Story Of Rupali & Rajkumar In Marathi: रूपाली आणि राजकुमार गोष्ट
एक मुलगी होती. तिचे नाव रूपाली होते. ती दिसायला सुंदर आणि गुणी होती. तिचे वडील श्रीमंत होते. त्यांना सर्वजण शेटजी म्हणत असत. रूपालीची आई वारल्यामुळे शेटजींनी दुसरे लग्न केले होते. शेटजींच्या या दुसऱ्या बायकोला दोन मुली होत्या. रूपालीची ही सावत्र आई आणि सावत्र बहिणी रूपालीला खूप त्रास देत असत. हे सर्व माहीत असूनसुद्धा शेटजी आपल्या दुसऱ्या पत्नीला व तिच्या मुलींना काही बोलू शकत नव्हते.
शेटजी ज्या शहरात राहत होते, त्या शहराचा राजकुमार विवाह करण्यायोग्य झाला होता. त्याच्यासाठी सुयोग्य मुलगी शोधली जाणार होती. त्यासाठी शहरातील अनेक सुंदर मुलींना एके दिवशी राजमहालात आमंत्रित केले होते. त्यात शेटजींच्या दोन मुलीसुद्धा होत्या. दोन्ही मुली सुंदर पोशाख आणि दागिने घालून राजमहालात गेल्या होत्या.
रूपाली आपल्या दोन्ही सावत्र बहिणींपेक्षा अधिक सुंदर होती; परंतु तिला आमंत्रण मिळाले नव्हते.
ती उदास अवस्थेत घरातच बसली होती. अचानक एक परी तेथे आली आणि म्हणाली, “रूपा, तू का बरं उदास आहेस ? तुला राजकुमाराबरोबर लग्न करायचंय का ?”
रूपालीने हात जोडले आणि ती परीला म्हणाली, “मला राजकुमाराबरोबर लग्न करण्याची इच्छा तर आहेच; पण मी राजमहालात कशी जाऊ ? मला तर आमंत्रणसुद्धा मिळालं नाही. शिवाय माझ्याजवळ सुंदर सुंदर पोशाख आणि दागिनेसुद्धा नाहीत. तेथे मला कोण जाऊ देईल ?”
परी म्हणाली, “मी तुला मदत करीन. मी तुला सुंदर पोशाख आणि दागिने देईन. राजमहालात जायला एक घोडागाडीसुद्धा देईन. पण एक लक्षात ठेव, तुला रात्री बारा वाजेपर्यंत घरी परत यावंच लागेल.”
रूपाली राजमहालात जाण्यासाठी तयार झाली. परीने रूपालीला सुंदर पोशाखाने आणि दागिन्यांनी नटवले. आता तर रूपाली अधिकच मोहक दिसू लागली. इतक्यात तेथे एक डौलदार घोडागाडी हजर झाली. रूपालीचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती एखादया राजकन्येसारखी घोडागाडीत बसून राजमहालात पोचली.
राजमहालात अनेक सुंदर मुली आल्या होत्या. राजकुमार त्या मुलींची ओळख करून घेत होता. इतक्यात राजकुमाराचे लक्ष रूपालीकडे गेले. तिचा सुंदर चेहरा, सुडौल बांधा, तिचे मोहक हसणे, तिचे ऐटदार चालणे, सुंदर पोशाख आणि दागिने …! अहाहा ! सर्वच काही दिपवून टाकणारे होते. राजकुमार पाहतच राहिला. त्याने रूपालीला आपल्याजवळ बोलावले. तिला गुलाबांचा गुच्छ दिला. मग तोतिला आपला राजवाडा दाखवायला घेऊन निघाला. पण रूपाली मात्र सावध होती. तिचे घड्याळावर लक्ष होते. बारा वाजण्यापूर्वीच तिने राजकुमाराचा निरोप घेतला आणि बरोबर बारा वाजता ती घरी पोचली.
Also read:- MLC Legislative Election 2024
दुसऱ्या दिवशी परत सर्व मुलींना राजमहालात बोलावले गेले. रूपालीच्या सावत्र बहिणी पुन्हा नटूनथटून राजमहालात गेल्या. रूपाली घरात एकटीच होती. इतक्यात तीच परी परत तेथे हजर झाली. तिने रूपालीला पुन्हा राजमहालात जाण्यासाठी पोशाख व दागिने घालून नटवले आणि घोडागाडीत बसवून राजमहालात पाठवून दिले. राजकुमार तिचीच वाट पाहत होता. तिला पाहताच राजकुमार खुश झाला. त्याने तिला आपल्या संपूर्ण राजवाड्यात फिरवले. ती दोघे जेवायलासुद्धा एकत्रच बसली. घड्याळाचे काटे बाराकडे सरकत होते, हे रूपालीच्या लक्षात आले. त्यामुळे रूपाली घरी जाण्यासाठी घाईघाईने राजमहालातून बाहेर पडली. त्या घाईत ती राजमहालाच्या पायऱ्यांवर अडखळली आणि तिच्या एका पायातील बूट तिथेच पडला. मग ती तशीच घोडागाडीत बसली आणि घरी परतली.
राजकुमाराने रूपालीला घाईघाईने जाताना पाहिले. तो धावतच तिच्यामागोमाग राजमहालाबाहेर पडला. पण तोपर्यंत रूपाली फार दूर निघून गेली होती. त्याला केवळ रूपालीचा पडलेला बूट तेवढा मिळाला. त्याला तर रूपालीचे नावसुद्धा ठाऊक नव्हते. आता त्याच्याकडे फक्त रूपालीचा बूट तेवढा होता.
आता राजकुमाराला रूपालीशिवाय चैन पडत नव्हते. परंतु तो तिला शोधून तरी कसा काढणार ? शेवटी राजकुमाराने एक युक्ती केली. त्याने जाहीर केले की, “या शहरातील ज्या मुलीच्या पायात हा बूट अगदी बरोबर बसेल, त्या मुलीशी मी विवाह करीन.”
राजाचे सेवक बूट घेऊन शहरातील घराघरांतून फिरू लागले. कोणत्याही मुलीच्या पायात तो बूट नीट बसत नव्हता. सेवक फिरता फिरता रूपालीच्या घरी पोचले. रूपालीच्या सावत्र बहिणी धावतच सेवकांकडे गेल्या. त्या बुटामध्ये त्यांचा पाय नीट बसावा, असा प्रयत्न त्या करत होत्या. पण ते काही त्यांना शक्य झाले नाही. रूपाली आपल्या घरकामातच गुंतलेली होती. सेवकांनी रूपालीला जवळ बोलावले. ते पाहून तिच्या सावत्र बहिणींनी नाके मुरडली. रूपाली सेवकांजवळ गेली. सेवकांनी रूपालीच्या पायात बूट घातला. तिचा पाय त्या बुटामध्ये अगदी बरोबर बसला. जराही घट्ट नाही की जराही सैल नाही ! रूपालीच्या सावत्र बहिणी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिल्या. मग रूपालीने तिच्याजवळ असलेला दुसऱ्या पायातला बूट सेवकांना दिला. त्यामुळे ते दोन्ही बूट रूपालीचेच असल्याची त्यांची खात्री झाली.
राजाचे सेवक रूपालीला घोडागाडीत बसवून राजमहालात घेऊन गेले. रूपालीला पाहून राजकुमार फार खुश झाला. लवकरच राजाने राजकुमाराबरोबर रूपालीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले.
Leave a Comment