Story of Four friends and a doll in Marathi : चार मित्र आणि बाहुली गोष्ट
एका गावात चार मित्र राहत होते सुतार, शिंपी, सोनार आणि ब्राह्मण. कामधंदयाच्या शोधासाठी त्यांनी दुसऱ्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाने आपापल्या कामधंदयाशी निगडीत असणाऱ्या वस्तू आपल्याबरोबर घेतल्या आणि ते निघाले.
त्यांना वाटेत एक जंगल लागले. रात्र झाल्यावर ते जंगलात एका झाडाखाली बसले. सोनार म्हणाला, “मित्रांनो, जंगलात चोर, डाकू आणि जंगली जनावरांची भीती आहे. माझ्याजवळ तर सोनंसुद्धा आहे. म्हणून आता आपण पाळीपाळीने जागूया.”
सर्वांना हा विचार पटला. ठरवलेल्या क्रमानुसार सर्वांत पहिल्यांदा सुताराची पाळी होती. तो जागत बसला आणि बाकीचे तिघेजण झोपी गेले.
झोप येऊ नये म्हणून काहीतरी काम करावे, असे सुताराने ठरवले. त्याला एक कल्पना सुचली. त्याने पिशवीतून आपली अवजारे काढली. मग त्याने एका झाडाची फांदी कापली आणि त्या लाकडातून तो बाहुली बनवू लागला. पाहता पाहता बाहुली तयार झाली. एवढ्यात त्याची जागे राहण्याची वेळ पूर्ण झाली. त्यामुळे त्याने शिंप्याला उठवले. त्याला ती लाकडाची बाहुली देऊन सुतार झोपी गेला.
लाकडाची ती सुंदर बाहुली पाहून शिंप्याने तिला सजवण्याचे ठरवले. त्याने पिशवीतून कापड काढून बाहुलीसाठी एक छान पोशाख तयार केला. पोशाख घातल्यावर बाहुली अधिकच सुंदर दिसायला लागली.
इतक्यात शिंप्याची जागे राहण्याची वेळ पूर्ण झाली. त्यामुळे त्याने सोनाराला उठवले आणि त्याच्याकडे बाहुली देऊन तो झोपी गेला. सोनारानेसुद्धा आपले कौशल्य दाखवले. त्याने आपल्या झोळीतून सोने काढले. मग त्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील हार, कानातल्या कुड्या इत्यादी दागिने बनवून बाहुलीला सजवले.
सोनाराची जागे राहण्याची वेळ पूर्ण झाली. आता ब्राह्मणाची जागे राहण्याची पाळी आली. सुंदर पोशाखाने आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली सुंदर बाहुली पाहून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. त्याने आपल्या विद्येच्या जोरावर बाहुलीला सजीव करण्याचा निश्चय केला. त्याने काही मंत्र म्हटले आणि बाहुलीवर पाणी शिंपडले. लगेचच बाहुली डोळ्यांच्या पापण्या मिचकावू लागली आणि गोड गोड हसू लागली. आता ती एक जिवंत सुंदर मुलगी झाली होती.
दरम्यान सकाळ झाली. त्यामुळे सुतार, शिंपी आणि सोनार सर्वजण उठले होते. त्यांनी त्या सुंदर मुलीला पाहताच प्रत्येकाच्या मनात तिच्याशी लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली.
सर्वांत पहिल्यांदा सुतार म्हणाला, “या कन्येला मी बनवले आहे. म्हणून फक्त मलाच हिच्याबरोबर विवाह करण्याचा अधिकार आहे.”
शिंपी म्हणाला, “पण हिच्यासाठी सुंदर पोशाख तयार करून मीच हिचा शृंगार केला आहे. म्हणून मलाच हिच्याबरोबर विवाह करण्याचा अधिकार आहे.”
also read: Story of Teacher and Student in Marathi
सोनार म्हणाला, “हिच्याबरोबर विवाह करण्याचा अधिकार माझा आहे. कारण मीच हिला सोन्याचे सुंदर दागिने घातले आहेत.”
ब्राह्मण म्हणाला, “जर का मी हिला जिवंत केले नसते, तर हिच्याशी लग्न करायचा विचार तरी तुम्ही केला असता काय ? मी हिला जीवन दिले आहे, म्हणून फक्त मलाच हिच्याबरोबर विवाह करण्याचा अधिकार आहे.”
चारही मित्र आपापसांत भांडू लागले. कोणीही कोणाचेच म्हणणे मान्य करायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी गावात जाऊन तिथल्या सरपंचाकडून निर्णय घेण्याचा निश्चय केला.
चारही मित्र त्या मुलीला घेऊन गावात आले. त्यांनी सरपंचाला सर्व हकीकत सांगितली. सरपंचाने थोडा वेळ विचार केला आणि मग आपला निकाल ऐकवला –
“सुताराने बाहुली बनवली आणि ब्राह्मणने तिला जीवन दिले; म्हणून हे दोघे हिचे जन्मदाता ठरतात. त्यामुळे सुतार आणि ब्राह्मण हे हिच्याबरोबर विवाह करू शकत नाहीत. शिंप्याने बाहुलीला पोशाखाने सजवले. या प्रकारची भेट आजोळकडून येते. त्यामुळे शिंपी बाहुलीचा मामा झाला. म्हणून शिंपीसुद्धा हिच्याबरोबर विवाह करू शकत नाही. मुलीला वरपक्षाकडून दागिने दिले जातात. हे काम तर या सोनारानेच केले आहे. त्यामुळे सोनारालाच हिच्याबरोबर विवाह करण्याचा अधिकार आहे.”
हा निकाल ऐकून सोनार खुश झाला; परंतु सुतार, शिंपी आणि ब्राह्मण निराश झाले. पण त्यांना सरपंचाचा निकाल स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्हते. नंतर सोनाराबरोबर त्या मुलीचे लग्न थाटामाटात पार पडले.