Story Good Touch & Bad Touch In Marathi : गुड टच बॅड टच
चिंगी धापा टाकत घरी आली. हातात थोडासा खाल्लेला हिरवागार अर्धा-कच्चा पेरू, मळलेला फुलाफुलांचा पिवळा फ्रॉक, त्याचे सुटलेले, शेपटांसारखे बंद आणि चेहऱ्यावर हे भलं मोठं आश्चर्य! एका बोटाने मान वाकडी करून, ती दातात अडकलेल्या पेरूच्या बिया काढत मोठ्यांदा म्हणाली,
“आजी, आजी, आज ना एक गंमत झाली..!” चिंगी, पळत पळत जाऊन, झोपाळ्यावर पुस्तक वाचत बसलेल्या आजीच्या पायाशी बिलगून उभी राहिली. आजीने चश्मा काढला, पुस्तक बाजूला ठेवलं, आणि ती चिंगीला झोपाळ्यावर उचलून घेत म्हणाली,
“काय झालं चिंगुशेठ..!”
“अगं तो समीरदादा आहे ना, समोरच्या
घरातला; त्याने मला आपल्या बागेतला पेरू काढायला मदत केली. मी झाडावर चढून स्वतः काढला.. हे बघ..!”
आजीच्या मांडीवर बसून, तिच्या डोळ्यांपुढे तो पेरू नाचवत चिंगीची बडबड सुरूच राहिली. “आणि ना.. पेरू काढताना माझी चड्डी फांदीत अडकून खालीच आली.. मग समीरदादाने मला परत चड्डी नीट घालून दिली..!” खी-खी खिदळत चिंगीने पेरू नाचवत आजीला गंमत सांगितली. फ्रॉक वर करून कोपऱ्यात किंचित फाटलेली चड्डीपण दाखवली. आजीने चिंगीच्या पाठीवर एक शाबासकी दिली, आणि हळूच पेरूचा एक छोटासा तुकडासुद्धा तोडला !
इतक्यात चिंगीचा दादासुद्धा दरवाजातून सुसाट वेगाने तिथेच आला आणि म्हणाला,
“वेडी.. चड्डीपण घालता येत नाही नीट! मी बघितलं समोरून. आजी, माहितीये का, आम्ही सगळे मित्रमैत्रिणी हसत होतो चिंगीला. मला तर वाटलेलं पडतीये की काय आता..!” चिंगीला वेडावत दादा म्हणाला
Also read:- Majhi Ladki Bahin Yojana Apply Online 2024
चिंगीने आजीच्या मांडीवरूनच, दादाला एक फटका मारला. दादाने हळूच खाली वाकून तो चुकवला, आणि आजीच्या शेजारी, उभा रहात मोठ्या माणसाच्या आविर्भावात चिंगीला म्हणाला, “ए, पण असं चड्डीला नाही हात लावू दयायचा कोणाला ! कळलं का चिंगुशेठ !” चिंगीच्या कपाळावर प्रश्नचिन्हांच्या कित्येक आठ्या जमा झाल्या. ती लगेच म्हणाली,” का? त्याने नीट केली नसती तर चड्डी फांदीलाच लटकली असती ना..” टिंग डिंग… टिंग… चिंगीने हातांचाच झोका करत कशी लटकली असती ते
दाखवलं. आजी आणि दादा जोरात हसायला लागले !
इतक्यात चिंगीचा बाबा आणि आईपण ऑफिसमधून आले आणि चिंगीने पटकन आईकडे झेप घेतली !
“हं, काय चाललंय चड्डी पुराण?” बाबाने विचारलं तसे सगळेच हसायला लागले.
“अरे बाबा, मी ना चिंगीला सांगत होतो. काल आम्हांला शाळेत सांगितलं रे, गुड टच बॅड टच..”
दादा, बाबा-आईला पाणी आणून देत म्हणाला.
मग सगळे आजीच्या भोवती, तिथेच खाली बसले.
“हो का? वा.. काय सांगितलं?” आईने विचारलं.
चिंगी परत खेळायला धूम ठोकू लागली, तसं दादा म्हणाला, “ओ चिंगुशेठ ऐका तुम्हीपण, तुम्हांलाच सांगतोय” चिंगीचा फ्रॉक ओढत दादाने तिला खाली बसवलं.
“तर ना, काल एक ताई आली होती, काऊंसेलर. तिने सांगितलं की, आई-बाबा, घरची माणसं, आणि ओळखीचे, अनोळखी असे कोणीही, त्यांनी आपल्याला कुठे कुठे हात लावला, कसा कसा हात लावला, तर गुड टच, आणि हे सगळं सोडून उरलेला बॅड टच..!”
“पण दादा… मला नाही कळलं.. आणि मला कोणी ‘बुड-टच’ केला तर मला कसं कळणार? चिंगी थोडासा उरलेला पेरू दादाशी शेअर करत म्हणाली.
सगळे चिंगीच्या ‘बुड टच’ ला हसायला लागले.
“भारी ना ‘बुड-टच’, म्हणजे बुडाला केलेला नको असलेला टच… चांगलं नाव दिलंय चिंगीनं!” दादा हसत, त्याचं बूड दाखवत म्हणाला.
आईने लग्गेच डोळे वटारले..!
“ए दादा, काय बोलतोयस? आं!!”
बाबा, आजीपण आईला हसायला लागले, दादा मग जरा अजून धीटपणानं बोलू लागला.
“हे बघ, मी दाखवतो चिंगी.. इथे म्हणजे आपल्या छातीच्या या दोन्ही उजव्या, डाव्या भागात, आणि इथे आपल्या ओठावर, आणि इथेपण, मांडीला, बुडाला आणि महत्त्वाचं या इथे खाली…”
“म्हणजे इथे ना?” तोंडावर हात ठेवत, पुढचे पडलेले दात झाकत चिंगी खिदळत म्हणाली.
आई बाबा कौतुकाने दादाकडे बघत होते, आणि आजी गालातल्या गालात हसत होती.
“हो गं, चिंगुशेठ ..! शू च्या जागी, आणि शी च्या जागी ! पुढचं ऐक गं, नुसता हात नाही, जर कोणी आपले कपडे काढायला लागलं, किंवा या इथे, मी तुला आता दाखवलेल्या कुठेही पप्पी घ्यायला लागलं, किंवा आपल्याला गुदगुल्या करायला लागलं तर तो सुद्धा ‘बुड-टच’ च बरं का..! कोणी चड्डीला हात लावला, ती ओढली, किंवा आपल्याला जोरात पकडायला सुरुवात केली, किंवा चावायला लागलं कोणी, तर आरडाओरडा करायचा, जोरात..! डायरेक्ट.. कळलं का?”
“ए म्हणजे मला आत्ता समीर दादाने ‘बॅड-टच’ केला का?” चिंगीने आईला घट्ट पकडत दादाला विचारलं.
“अगं वेडाबाई, त्याने तुझी चड्डी काढली नाही, नीट केली. आणि झाडावरून पण छानपैकी खाली उतरवलं ना, काखेत धरून..!”
आजी, चिंगीच्या डोळ्यांवरचे केस मागे घेत म्हणाली.
“हो पण नंतर पप्पी घेतली ना गालावर..!”
चिंगी पुन्हा डोळे मोठे करून, गालाला हात लावून म्हणाली.
“बरोबर, पण तो नेहमीच तुझी पप्पी घेतो की, खेळताना आणि दादापण घेतो, बाबा, आजी, सगळेच तुझे लाड करताना घेतात ना पप्पी..!
आई चिंगीला समजावत.
“हं… म्हणजे लाड आणि ‘बॅड-टच’ वेगळा, बरोबर ना? पण आईनेपण मला ‘बॅड-टच केला होता.. आता कट्टी तिच्याशी..! तिने ना, काल आंघोळ घालताना, दादाने सांगितलं तिथं सगळीकडे हात लावला, साबण लावलं, नंतर पावडरपण लावली..!
आता सगळेच जोरात हसायला लागले. दादा आपलं हसणं आवरत म्हणाला…
“पूर्ण ऐका ना चिंगुशेठ… तर ती ताई हेच संगत होती, की आपल्या घरचे, किंवा आपण ज्यांना ओळखतो त्यांनी असा हात लावला तर चालतं.. तो काही ‘बॅड-टच’ नाही.. पण अगदी माहीत नसलेली माणसं, त्यांनी असा हात नाही लावायचा आपल्याला.”
“समजा, ओळखीच्या माणसाने, असा ‘बॅड- टच’ केला तर ते कसं कळणार रे दादा तुला?” बाबाने विचारल.
“आं.. हां आठवलं.. ताई म्हणत होती, की तुम्हांला कोणी हात लावला की मस्त, छान वाटल पाहिजे, मग ते कोणीही असो! आणि ‘घाण’, ‘ई’ आणि ‘कसंतरीच’ वाटलं, आवडलं नाही, की तर 2 ‘बॅड-टच’. म्हणजे, आपण कसे टाळ्या देतो, किंम बाबा कसं आम्हाला उंच टाकून झोका करतो, किंवा ती शेजारची वृंदाताई नाही का, सारखे गालगुच्चे घेते, गुदगुल्या करते, ते छान वाटतं! ताईने अजून एक सांगितलं. ती म्हणाली की, जर कोणी तुम्हांला, चॉकलेट, आईसक्रीम, लाडू, काहीही देऊन एकटंच घरी बोलावत असेल, आणि खेळ म्हणून असं, काही करत असेल तर तो पण ‘बॅड-टच’ च..! मग ते कोणीही असलं तरीही. कोणताही खेळ खेळताना, आपण मुलांनीसुद्धा एकमेकांच्या या सगळ्याच जागी, उगीच सारखा हात लावायचा नाही. चुकून लागला तर ‘सॉरी’ म्हणायचं. कोणी मुद्दाम, सारखा हात लावत असेल तर लगेच त्याच्या किंवा आपल्या आई-बाबांना सांगायचं ! मोठ्या माणसांपैकी कोणीही, म्हणजे कुठले, आजोबा, आजी, ताईदादा, काका, रिक्षातले, शाळेच्या बसमधले काका, शाळेतले शिपाई काका, मावशी, किंवा अगदी आपल्या शिक्षकांपैकी म्हणजे टीचर्सपैकी जरी कोणी असं केलं तर ना घाबरता लगेच आई-बाबांना सांगायचं!” दादा इतकं बोलून जरासा थांबला तसं चिंगी
म्हणाली.
“बापरे.. इतकं सांगितलं दादा तुला? पण तरी मला कसं कळणार तो ‘गुड-टच’ का ‘बॅड-टच’?” दादाने कपाळावर हात मारला, मग चिंगीच्या
जवळ जात म्हणाला, “नीट ऐक. आता काल तुला आईने आंघोळ घालताना तू गाणी म्हणत होतीस ना, नंतर उड्या मारत होतीस, म्हणजे ते आवडते तुला! आणि आपली काळजी घेणारी माणसं, आपल्याला कधीच इजा पोहचवत नाहीत गं चिंगी ! म्हणजे; ओरबाडणं, जोरजोरात चावणं असं करत नाहीत. मजेत केलं तरीपण आपल्याला काही होऊ देत नाहीत, किंवा आपल्याला नको असताना हातसुद्धा लावत नाहीत. झालं की नाही सोपं !”
चिंगी आता दादाकडे पाहत, विचार करत म्हणाली,
“हं.. ए म्हणजे मला समीर दादाने ‘बॅड-टच’
नाही केला काय..! आणि आईने पण नाही..!” असं म्हणत चिंगीने बाबाची पप्पी घेतली, पेरूचे चिकट हात बाबाच्या शर्टाला पुसले आणि दरवाजाकडे धूम ठोकली तशी आई मागून ओरडली
“चिंगी, थांब, आता नाही जायचं गं खेळायला…”
चिंगी मागे बघून म्हणाली,
“खेळायला नाही काही, आता सगळ्या मित्र- मैत्रिणींना जमवून मी सांगणार आहे. ‘गुड-टच’ आणि ‘बुड-टच’ हे आपलं ‘बॅड-टच’ म्हणजे त्यांनापण कळेल..!”
आता तुम्ही सगळेसुद्धा हे वाचून, इतरांना हे वाचायला देणार ना? आणि समजावूनपण सांगणार ना? नक्की सांगा !