळ घातली जाते. ग्रूम्स रोज घोड्यांना खायला घालतात. ग्रूम्सची आणि खाण्याच्या कंटेनर्सची हालचाल जाणवू लागली की घोड्यांना कळतं, आपली खायची वेळ झाली. मग घोडे आपल्या तबेल्यांमधूनच जोरजोरात खिंकाळायला लागतात.
अॅकॅडमीला सुट्टी असते, घोडेस्वारीला कोणी नसतं, तेव्हा एकेका तबेल्यातल्या २०-२५ घोड्यांना बाहेर – आणून एका ठराविक जागेवर पळवलं जातं. ते बघायला खूप मजा येते. घोडे रात्री झोपतात तेही पाहण्यासारखं असतं. घोडा झोपत नाही किंवा उभा राहून झोपतो, न असं म्हणतात ते काही खरं नाही. तो झोपतो, अगदी पाठ खाली टेकवून झोपतो. मात्र, तरुण घोडा अतिशय व सावध असतो. खुट्ट आवाज झाला तरी तो उठून बसतो. त्यामुळे कदाचित घोडा झोपत नाही असं म्हटलं जात असावं.
‘एनडीए’त गोपाळ नावाचा एक घोडा आहे. एकदा मी घोडेस्वारीसाठी तिथे पोचलो तेव्हा जवळपास सव्वाशे लोक घोडेस्वारी करत होते. माझ्यासाठी एकही घोडा शिल्लक नव्हता. आत जाऊन पाहिलं तर तिथे हा ‘गोपाळ’ होता. तिथला ग्रूम मला म्हणाला, “साब, ये घोड़ा मत चलाव। ये पीठ का बहुत ख़राब है।” पण मी त्याचं ऐकलं नाही. गेलो चालवायला. तो छान चालला. मी त्याला सोडून परत आलो.
रात्री शांतपणे झोपलो. सकाळी एनडीएतल्या एका अधिकारी मित्राच्या फोननेच मला जाग आली. मी पडल्या पडल्याच फोन उचलला. ते म्हणाले, “प्रसादजी, कैसी तबियत है आपकी ?”
मला काही कळलं नाही. मी म्हटलं, “माझ्या तब्येतीला काय झालं?”
ते म्हणाले, “कल आप ‘गोपाळ ‘पे बैठे थे ना। सोचा, पूँछ लेते हैं। आप ठीक तो हो ना?”
मला कळेना, हे असं का विचारताहेत. फोन ठेवला आणि परत तसाच झोपून गेलो.
पण थोड्या वेळाने उठून बसतो, तो मला उठताच येईना. माझी पाठ अशी काही धरली होती की मला हलताही येत नव्हतं. दोन दिवस लागले बरं व्हायला. पुन्हा ‘गोपाळ’वर बसायचं धाडस झालं नाही. हा घोडा ‘पीठ का ख़राब’ का, याचं उत्तर मात्र कोणालाच माहिती नाही.
‘एनडीए’त पुष्कळ घोडे, त्यामुळे त्यांच्या तितक्याच गमती. एखादी घोड्यांची टोळी निघाली की तिथे सांगतात- ‘इंडोनेशिया’को पीछे रखो। कारण दुसरा घोडा जवळ आला की हा ‘इंडोनेशिया’ नावाचा घोडा त्याला लाथ मारणारच. ‘टायटन’ला ‘बादल’ सोबत ठेवायचं नाही, कारण ‘टायटन’ फक्त ‘बादल’लाच लाथ मारतो. हे असं का? माहिती नाही. तुम्ही टोळी कशीही ठेवा – अमुक घोडा पुढेच जाणार. कितीही प्रयत्न करा, जो मागे राहणार नाही. काही घोडे अतिशय एकलकोंडे असतात. त्यांचं कुणाशीच पटत नाही. मग त्यांना एका बाजूला बांधलं जातं. तर काही आनंदाने राहणाऱ्या जोड्याही असतात. कुठला घोडा कसा वागेल हे त्यांना सांभाळणाऱ्या ग्रूम्सना बरोबर माहिती असतं. त्यामुळे आपण ग्रूम्सचं ऐकायचं. गोपाळच्या बाबतीतही मी ग्रूम चं ऐकलं असतं तर मला दोन दिवस पाठ धरून बसावं लागलं नसतं.
‘एनडीए’त ‘पिकपॉकेट’ नावाचा एक घोडा होता. त्याच्या जवळ गेलं की तो हमखास लाथ मारणार किंवा पाठीवर बसलेल्या माणसाला खाली पाडणार. ही खाली पाडण्याचीही त्याची एक कला होती. त्याला पाणी खूप आवडायचं. पाणी दिसलं की भले पाठीवर कोणीही असो, तो पाण्याजवळ जाणार आणि त्यात लोळायला सुरुवात करणार.
काही घोडे अडून बसतात. घोडा अडतो म्हणजे काय ? अनेकदा चालता चालता एका क्षणी घोडा थांबतो, पुढे जात नाही. तिथून मागे फिरायचं नाव घेत नाही. तुम्ही काहीही करा, त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. अडेलटट्टू, नाठाळ हे शब्द त्यावरूनच आपल्याकडे आले असावेत. मला आमच्या घरच्या घोड्यांचाही असा अनुभव यायचा. घरातून बाहेर पडावं, एखाद्या ठिकाणी जाण्याचं ठरवावं; पण घोड्याच्या मनात नसेल तर काय वाट्टेल ते होवो, तो मला परत आमच्या घरी आणूनच थांबायचा. ‘एनडीए’तल्या घोड्यांचाही असा अनुभव आला.
घोड्याने एकदा मनावर घेतलं की ते कोणीच बदलू शकत नाही. एखाद्या रुबाबदार घोड्यावर बसण्यात शान असते; पण आपण घोड्याच्या मर्जीने बसलो आहोत हे विसरून चालत नाही. नाही तर तो आपल्याला कुठे फेकून देईल हे कळणारही नाही.
खरं म्हणजे यात न कळण्यासारखं काही नाही. मुळात घोडा स्वतंत्र बुद्धी असलेला प्राणी आहे. त्याच्या अंगात मजबूत ताकद आहे. आपल्या पाठीवर कुणी तरी बसावं हे त्याला नकोच असतं. आपल्या तोंडात लगाम असणार आहे, पाठीवर खोगीर पडणार आहे आणि त्यावर माणूस बसणार आहे, या तीन गोष्टींची घोड्याला सवय लावणं अवघड असतं. ते काम सावकाश, घोड्याला समजून घेत करावं लागल. त्यासाठी आधी घोड्याशी दोस्ती करावी लागते.
शेवटी पळणं, दौडणं हे घोड्याचं आवडतं काम. ते त्याला खुषीने करू दिलं तर तो अगदी ऐटीत आणि आनंदाने तुम्हाला सैर घडवतो. घोड्याला बाहेर काढताना त्याच्या पाठीवरून हात फिरवा, त्याच्याशी बोला. सवारीसाठी त्याची मानसिक तयारी करा. हळूहळू तो घोडा रंगात यायला लागतो. त्याच्या तोंडात लगामाचा जो स्टीलचा भाग असतो त्याच्याशी तो खेळू लागतो. दातांवर घासून त्याचा तो एक विशिष्ट आवाज काढू लागतो. त्यामुळे त्याच्या तोंडातून फेस येऊ लागतो. फेस आला की समजायचं, आता घोडा सवारीसाठी तयार आहे. कुणी घाईने, दामटून घोडा चालवायचा प्रयत्न केला तर ते घोड्याला आवडत नाही. तो सरळ मान खाली घालतो आणि मागचे पाय उडवतो आणि पाठीवर बसलेल्याला एखाद्या चेंडूसारखं भिरकावून देतो. तुम्हालाही कुणी काय करा आणि काय करू नका हे सांगितलेलं कुठे आवडतं? तसंच.
एकूणच, घोड्यावर सवारी करताना त्याच्याशी सतत बोलावं लागतं. प्रत्येक घोडेस्वाराची घोड्याशी गप्पा मारण्याची पद्धत वेगळी असते; भाषा वेगळी असतेच. घोड्याशी सतत बोलत राहिल्याने तुम्हाला काय पाहिजे हे त्याला कळू शकतं. घोड्याशी मैत्री करण्याचं आणखी एक साधन म्हणजे त्याच्या तोंडातला लगाम. घोडेस्वार लगाम खेचत असतो तेव्हा तो घोड्याचं नियंत्रण तर करत असतोच; पण त्यामुळेच घोड्याला कळतं, की घोडेस्वाराचं आसपास लक्ष आहे; तो स्वतःला आणि आपल्याला काहीही होऊ देणार नाही. एकदा का घोड्याला याची खात्री पटली की तोसुद्धा घोडेस्वाराला काही होऊ द्यायचं नाही याची काळजी घेतो.
घोड्यांबद्दल मी कितीही बोलू शकतो. प्रत्यक्षात घोड्याला त्याचं हे इतकं सगळं कौतुक सांगावं लागत नाही. मी त्याच्या पाठीवर एक थाप मारली की त्याला ते कळतं. तो आपली कातडी थरथरवत मला ते सांगतो. कारण मी आणि घोडा आता ‘बेस्ट फ्रेन्ड्स’ आहोत.
Leave a Comment