Siblings and fairies : बहीण-भाऊ आणि परी गोष्ट.
दीप्ती आणि नीलेश ही दोघे बहीण-भाऊ होती. त्यांचे आईवडील देवाघरी गेले होते. त्यामुळे ती दोघे आपल्या काका-काकीकडे राहत होती. नीलेश आणि दीप्तीकडून त्यांची काकी घरातील सर्व कामे करून घेत असे, परंतु त्यांना पुरेसे जेवणसुद्धा देत नसे. त्या दोघांना घालायला धड कपडेही देत नसे.
एकदा काकीने दोन्ही मुलांना जंगलात सोडून देण्याचा निश्चय केला. ‘काकांनी आपल्या बायकोला समजावण्याचा खूप प्रयत्न केला; पण ती काहीएक ऐकायला तयार नव्हती. दीप्तीने खोलीच्या बाहेर लपून काकीचे बोलणे ऐकले होते.
एके दिवशी संध्याकाळी काका-काकी दोन्ही मुलांना घेऊन जंगलात गेले. दीप्तीने तिच्याबरोबर काचेच्या गोट्या घेतल्या होत्या. जंगलात जात असताना, घरी जाण्याचा रस्ता लक्षात राहण्यासाठी ती रस्त्यामध्ये एक-एक गोटी टाकत होती. जंगलात पोचल्यावर मुलांना भूल पाडण्यासाठी काकी मुलांशी गोड गोड गप्पा मारू लागली. जेव्हा दोन्ही मुलांना झोप लागली, तेव्हा त्या मुलांना जंगलात एकटेच सोडून ती दोघे घरी परतली.
सकाळी दोन्ही मुले उठली. काका-काकी आजूबाजूला न दिसल्यामुळे नीलेशला रडू कोसळले. पण दीप्तीला सर्व काही माहीत होते. त्यामुळे तिने नीलेशला आपल्या मागोमाग येण्यास सांगितले. रस्त्यात टाकलेल्या गोट्या पाहत पाहत ते घरी पोचले. दोन्ही मुले घरी आलेली पाहून काकी खूपच नाराज झाली.
आता काकी त्या दोन्ही मुलांकडून पूर्वीपेक्षा अधिक कामे करून घेऊ लागली. ती त्या दोघांचा अधिकाधिक छळ करू लागली.
काका-काकी पुन्हा एकदा दोन्ही मुलांना घेऊन जंगलात गेले. या वेळीसुद्धा दीप्तीला काका-काकीच्या योजनेचा अंदाज आला. त्यावेळी तिच्याजवळ चण्यांशिवाय दुसरी कोणतीही वस्तू नव्हती, त्यामुळे ती रस्त्यामध्ये चणे टाकत गेली. जंगलात पोचल्यावर काका-काकी मुलांशी गोड गोड गप्पा मारू लागले.
जेव्हा दोन्ही मुले झोपी गेली, तेव्हा काका-काकी त्यांना जंगलात सोडून घरी परत आले.
सकाळी दोन्ही मुले उठली. काका-काकी बाजूला न दिसल्यामुळे दीप्ती म्हणाली, “नीलेश, काकीला आपण दोघेही आवडत नाही; म्हणून काका-काकी आपल्याला जंगलात एकटे सोडून गेले आहेत. यावेळी मी रस्त्यात चणे टाकले आहेत. चल, आपण दोघं पुन्हा घरी जाऊया.”
also read : Biography Of Nikhat Zareen In Marathi
बहीण-भाऊ घरी परत यायला निघाले. पण सकाळी पक्ष्यांनी वाटेतले चणे टिपले होते. त्यामुळे त्यांना घरी जायला रस्ता सापडला नाही. दोघे बहीण-भाऊ घाबरून गेले. रडत रडत जंगलामध्ये इकडून तिकडे भटकू लागले. चालता चालता त्यांना एक घर दिसले. ती दोघे त्या घराजवळ पोचली. “कोणी आहे का?” त्यांनी ओरडून विचारले. पण त्याला उत्तर मिळाले नाही. ती दोघे त्या घरात गेली. पण तिथे कोणीच नव्हते. मग ती दोघे तिथेच बसली.
थोड्या वेळानंतर एक म्हातारी घरात आली. तिचे मोठे मोठे डोळे, लांब लांब दात आणि लांबसडक नखे पाहून दोन्ही मुले घाबरून गेली. आपल्या घरात दोन मुलांना पाहून ती म्हातारी ओरडली, “कोण आहात तुम्ही ? आणि कोणाला विचारून घरात आलात?” मुले काय उत्तर देणार? दोघेही फार घाबरून गेली होती.
म्हातारीने नीलेशला एका मोठ्या पिंजऱ्यात बंद करून ठेवले आणि दीप्तीकडून घरातली सगळी कामे करून घेऊ लागली. या बदल्यात ती त्या दोघांना फक्त दोन वेळचे जेवण देत होती.
एकदा म्हातारीने दीप्तीला जंगलात लाकडे आणायला पाठवले. लाकडांची मोळी घेऊन परत येत असताना वाटेत ती आराम करण्यासाठी एका झाडाखाली बसली. आपल्या काकीने केलेला छळ तिला आठवला. त्याचबरोबर पिंजऱ्यात बंद असलेला भाऊ तिला आठवला. तिला खूप दुःख झाले. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.
त्या झाडावरती एक परी राहत होती. दीप्तीला रडताना पाहून परीला तिची दया आली. खाली येऊन तिने दीप्तीला आपल्या मांडीवर बसवले. मग प्रेमाने तिच्या केसांमधून हात फिरवत परी म्हणाली, “दीप्ती, मला तुझं आणि तुझ्या भावाचं दुःख माहीत आहे. तुम्हांला त्या दुष्ट म्हातारीच्या त्रासातून सोडवण्यासाठी मी एक उपाय सांगते. तू हिंमत ठेव. मी जसं सांगीन, तसंच कर.
“हे बघ, म्हातारी जेव्हा सकाळी अंघोळ करायला लागेल, तेव्हा तू तिच्या अंगावर उकळतं पाणी टाक. त्यामुळे ती मरून जाईल. तिच्या पलंगावर तक्क्याखाली पिंजऱ्याची चावी आहे. ती चावी घेऊन पिंजरा उघड आणि तुझ्या भावाला बाहेर काढ. त्या पिंजऱ्याखाली मोहरांनी भरलेली एक पेटी आहे. तुम्ही दोघं बहीण-भाऊ मिळून, तो पिंजरा बाजूला सरकवून ती पेटी घ्या आणि थोड्या अंतरावर असलेल्या नदीच्या किनाऱ्यावर जा. नदीमध्ये एक हंस पोहत असलेला तुम्हांला दिसेल. तुम्हांला पाहून तो आपले पंख पसरेल. तुम्ही दोघं त्याच्या पाठीवर बसा. तो हंस तुम्हांला तुमच्या घरी पोचवील.”
परीचे बोलणे ऐकून दीप्तीमध्ये हिंमत आली.
दुसऱ्या दिवशी म्हातारी जेव्हा अंघोळ करायला बसली, तेव्हा दीप्तीने उकळत्या पाण्याचे पातेले म्हातारीवर ओतले. म्हातारी लगेच मरण पावली. त्यानंतर दीप्तीने पलंगावरील तक्क्याखालून चावी घेऊन पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि नीलेशला बाहेर काढले. दोघा बहीणभावाने एकमेकांना मिठी मारली. दोघांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले.
मग बहीण-भावाने मिळून पिंजरा बाजूला सरकवला. परीने सांगितल्याप्रमाणे पिंजऱ्याखाली एक पेटी होती. ती पेटी घेऊन ते नदीच्या किनाऱ्यावर पोचले. त्या नदीत एक हंस पोहत होता. ती दोघे मोहरांची पेटी घेऊन हंसाच्या पाठीवर बसली. थोड्याच वेळात हंसाने त्या दोघांना त्यांच्या घरी पोचते केले.
दोन्ही मुलांना पाहून काकांना खूप आनंद झाला. मुलांना उराशी कवटाळून ते खूप रडले. त्यांनी दोन्ही मुलांची क्षमा मागितली आणि म्हणाले, “तुमच्या काकीच्या म्हणण्याप्रमाणे वागून मी तुम्हांला दुःख दिले आहे. मला जेव्हा माझी चूक कळून आली, तेव्हा मी तुमच्या काकीला घरातून बाहेर हाकलवून दिले.”
दोन्ही मुलांनी मोहरांनी भरलेली पेटी आपल्या काकांना दिली आणि म्हणाले, “काका, काकीशिवाय आम्ही घरात राहूच शकत नाही.”
घराबाहेर पारावर बसलेल्या काकीला दोन्ही मुले घरी घेऊन आली. तिलाही आपली चूक कळून आली होती. आता ती मुलांची ‘आई’ असल्यासारखी राहू लागली.