Story of Unique Friend in Marathi

Story of Unique Friend in Marathi : अनोखा मित्र गोष्ट.

1 min read

Story of Unique Friend in Marathi : अनोखा मित्र गोष्ट.

जयेश आज आपल्या दहा वर्षांच्या चिंटूला घेऊन समुद्रावर गेला. त्याची नाव किनाऱ्याचे पुढे लावलेली होती. रोजच्याप्रमाणे दोघा-तिघांनी मिळून, नांगरलेली नाव लाटांच्या आत ढकलली. चिंटू कितीसा जोर लावणार? परंतु हसत-हसत त्यानेही हात लावला. स्वारी डोक्याला तो कोळी लोकांचा लाल चौकडीचा रूमाल बांधून बाबा सोबत मासेमारीला जाण्यासाठी आतुर होती. सागराला भरती आली होती अन् नाव झोकात पुढे चालली होती. कि नाःयाच्या लाटांच्या पलीकडे सागर फक्त उचंबळत असतो. पाणी वर- खाली झुलत असतं. ठराविक अंतर पाण्यात गेल्यावर जयेशनं पाण्यात फेकण्यासाठी जाळं हातात घेतलं. चिंटूने त्याचा हात धरला. ‘बाबा, अजून आतमध्ये जाऊयात ना !’

‘नको. इथे भरपूर मासे सापडतात.’

‘अंऽऽ! बाबा, प्लीज, आजच्या दिवस !’

‘तुझी आवडती कोलंबी इथे मिळेल.’

‘असू देत पण पुढे चल. मला ‘अथांग’चा अर्थ शोधायचाय. मला फोटो काढायचेत. मला तसं खूप वाटतंय. बाबाऽऽ जाऊ या ना!’

‘पावशाऽऽ भलते हट्ट नकोयत.’ बाबा ओरडला. रागावला की तो चिंटूला ‘पावशा’ या त्याच्या खऱ्या नावाने हाक मारीत असे. चिंटूनं तोंड फिरवलं. तो गप्प झाला. आता त्याच्या बाबाला लेकाचा हिरमुसलेला चेहेरा पाहवेना. बाबानं आणखी चार वल्ही मारली अन् मग जाळं फेकलं. हसत हसत चिंटूनं ‘जय सागरेश्वरा’ म्हणत हात जोडले.

सूर्य माथ्यावर यायला लागला. वाऱ्यानं दिशा बदलली. सागराला ओहोटी लागली होती. सागराचं जल आता निळ्या रंगावरून राखाडी रंगाकडे वळलं होतं. परतीचा मार्ग धरायला हवा होता, जयेशच्या लक्षात आलं. त्यानं जाळं ओढायला सुरुवात केली. खेचताना जास्त जडपणा जाणवला. ‘भरपूर मासे असतील’ म्हणून तो जाळं खेचत होता. ते लक्षात घेऊन चिंटूनंही खेचायला जोर लावला. जाळं माश्यांसह नावेत ठेवलं गेलं. त्याचवेळी एक मोठा मासा त्यामध्ये सापडलाय हे जयेशच्या लक्षात आलं. चिंटू त्या माश्याकडेच पाहात होता.

नाव वळवून घेऊन जयेश वल्ही मारू लागला शिड फडफडू लागलं. त्यावरचा भारताचा ध्वज लहरू लागला. नाव झपाझप किनाऱ्याकडे चालली होती. पाण्याचं अंतर कापलं जात होतं. चिंटू नावेच्या मध्ये नव्हे जरा पुढेच बसला होता. दिवस थंडीचे होते. चिंटूला नाताळची सुट्टी होती. एरवी त्याचा बाबा त्याला मासेमारीला जाताना कधीच नेत नसे; पण आज चिंटूचा हट्ट आणि त्यातूनही त्याच्या आईने त्याला दुजोरा दिला होता. ‘कोणत्याही बाजूने वाकून पाण्यात हात घालायचा नाहीये’, बाबाची ताकीद होती. इतक्यात…

also read : The Indian government has officially designated August 23rd as “National Space Day.”

इतक्यात आवाज ऐकू आला, ‘जयेश राजा, तुला माझे वंदन !’ जयेश आणि चिंटूने एकाच वेळी मागे वळून पाहिलं. एक तो मोठा मासा मान उचलून वंदन करीत होता. हे अनोखं आणि अद्भुतसं दृश्य पाहून भांबावलेले बापलेक पुढचं बोलणे ऐकू लागले. ‘जया, माझ्यापाशी फक्त पाच मिनिटं उरलीयत बोलायला. काय सांगतो ते ऐक. मागच्या जन्मी म्हणजे मागच्या वर्षी मी, स्वर्गातला यक्ष होतो. देवदेवतांच्या पूजेची तयारी करीत होतो. रोजच्याप्रमाणे पंचामृतासाठी दही- दूध-मध-साखर अशी चार पुडं भरून झाली. आता पाचव्या पुडात तूप भरायचं होत. डब्याचं झाकण उघडलं न् त्या रवाळ तुपाचा मोह झाला. चाफेकळी त्यामध्ये बुडवून चाटली. मस्त चव आली. मग पुन्हा तेच बोट बुडवून चाटलं. नंतर चमच्याने तूप घेऊन पुडात ओतणार इतक्यात आकाशवाणी झाली. ‘थांब यक्षा ! आता ते तूप तृ उष्टं केलयंस. उष्टावलेलं तूप नैवेद्याला चालत नाही, हे तुला ठाऊक आहे तरी तू तेच करत होतास. गुन्हा घडलाय. शिक्षा होणारच. तुला माशाचा जन्म घ्यावा लागेल. तू सागराच्या संथ प्रवाहात दूर अंतरावर म्हणजे क्षितीज रेषेजवळ असशील. नशिबानं कुणाच्या जाळ्यात सापडलास तर तुझा उद्धार होईल. तू पुन्हा ‘यक्ष’ होशील. दिव्य योनीत परतशील. म्हणूनच जयेश तुला नमन केलं. तुझ्यामुळे आज मी आमच्या स्वर्गलोकात परत जातो आहे. तुझ्या चिंटूचे आभार मानतो. त्याच्याच भाषेत सांगायचं तर त्याला थैंक्स म्हणतो. तो तर ‘अजाण मित्र’ झालाय. केवळ त्याच्या आग्रहामुळे माझी सुटका होत आहे. हा, माझं नाव ‘सुमुख’ आहे. कधी काही अडचण आली तर माझं स्मरण करा. मी मदतीला येईन हा या यक्षाचा, ‘प्रामाणिक यक्षाचा’ शब्द आहे.

एवढं बोलून सुमुखने तोंड बंद केलं. त्याची शेपटी हलायची थांबली. जयेश आणि चिंटू आश्चर्याच्या लाटेमध्येच होते. मग जयेश नाव वल्हवू लागला. चिंटू जागेवरून ऊठला. सुमुखच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला. आता त्याचे डोळेही डबडबले होते.

Share This News

ताज्या बातम्या

Leave a Comment

आमच्या विषयी

Hello Beed मध्ये आपले स्वागत आहे. बीड शहरातील ताज्या बातम्यांचे हे आपले विश्वसनीय ठिकाण आहे. आम्हाला तुमच्यापर्यंत अचूक आणि वेळेवर बातम्या पोहोचवायच्या आहेत. आजच्या वेगवान जगात अद्ययावत राहणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला बीडमधील बातम्या, सरकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती देतो.