Story on Life without internet : इंटरनेटशिवाय जीवनावरील कथा
गुगल मॅपचा जन्म व्हायला अजून शंभर सव्वाशे वर्षं अवकाश होता तेव्हाचा काळ. दार्जिलिंगमध्ये किंथुप नावाचा एक साधा शिंपी रहात होता. त्याला बायको होती, मुलं होती. त्याच्या व्यवसायातून त्याची गुजराण कशीबशी होत होती. पण किंथुपकडे आणखीही काही गुण होते. तो पट्टीचा गिर्यारोहक होता. हुशार, विश्वासू होता. अशिक्षित असला तरी नवे तंत्र शिकून घेण्याची त्याची तयारी होती. बघितलेलं सारं त्याला नीट टिपून ठेवण्याची सवय होती. त्याचे हे गुण त्यावेळचा ब्रिटीश अधिकारी हेन्री हर्मन याच्या डोळ्यांत भरले. त्याच्याकडे किंथुपसाठी एक काम होतं.. फारच महत्त्वाचं काम.
हर्मन त्यावेळच्या सव्र्व्हे ऑफ इंडियाचा प्रमुख होता. त्यांचं कामच मुळी नकाशे तयार करणं असं होतं. तुम्हांला माहीतीये का की गुगल अर्थ वर स्थळ शोधण्याआधी आपण जे नकाशे वापरायचो त्यातले बहुतेक सगळे ब्रिटिशांनी बनवलेले होते. अतिशय अचूक आणि आणि बारीकसारीक गोष्टी नमूद केलेले नकाशे हे त्यांच्या नकाशांचं वैशिष्ट्य होतं.
‘पण ब्रिटिशांना भारताचे नकाशे का बनवायचे होते ?’ प्रश्न चांगला आहे.
ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं. आता राज्य करायचं म्हटल्यावर जमीन आणि माणसं यांची चांगली माहीती पाहिजेच ना !
ही आपली एवढी मोठी भूमी एवढ्याश्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न स्थानिक मंडळींनी फारसा केलाच नव्हता. कारण त्यांना कुठं दुरून कापूस आणायचा होता? त्याचं भारी कापड बनवून ते विकायचं होतं? सागवान लाकूड आणून त्यापासून रेल्वेचे स्लीपर तयार करायचे होते? ती मंडळी आपल्या भागात जे पिकत होतं ती खात होती, फार थोडा व्यापार उदीम करत होती. ब्रिटिशांनी हे चित्र बदललं ते त्यांच्या नकाशा करण्याच्या कलेच्या जोरावर. त्यांना ठाऊक हवा होता प्रत्येक डोंगर, नदी अगदी लहान झरासुद्धा. यातूनच त्यांनी ब्रम्हपुत्रेचा शोध घ्यायला सुरुवात केली. ब्रम्हपुत्र नदी माहीत आहे ना ?
Also read : How To Start CSC Centre In 2024`
एवढी मोठी नदी आहे की तिला नद म्हणतात. नदोबाच तो. या तीराला उभं राहिलं तर तिचा दुसरा तीर दिसत सुद्धा नाही.
ती कुठे उगम पावते सांगा पाहू? काय म्हणता, गुगल करता ?
जे आज आपण तीस सेकंदात शोधतो ते तेव्हा सोप्पं नव्हतं. अनेक वर्षे तिच्या उगमाचा शोध चालू होता. ब्रिटिशांना हे शोधून काढायचं होतं की तिबेटमधे उगम पावणारी ‘त्सांग पो’ ही नदी म्हणजेच भारतातून वाहणारी ब्रम्हपुत्र का ? शोधून काढणं अजिबात सोपं नव्हतं. मध्ये अख्खा हिमालय उभा होता. रस्ते नव्हते. बराचसा प्रवास पायी करायचा होता.
असल्या मोहिमेवर जायला कुणी क्वचितच तयार झाला असता. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिबेटमधे सगळ्यांना मुक्त प्रवेश नव्हता. तेव्हा ब्रिटिशांनी एका लामाची नियुक्ती केली. त्याला तिथे प्रवेश होता. किंथुप त्याचा शिष्य बनून तिबेटला निघाला.
किंथुप हाडाचा गिर्यारोहक होता हे खरंच. पण त्यांनी हाती (आणि पायी) घेतलेली मोहीम काय साधीसुधी होती होय? त्यात अनेक अडचणी असणार होत्या. किंथुप निघाल्यानंतर दर अर्ध्या मिनिटाला त्याला whatsapp करून तो कुठंय हे सांगता येणार नव्हतं. किंबहुना त्यांच्यात काहीच संपर्क होणार नव्हता हेच नक्की होतं.
मग परत आल्यावर किंथुपनं जे सांगितलं असतं त्यावर विश्वास कसा ठेवायचा ?
ब्रिटिश अधिकाऱ्याने विचार केला. शंकेचं निराकरण करण्यासाठी त्यांनी एक युक्ती ठरवली. ही जी नदी तिकडे त्सांग पो आणि इकडे ब्रम्हपुत्र होऊन वाहते ती मध्येच एका प्रचंड मोठ्या घळीत उडी घेते असं त्यांनी ऐकलं होतं. ती घळ तब्बल ९००० फुट खोल आहे. अर्थातच तेव्हा काही किती फूटबीट माहीत नव्हतं. पण अशी एक शिरकाव करायला अशक्य अशी अति खोल घळ आहे एवढंच ते ऐकून होते. तर आता किंथुपनं असं करायचं होतं की पाचशे ऑडके त्यानं त्या घळीतून सोडायचे होते. ते जर वाहत इकडे आले असते तर नदी एकच आहे हे सिद्ध झालं असतं..
आणि त्यानं तिथवर न जाता आधीच ओंडके सोडले असते म्हणजे? त्याच्यावर लक्ष ठेवायला लामा होता ना.. त्याला घेऊनच तो तिबेटपर्यंत जाणार होता.
पण हे लामा महाशय स्वतःच ‘फ्रॉड’ निघाले. त्यांनी जवळ असलेले सगळे पैसे वाटेत चैनबाजीत संपवले आणि पुढे जायला पैसे उरले नाहीत तेव्हा चक्क त्यांनी किंथुपला एका गावच्या मुखियाला नोकर म्हणून विकून टाकलं.
किंथुपमहाशय बिचारे बसले गुलामी करत. त्याची बिचाऱ्याची काहीच चूक नव्हती. पण त्यानं बरेच दिवस, महिने कष्ट केले. या काळातही त्याचं नदीचं आरेखन, नोंदी चालू होत्या. तो सुटण्याची संधी शोधत होता. तशी ती त्याला मिळालीही. तो पळाला. डोंगर- दऱ्यातून, जंगलातून, मिळेत ते खात पीत जात राहिला. एका गावापाशी पोचला तर तिथे त्याला आधीच्या गावाचे लोक पकडायला हाजीर होतेच. पण तिथल्या बौद्धमठाच्या अधिपतीला दया आली. त्यानं किंथुपला ठेवून घेतलं. आता किंथुप मठात राहू लागला. पण इथं तरी त्याला कुठं कायम राहायचं होत? त्याला त्याचं काम फत्ते करायचं होतं. तो ओंडके जमवत होता. पैसे साठवत होता. ठरवलं होतं त्यापेक्षा त्याला काम पूर्ण करायला खूपच जास्त दिवस लागले होते. तिकडे माणसं काय विचार करत असतील? हर्मन साहेब काय म्हणत असतील ? आणि माझी बायको-मुलं? किंथुपच्या मनात परतीचे वेध लागले होते. त्यानं एक पत्र लिहून घेतलं आणि भारतात पाठवलं. ते येणार म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं. टेक्स्ट करतो असं नाही! पोचण्याची हमी नव्हतीच. पण त्याच्याकडे दुसरा पर्याय तरी काय होता ?
त्यानं पत्र पाठवलं. पत्रात लिहिलं की ‘मी अमुक एक दिवशी ऑडके नदीत टाकतो आहे. तिकडे वाट बघावी.’ आणि त्याप्रमाणे त्यानं ओंडके टाकलेसुद्धा. त्याचं मिशन फत्ते झालं होतं. आता पुढचं काम ब्रिटीश अधिकाऱ्यांचं होतं. किंथुप तिथून निघाला आणि मजल-दरमजल करत आपल्या गावी येऊन पोचला.
पण कसले ओंडके आणि कसलं पत्रं. इकडे काहीसुद्धा मिळालं नव्हतं. ज्या अधिकाऱ्यानं त्याला तिकडे पाठवलं होतं तो मधल्या काळात इंग्लंडला परत गेला आणि भूगोल गोष्टी वारला. ही योजना पुरेशी गुप्त असल्यामुळे बाकी कुणाला त्याबद्दल फारसं माहीत नव्हतं. सगळ्यात वाईट म्हणजे किंथुपची बायकोही मधल्या काळात वारली होती आणि मुलं परागंदा झाली होती. किंथुप आणि त्याच्या त्या अचंबित करणाऱ्या कहाण्या यावर विश्वास ठेवणारं कुणी उरलं नव्हतं.
मग काय ? किंथुपनं त्याचं जुनं शिवणयंत्र घेतलं आणि तो पुन्हा एकदा त्याच्या जुन्या धंदयाला लागला. त्याची ती अद्भुत कहाणी त्याच्यापाशीच राहणार असं वाटू लागलं. अशी जवळपास वीस वर्षं गेल्यावर पुन्हा एकदा ब्रिटीश सरकारला तिबेटवर चढाई करण्याच्या वेळी किंथुपची आठवण आली. त्यानं वर्णन केलेल्या भल्या मोठ्या धबधब्याचं वर्णन त्यावेळच्या ब्रिटीश अधिकाऱ्यापर्यंत पोचलं होतं. त्यानं किंथुपला बोलावून घेतलं. इतक्या वर्षानंतर किंथुपनं आपल्या आठवणीची कवाडं पुन्हा उघडली आणि त्याच्या आठवणीतली ब्रम्हपुत्र कोसळू लागली. ब्रिटीश अधिकाऱ्याला अचंबा वाटला. त्यानं किंथुपचा पदक देऊन गौरव केला. त्यानं किंथुपला पेन्शन मिळावं यासाठी शिफारस केली म्हणतात. पण किंथुपसारखा चिवट मनुष्य बरेच दिवस जगेल आणि तिजोरीवर भार होऊन राहील असं भय सरकारला वाटलं. किंथुप आपल्या घरी परत आला. आणि त्याच वर्षी मेला. जणू काही तो आपली गोष्ट सांगण्यासाठीच जिवंत राहिला होता…
तुम्ही म्हणाल, आपण स्वतंत्र नव्हतो ना म्हणून असं झालं. आता नाही असं होणार..
पण जरा विचार करून बघा, आजही, सिलिकॉनच्या खोऱ्यात, कोळशाच्या खाणीत, किंवा अगदी आपल्या आजूबाजूलासुद्धा अवघड अस्वच्छ जागी, धोकादायक स्थितीत कामं करणारे किंथुप नसतील ?
आजचं नकाशा तंत्रज्ञान किंथुपच्या डोक्यावर पाय ठेवून उभं आहे म्हणा ना!
Leave a Comment