The Old Fairy and The Princess in Marathi : म्हातारी परी आणि राजकुमारी गोष्ट.
एक राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते. राजा-राणीला या गोष्टीचे फार दुःख होत असे. एके रात्री राजाच्या स्वप्नात एक परी आली आणि राजाला म्हणाली, “राजा, तू निराश होऊ नकोस. लवकरच तुझ्या घरी मुलगी जन्माला येईल.”
काही काळाने राणीने एका मुलीला जन्म दिला. राजा-राणीला खूप आनंद झाला.
मुलगी झाल्याच्या आनंदात राजाने एक भोजन-समारंभ आयोजित केला. स्वर्गातील सहा पऱ्यांनासुद्धा या समारंभाचे आमंत्रण दिले गेले. भोजन-समारंभास त्या सहा फ्ऱ्या आल्या आणि त्या आसनावर विराजमान झाल्या. त्या जेवायला सुरवात करणार, इतक्यात मोठा गडगडाट झाला. एक म्हातारी परी तेथे प्रकट झाली आणि राजाला म्हणाली –
“मी सर्वांत मोठी परी आहे. माझ्याच आशीर्वादामुळे तुला मुलगी झाली आहे. पण तू मला मात्र भोजनाचे आमंत्रण दिले नाहीस. त्यामुळे माझा अपमान झाला आहे. मी शाप देते की, जेव्हा ही राजकुमारी केरसुणी हातात धरील, त्याच वेळी तिचा मृत्यू होईल.” इतके बोलून ती म्हातारी परी अदृश्य झाली.
या घटनेमुळे रंगाचा बेरंग झाला. आनंदी वातावरण दुःखमय झाले. राजा आणि राणी चिंतेत पडली.
राजा-राणीला दुःखी पाहून एका परीला दया आली. ती राजा-राणीला धीर देत म्हणाली, “राजा, मी तो शाप नाहीसा करू शकत नाही, पण मी त्याचा प्रभाव नक्कीच कमी करू शकेन. राजकुमारीचा मृत्यू होणार नाही; पण ती बेशुद्ध पडेल. असे घडल्यावर काही वेळानंतर एक राजकुमार महालात येईल. तो राजकुमार तुझ्या राजकुमारीला शुद्धीवर आणील.”
त्यानंतर त्या सहाही फ्ऱ्या अदृश्य झाल्या.
म्हाताऱ्या परीच्या शापामुळे राजकुमारीला त्रास होऊ नये, म्हणून राजा- राणी खूपच सावधानता बाळगत. राजकुमारीने हातात चुकूनही केरसुणी घेऊ नये, यासाठी सर्व सेवकांना दक्षता घ्यायला सांगितले गेले.
also read : Siblings and fairies in marathi,
राजकुमारी हळूहळू मोठी होत होती. बघता बघता ती सोळा वर्षांची झाली.
एके दिवशी राजा शिकारीसाठी जंगलात गेला होता. राणीसुद्धा त्याच्याबरोबर होती. राजकुमारी तिच्या खोलीत एकटीच होती. त्याच वेळी एक वृद्ध स्त्री त्या खोलीत आली. तिच्या हातात केरसुणी होती. ती खोलीतला केर काढू लागली. राजकुमारीला त्या वृद्ध स्त्रीची दया आली. त्या वृद्ध स्त्रीच्या हातून केरसुणी घेऊन आपण स्वतःच खोली झाडावी, असे तिने ठरवले. ती त्या वृद्ध स्त्रीजवळ आली आणि तिने केरसुणी हातात घेतली. केरसुणी हातात घेता क्षणीच राजकुमारी बेशुद्ध पडली. त्यानंतर लगेच ती वृद्ध स्त्री अदृश्य झाली. ही वृद्ध स्त्री म्हणजे राजकुमारीला शाप देणारीच परी होती.
थोड्याच वेळात ही गोष्ट संपूर्ण राजमहालात पसरली. सेवक धावतच त्या खोलीत आले. राजकुमारीला बेशुद्ध पडलेले पाहून त्यांनी तिला पलंगावर निजवले. काही वेळाने राजा-राणीही परत आली. खोलीमध्ये राजकुमारी बेशुद्ध पडली होती. जवळच ती केरसुणी पडली होती. त्यांना परीने दिलेला शाप आठवला. ते खूप दुःखी झाले. आता ते राजकुमारीला शुद्धीवर आणणाऱ्या राजकुमाराची बेचैनीने वाट पाहू लागले.
दुसऱ्याच दिवशी राजाचे शिपाई एका तरुणाला पकडून राजाकडे घेऊन आले. तो तरुण म्हणाला, “महाराज, मी चोर नाही. मी राजकुमार आहे. आमच्या शेजारच्या राज्यातील राजाने आमच्या राज्यावर आक्रमण केले. आमच्या सैन्याची फाटाफूट झाली. त्यामुळे मला प्राण वाचवण्यासाठी तेथून पळ काढावा लागला. मला पळत असताना पाहून तुमच्या शिपायांनी मला पकडले आणि चोर समजून मला इथे घेऊन आले.”
राजा म्हणाला, “जर तू खरंच राजकुमार असशील, तर ते आताच सिद्ध होईल.” असे म्हणून राजा त्या राजकुमाराला घेऊन आपल्या राजकुमारीच्या खोलीत आला.
राजाने सांगितल्याप्रमाणे राजकुमाराने राजकुमारीच्या कपाळाला स्पर्श केला. राजकुमारीने हळूहळू डोळे उघडले. राजा-राणीला अतिशय आनंद झाला. आता मात्र तो तरुण राजकुमारच असल्याची राजाला खात्री पटली. मग राजा-राणीने आपल्या राजकुमारीचे लग्न त्या राजकुमाराबरोबर करून दिले. राजाने त्या राजकुमाराला आपले राज्य परत मिळवण्यासाठीसुद्धा मदत केली.