Story on Summers Vacation in Marathi : “उन्हाळ्याच्या सुट्टीतील” कथा
संपल्या का परीक्षा ?… ह्या इयत्तेपुरत्या तरी पुस्तकांना सुट्टी, शिक्षकांना सुट्टी, शाळेच्या रोजच्या ठरलेल्या दिनक्रमाला सुट्टी. लवकर उठणं नाही, वेळेचं घड्याळ नाही. मागे लागलेले मोठ्यांचे आवाज नाहीत… सारं कसं शांत शांत…पण… तुला माहितीये हा ‘पण’ आहे ना, तो नेहमी उरतोच. तर हा ‘पण’ म्हणजे मित्र. शाळेतले मित्र काही भेटणार नाहीत. त्यांच्या सोबतची मजा. धमाल ह्याची आठवण येत राहणार… आता इथे पुन्हा एक ‘पण’… हा ‘पण’ आहे नवीन मित्रांचा.
सुट्टीचा काळ मोठा असतो. शाळेत असताना फार कमी वाट्याला येणारा दिवस, सुट्टीत मात्र भला मोठा होता… आणि म्हणूनच ही वेळ असते नवीन मैत्री करण्याची. तुला काय वाटतं, मित्र म्हणजे कोण? केवळ हसणारे, बोलणारे, आपल्या सोबत धम्माल करणारेच मित्र असतात… तेवढेच मित्र नसतात. तर आपल्या अवती भवती त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलणारे, तर काही अबोल असेही अनेक मित्र असतात. माझ्या एका मैत्रिणींची छोटीशी गोष्ट तुला सांगते, तिने तिच्या अंगणात एक गुलमोहराचं रोप लावलं. पाहता पाहता मोठं झाड झालं. पण ते मोठं होताना ती त्या रोपासोबत खूप बोलायची. त्याला स्वतःच्या गंमती जंमती सांगायची. त्या दोघांची खूपच गट्टी जमली… आणि मग तिने त्याचं चित्र काढायला सुरुवात केली. अगदी छोट्या रोपापासून ते मोठ्या झाडापर्यंत. कधी नुसतंच पान, कधी छोटासा बुंधा, कधी पानासहित बुंधा, फांदया, पानभर नुसतीच लाल फुलं, हिरव्या कळ्या, त्याची लहान लहान पानं, मग मोठा झालेला बुंधा. सारी कागदं गुलमोहराने बहरून गेली.
काही दिवसांनी ती दुसऱ्या घरी गेली. गुलमोहर मात्र तिथेच राहिला पण तिच्या चित्रांसोबत तिने तो नेहमी जपला. तिच्या आठवणीत, तिच्या मनात. तुम्ही काढता का रे चित्र ?… इथे बऱ्याच जणांचं उत्तर मला माहीत आहे. ते उत्तर म्हणजे, ‘आम्हांला चित्र काढता येत नाही.’ मला ना तुझ्या ह्या उत्तराची गंमत वाटते. खरं तर, तुला माहितीये का, चित्र काढता येत नाही, असं माणूसच अस्तित्वात नाही.
कसंय ना, ते मी तुला सांगते, बघ तुला पटतंय का!… आपण जो इतर विषयांचा अभ्यास करतो की नाही, तू नीट पाहिलंस तर त्याची उत्तर ठरलेली असतात. म्हणजे गणिताची सूत्रे तू बदलू शकत नाहीस, इतिहासाची सनावळी मागे पुढे होत नाही, विज्ञानाचे शोध जसेच्या तसेच असतात. कारण त्या विषयांचं स्वरूप, मांडणी तशीच आहे. पण चित्रकलेत मात्र असं काही शास्त्र नाही. जसं गणितात एक आणि एक मिळून दोनच होतात. तसं चित्रकलेत समजा तुला पतंग काढायला सांगितला, तर तो प्रत्येकाचा वेगळा असेल. किंबहुना तो तसाच असला पहिजे.
तुला अनेकदा मोठे सांगत असतील, की हे जे चित्र काढलयंस पण ते नीट समजत नाही. काय काढलंयस ते अनेकदा तुला चित्र काढून दाखवलं जातं आणि पुन्हा ते तसंच काढण्याचा आग्रहदेखील केला जातो. छापील चित्रांची पुस्तकं आणून ती रंगवायला दिली जातात. पण ह्यापेकी ना कुणीतरी काढलेले चित्र तुझं आहे, ना छापील पुस्तकातलं चित्र तुझं आहे.
Also Read : Story of Ground Sports in Marathi
तुझं चित्र तुझ्याजवळ आहे. तुझ्या हातात आहे, तुझ्या मनात आहे. तुझ्या विचारांमधे आहे. ते तुझं आहे. ते कुणीच तुला शिकवू शकत नाही, चित्र शिकवता येत नाही. ते ज्याचं त्याचं असतं. म्हणजे तुझ्या सारख्या अनेकांना मी झाड काढून रंगवायला सांगितलं. तर प्रत्येकाचं झाड वेगळं असेल. त्याचं रूप वेगळं असेल. त्याचा आकार, रंग निराळा असेल. एखाद्याचं झाडं हिरवं असेल तर एखाद्याचं काळंही असेल. ते चित्र आहे. ते जसं दिसतं तसं काढण्यापेक्षा, जे पाहिल्यावर तुमच्या मनात त्याची जी प्रतिमा उमटते, त्याला कागदावर रेखाटणं म्हणजे चित्र जसं दिसतं तसं काढण्यासाठी छायाचित्र (फोटोग्राफी) आहे. चित्र म्हणजे तुमच्या मनात उमटतं ते. त्याला कागदावर उतरवायचं, इतकंच.
तू कशाचं चित्र काढतोयस, ते जसंच्या तसं येतंय का, ते पाहणाऱ्याला आवडेल का, ते बरोबर असेल का???… असे अनेक विचार मनात येतात. आणि चित्र काढण्या आधीच तुम्ही हे ठरवता की, मला चित्र येत नाही. तुझ्या चित्राने तुला आनंद मिळायला हवा, तू काहीतरी नव निर्मिती केलीस हा आनंद. म्हणून जसे तुम्ही असणार तसं तुमचं चित्र असणार. तू, मी, तुझे मित्र, माझे मित्र आपण सगळे वेगळे आहोत. आपलं दिसणं, आपल्या सवयी, स्वभाव, आपली आवड निवड सारं काही वेगळं. इतकंच काय पण आपले आवाजही परस्परांहून निराळे. मग जेव्हा इतकं वेगळेपण आहे. तर आपली चित्रं कशी सारखी असतील? तीसुद्धा वेगवेगळीच असायला हवीत. आणि ती तशीच असतात. म्हणून चित्र काढताना थोडीशी बंडखोरी करायची, बुद्धीला बगल देऊन थोडं मनाचं जास्त ऐकायचं. बुद्धी तुलना करायला शिकवते, मन स्वतःला आहोत तसं स्वीकारायला शिकवतं. हे जर तू स्वीकारलंस, तर तुझं चित्र तुला नक्की सापडेल.
पुन्हा रंग, रेषा, आकार आणायला आपल्याला काय परग्रहावर जायचं नाही. ते आपल्या अवती भवतीच आहेत. तुझं घर आहे, घरातल्या वस्तू, कोपरे आहेत. चित्राचा विषय कोणताही असू शकतो किंवा कोणाताच नसूही शकतो. जसं घर आहे. तसाच प्रत्येक ऋतूत बदलणारा निसर्ग आहे. अगदी आत्ता वसंत ऋतू सुरू आहे. निसर्गात रंगीबेरंगी फुलांची उधळण आहे. हे सगळे चित्राचे विषय आहेत. हे सारे तुझे नवे सवंगडी आहेत. ह्या सुट्टीतले.
असे अनेक मित्र तुझी वाट पाहत आहेत. तुझी चित्रं तुझी वाट पाहतायत. कदाचित, ह्या सुट्टीत स्वतःच्या रेषांसोबत, आकारांसोबत केलेली मैत्री तुला एक नवीन आनंद देऊन जाईल. चित्रातून एक नवीनच ‘तू’ तुला सापडशील…
सुट्टीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा…!