Story of Wow! Maestro, wow! in Marathi : वा! उस्ताद, वा! गोष्ट.
साधारण १९३० सालची गोष्ट आहे. पंजाबमधल्या गुरुदासपूर इञ्च एक नाटक कंपनी आली होती. ११-१२ वर्षांचा एक मुलगा आपल्या काकांबरोबर तिथे नाटक बघायला गेला. प्रत्यक्ष नाटकापेक्षा नाटकातल्या कलाकारांच्या आवाजासोबत वाजणारा तबला त्या मुलाला जास्त आवडला. त्याने ठरवून टाकलं, की आपण तबला वाजवायला शिकायचं. त्याच्या गावात तबला वाजवायला शिकवणारं कुणीच नव्हतं; पण त्याने तबला शिकण्याचा इतका ध्यास घेतला होता की तो घरातून पळून लाहोरला गेला. तिथे त्याने लहान-मोठ्या नोकऱ्या करत पैसे जमवले आणि तबला शिकायला सुरुवात केली.
हा मुलगा म्हणजे सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लारखाँ. त्यांच्या काळी तबलावादन ही वेगळी कला वगैरे काही नव्हती. गायकांना साथ करण्यासाठी वाजवलं जाणारं एक वाद्य, इतकीच तबल्याची ओळख होती. उस्ताद अल्लारखाँ यांच्यामुळेच तबलावादनाला प्रसिद्धी मिळाली.
तबला हे एक तालवाद्य आहे. आपण गाणी ऐकतो तेव्हा गाण्याची चाल कशी आहे, त्याचे शब्द कोणते याकडे आपलं जास्त लक्ष असतं, वेगवेगळी गाणी लक्षपूर्वक ऐकली तर प्रत्येक गाण्याला वाजवलं जाणार एक तरी तालवाद्य ऐकू येईल… कधी तबला, कधी पखवाज, कधी ढोलक तर कधी ड्रम.
‘तारे ज़मीं पर’ सिनेमात ‘जमे रहो’ या गाण्याच्या पहिल्या कडव्यामध्ये मोठा भाऊ कसा व्यवस्थित असतो, वेळेत खातो, शाळेला जातो हे दाखवलं आहे. दुसऱ्या कडव्यात छोटा ईशान दिसतो, तेव्हा एकदम गाण्याचा वेग कमी होतो आणि कोणतं वाद्य वाजतं ? तबला !
कुठल्याही गाण्यात किंवा संगीतात सूर, ताल आणि लय या तीनही गोष्टी महत्त्वाच्या असतात. लय म्हणजे गाण्याचा एक ठराविक वेग. गाण्याचा वेग तीन प्रकारचा असतो – विलंबित, मध्य लय आणि दृत लय. रस्त्यावरून रोडरोलर विलंबित लयीत जातो, एक्स्प्रेस हायवेवर मोठे ट्रक मध्य लयीत जातात आणि छोट्या गाड्या द्रुत लयीत जातात. सकाळी झोपेतून उठल्यावर आपली लय विलंबित असते आणि हळूहळू दृत होत जाते. काम केल्यानंतर संध्याकाळी आपली लय पुन्हा विलंबित होते. धोनीने शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून मॅच जिंकून दिली की आपण दृत लयीत नाचतो. दुःखी गाणी बहुतेक वेळा विलंबित लयीमध्ये असतात. शास्त्रीय गाणी विलंबित लयीमध्ये सुरू होतात आणि दृत लयीमध्ये संपतात. कोणतंही गाणं ऐकताना ताल आणि लय समजून ऐकलं तर ऐकायला आणखी मजा येते.
also read : Story of Greta Thunberg in Marathi.
ताल आणि लयीचा काय संबंध असतो ते पाहू या. एका लयीमध्ये चालत असताना आपण चार, पाच, सहा किंवा सात आकडे परत परत म्हणू शकतो. त्याला साध्या भाषेत ताल म्हणता येईल. ते आकडे म्हणजे तालाच्या मात्रा. वेगवेगळ्या तालांच्या मात्रांची संख्या वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, झपतालात १० मात्रा असतात. डोंगरावर चढताना आपण हळू चालत असतो. त्या वेळी एकाच लयीत १,२,३…९,१० असे आकडे मोजत राहिलो तर तो झाला ‘विलंबित झपताल’. उतरताना मात्र आपण भरभर उतरतो. तेव्हा एकाच लयीत दहा आकडे मोजत राहिलो तर तो ‘दूत झपताल’, दादरा तालात अशा सहा मात्रा असतात, एकतालात बारा मात्रा असतात, तर तीनताम सोळा मात्रांचा असतो.
तबल्याचे दोन भाग असतात- तबला आणि डग्गा. वाजवताना एका हाताने तबला वाजवला जातो आणि दुसऱ्या हाताने डग्गा. तबल्याचीही स्वतंत्र बाराखडी असते. त्याला तबल्याचे बोल म्हणतात. त्यातही तबल्यावर आणि डण्यावर वेगवेगळे बोल वाजवले जातात. ‘ता तीं तीं ता’ अशी अक्षरं तबल्यावर वाजतात. तबला-डग्गा एकत्र वाजवला तर ‘धा धिं घि धा’ वाजतात.
कोणत्याही गाण्याची लय ओळखणं, वेगवेगळ्या तालांतली गाणी ऐकणं, गाण्याला तबल्याची साथ कशी केली आहे याकडे लक्ष देणं, या गोष्टी करत राहिलं की आपले कान त्यासाठी तयार होतात. तीच तबला शिकण्याची पूर्वतयारी असते. स्वतः तबला वाजवायला शिकायला सुरुवात केल्यावरही वेगवेगळ्या वादकांचा तबला नियमितपणे ऐकणं, गुरूकडे शिकल्याप्रमाणे रोज रियाज करणं, तबल्याचे बोल म्हणणं, असा टप्प्याटप्प्याने तबला शिकता येतो.
तबलावादक गायकांच्या गाण्याला किंवा सतार- सरोद अशा वाद्यांच्या वादनाला साथ करतात. उस्ताद अल्लारखाँ यांनी सर्वप्रथम एकट्याने तबलावादनाचा कार्यक्रम केला. त्यापूर्वी तशी पद्धतच नव्हती. तबल्यामुळे अल्लारखाँना प्रसिद्धी मिळाली आणि तबल्यालाही अल्लारखाँमुळे प्रसिद्धी मिळाली असं म्हटलं जातं.
उस्ताद अल्लारखाँ हे उस्ताद झाकीर हुसेन यांचे वडील. झाकीर हुसेन लहानपणी पहाटे उठून वडिलांबरोबर तबल्याचे बोल म्हणायचे. शाळेत जाऊन आल्यावर थोडा वेळ तबला वाजवायचे. जेवण झाल्यानंतर, खेळून आल्यावर आणि अभ्यास केल्यानंतर परत तबला वाजवायचे. म्हणजेच तबला किंवा कोणतंही वाद्य शिकायचं असेल, गाणं शिकायचं असेल तर फक्त सुट्टीच्या वेळेत एखाद्या महिन्यासाठी छंद म्हणून क्लासला जाऊन चालणार नाही. त्यासाठी रोज किमान एक तास देणं आवश्यक आहे.
झाकीर हुसेन यांना एकदा वडिलांनी एका गायकाकडे,आठवड्यातून एकदा तबला घेऊन जायला सांगितलं. ते महान गायक म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खाँ. त्यांचा रियाज सुरू असताना झाकीर हुसेन ऐकत राहायचे आणि त्यांनी सांगितलं तर गायनाला ठेका वाजवून साथ करायचे. असं करत करतच झाकीर हुसेन तबला शिकले. पुढे त्यांनीही लहान वयात एकट्याने तबलावादनाचे कार्यक्रम केले. त्यांनी पंडित रविशंकर (सतार), उस्ताद अली अकबर खाँ (सरोद), पंडित शिवकुमार शर्मा (संतूर), पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी), पंडित बिरजू महाराज (नृत्य) अशा अनेक कलाकारांना साथ करण्यास सुरुवात केली.
तबलावादनाची वेगवेगळी घराणी आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने तबला वाजवला जातो. पंजाब, दिल्ली, बनारस, फारुखाबाद, लखनौ, अजराडा अशी ही घराणी आहेत. झाकीर हुसेन यांची खासियत हीच आहे, की त्यांनी वेगवेगळ्या घराण्यांचा तबला आत्मसात केला, त्याबर स्वतः विचार केला आणि त्यातून त्यांची स्वतःची तबलावादनाची पद्धत तयार झाली.
गायकाच्या आवाजाप्रमाणे किंवा वाद्याच्या स्वराप्रमाणे तबला त्या स्वरात लावला जातो. योग्य स्वरात लावण्यासाठी हातोडीने तबल्याच्या बाजूला हलकंच ठोकलं जातं. त्यासाठी स्वरांचं ज्ञान असणं आवश्यक असतं. तसंच तबलावादन सतत ऐकत राहायला हवं. त्याचे बोल म्हणता यायला हवेत. त्याला पढंत असं म्हणतात.
मी तबल्याच्या क्लासला नाव घातलं आणि पहिल्याच दिवशी मला सरांनी विचारलं, “वही आणली नाही का?” मी विचार केला, तबला वाजवायचा असेल तर वही कशाला? पण आपण क्लासमध्ये शिकलेले तबल्याचे बोल घरच्या तबल्यावर वाजवणं, त्याची पढंत करणं आवश्यक असतं. त्याचं शास्त्रीय कारण हे आहे, की आपण ज्या लयीत बोल म्हणू शकतो त्याच लयीत ते वाजवता येतात.
तबलावादनाचे कार्यक्रम लक्षपूर्वक बघितले तर लक्षात येतं, की तबलावादन हलक्या हाताने करावं लागतं. रियाजही असाच नजाकतीने आणि नियमितपणे करायचा असतो. जॅकी चॅनचा ‘द कराटे किड’ सिनेमा बघितला आहे का? त्यातला गुरू कराटे शिकणाऱ्या शिष्याला सांगतो, ‘तुम्ही जे शिकता ते फक्त क्लासपुरतं ठेवू नका, ती तुमची सवय झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचे कपडे कसे ठेवता, लोकांशी कसं वागता, कसं बोलता, सगळीकडे बारकाईने लक्ष कसं देता यावर तुम्ही जे काही शिकता ते आत्मसात करता येतं.
तबला शिकताना प्रत्येक गाणं ताल धरून ऐकलं, कोणतंही संगीत कान देऊन ऐकलं, त्यातले बारकावे समजून घेतले तर त्या संगीतामधलं गणित, भाषा, संगीताचा इतिहास, भूगोल, शास्त्र सगळंच शिकता येतं. त्यात तल्लीन होता येतं. संगीत शिकताना त्यात तल्लीन झालं तरच त्यात खरी मजा येते.
Leave a Comment