Life Story of Hima Das : हिमा दासची जीवनकथा.
१२ जुलै २०१८, ताम्पेरे, फिनलंड. २० वर्षांखालील खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेचा तिसरा दिवस. रात्रीचे आठ वाजून गेले होते. मुलींच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेची शेवटची शर्यत, फायनल. एकूण आठ मुली. एकेकीच्या नावाची घोषणा होत होती तसतशा त्या मुली मैदानात आपापल्या जागी जाऊन उभ्या राहत होत्या. त्यांतली एक होती भारताची हिमा दास. आजपर्यंत भारताचे फार थोडे धावपटू अशा मोठ्या स्पर्धेच्या फायनलपर्यंत पोहोचू शकले आहेत. त्यामुळे भारतात सर्वांना काय होणार याची उत्सुकताही होती.
“लेन फोर, हिमा दास फ्रॉम इंडिया !”-घोषणा झाली.
अशा धावण्याच्या शर्यतीत प्रत्येक खेळाडूला एक-एक लेन नेमून दिलेली असते. त्यांच्या नावासोबतच त्या लेन क्रमांकाचीही घोषणा होते. एकूण आठ लेन्सपैकी चौथी आणि पाचवी लेन खास असते; कारण त्या लेन्स त्या शर्यतीतल्या सर्वांत वेगवान धावपटूंना दिल्या जातात. त्या लेन्समध्ये भारताचा कुणी खेळाडू पाहण्याचीही आपल्याला फारशी सवय नाही. त्यामुळे ते दृश्यही उत्साह वाढवणारं होतं.
पंचांनी इशारा केला आणि शर्यत सुरू झाली. प्रेक्षकांचा गलका सुरू झाला. सहाव्या लेनमधली अमेरिकेची टेलर मॅन्सन सुरुवातीपासूनच पुढे होती. हिमा दास चौथी- पाचवी होती. पहिले १०० मीटर झाले, २०० मीटर झाले. पाचव्या लेनमधली ऑस्ट्रेलियाची एला कॉनोली आणि मॅन्सन यांची टक्कर सुरू होती. ३०० मीटर पूर्ण होत आले. मॅन्सन आता बाकीच्यांपेक्षा बरीच पुढे होती. तीच जिंकणार, सर्वांना वाटायला लागलं. हिमा दास अजूनही चौथी-पाचवी… आता शेवटचे ७०-८० मीटर राहिले होते… आणि अचानक कुठून, कसं काय माहिती, हिमाने चक्क या दोघींना गाठलं. तिच्यातलं आणि मॅन्सनमधलं अंतर कमी कमी व्हायला लागलं. प्रेक्षकांचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. शेवटचे ३०-४० मीटर… हिमाने आता बाकीच्या सर्वांना शिस्तीत मागे टाकलं आणि ती जी झूऽऽम पुढे निघाली ती शर्यत जिंकूनच थांबली. हे भारताचं अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेतलं पहिलंच गोल्ड मेडल… आणि ते जिंकणारी अवघ्या १८ वर्षांची ‘ढिंग एक्सप्रेस’ हिमा दास.
हिमाला हे नाव कसं मिळालं ?
हिमा मूळची आसाममधल्या ढिंग गावाजवळच्या कंधुलीमारी या छोट्याशा खेड्यातली. तिचे आई-बाबा शेतकरी आहेत. तिला चार लहान भावंडं आहेत. हिमाला लहानपणापासूनच सर्व प्रकारच्या खेळांची आवड होती. घराबाहेर मोकळ्या जागेत जो खेळ सुरू असेल त्यात ती जाऊन खेळायला लागायची. त्यातही तिला फुटबॉलची खास आवड होती. ती तिच्या शाळेतल्या मुलांसोबत फुटबॉल खेळायची. मोठेपणी फुटबॉलच खेळणार, असं ती म्हणायची.
also read : Story of Wow! Maestro, wow! in Marathi
तिची शाळा ढिंग नवोदय विद्यालय. तिच्या एका शिक्षकांना तिची खेळातली आवड, चपळपणा लक्षात आला. त्यांनी तिला नागावच्या एका खेळाच्या शिक्षकांकडे नेलं. त्यांचं नाव गौरीशंकर राव. राव सरांनी तिला शर्यतीसारखं पळायला सांगितलं आणि तिचा पळण्याचा वेग बघून तिला तडक ढिंग जिल्हा स्पर्धांसाठी निवडलं. त्या स्पर्धेत तिने १०० आणि २०० मीटर शर्यतींमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. त्यानंतरच्या जिल्हा स्पर्धांमध्येही तिला याच दोन्ही शर्यतींत सुवर्णपदकं मिळाली. एकीकडे ती गावातल्या मुलींच्या फुटबॉल टीममध्येही जमेल तसं खेळायची. मात्र, लवकरच तिच्या लक्षात आलं, की फुटबॉलपेक्षा पळण्याच्या शर्यतींमध्ये जास्त संधी मिळू शकते. आणि तिने फुटबॉलला टाटा करून ‘स्प्रिंट’ शर्यतींकडेच वळायचं ठरवलं.
तिचे आई-बाबा कायमच तिच्या पाठीशी होते. ती लांबवर पळण्याचा सराव करायची तेव्हा तिचे वडीलसुद्धा तिच्याबरोबर पळायचे. त्यासाठी दोघंही पहाटे चार वाजता उठायचे. पुढे पुढे तर जास्त लांबवर पळायला जाता यावं म्हणून हिमा स्वतःच बाबांना चार वाजण्याच्याही आधी उठवायची. त्यांच्या गावात शर्यतींसाठी मैदान किंवा ट्रॅक्स नव्हते; पण त्यामुळे त्यांचं काही अडायचं नाही. दोघं भाताच्या शेतांत पळायचे.
एप्रिल २०१८ मधल्या ‘कॉमनवेल्थ गेम्स’ ही हिमाची पहिली मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि सुरुवातीला लिहिलं ते तिचं पहिलं सुवर्णपदक. त्या स्पर्धेनंतर आल्या जकार्ता एशियन गेम्स. तिथे हिमा ४०० मीटर शर्यतीत ताम्पेरेपेक्षा वेगाने धावली; मात्र, तिला तिथे सिल्व्हर मेडल मिळालं. त्यावरून बघा, ती शर्यत कसली भारी झाली असेल !
यंदा जुलैमध्ये हिमाने पोलंड आणि झेक रिपब्लिक इथे झालेल्या पाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये २०० मीटरच्या शर्यतींतली पाच सुवर्णपदकं पटकावली आहेत… ढिंग एक्सप्रेस आता सुसाट निघाली आहे!
Leave a Comment