And the Horse Became a Man.. in Marathi

And the Horse Became a Man.. in Marathi : आणि घोडा माणसाळला .. गोष्ट.

1 min read

And the Horse Became a Man.. in Marathi : आणि घोडा माणसाळला .. गोष्ट.

आपण जे काही करतोय त्याने भविष्यात माणसाचं जगणं पूर्णपणे बदलून जाणार आहे याची त्या दिवशी त्या दोघांनाही कल्पना नव्हती. ते कळण्याइतकी त्यांच्याजवळ बुद्धी नव्हती. म्हणजे मेंदू प्रगल्भ होता, पण त्यांच्याकडे तेवढा अनुभव नव्हता. शिवाय त्यांच्या भाषेत फारसे शब्दही नव्हते, भाषेचं व्यवस्थित व्याकरणही नव्हतं. ही गोष्ट सांगताना वापरले गेलेले शब्द अजून तयार व्हायचे होते.

मध्य आशियातील स्टेपीज हा गवताळ प्रदेश. (तेव्हा त्याला हे नाव मिळालेलं नव्हतं.) तिथे त्या काळात भरपूर आणि वेगवेगळ्या प्रकारचं गवत उगवत होतं. त्यातल्या काही प्रकारच्या गवताच्या बिया खायला उपयोगी ठरल्या होत्या. त्या वेचायच्या, एका सपाट दगडावर ठेवायच्या, दुसऱ्या दगडाने त्या रगडून, त्या भुग्यात पाणी मिसळून एका मातीच्या भांड्यात घ्यायचं आणि ते भांडं शेकोटीवर ठेवायचं. ते रटरट वाजू लागलं की भांडं शेकोटीवरून उतरवून थंड होऊ द्यायचं. भांड्यातला तो थंड झालेला पदार्थ खायला मजा यायची.

मात्र, केवळ गवताच्या बिया वेचून टोळीचं पोट भरणं तसं अशक्यच होतं. मग गवतातल्या बिळांमधले वेगवेगळे प्राणीही पकडले जायचे. ते पकडून, सोलून अन्नात मिसळण्याची कामं टोळीतल्या बायकांची होती.

ते दोघं लहानही नव्हते आणि शिकारीला जाण्याइतके मोठेही नव्हते. त्यांच्यासारख्या मुलांकडेही महत्त्वाचं काम असे. बायका गवतात शिरून बिया आणि कंदमुळं वेचायच्या, त्या वेळी या मुलांना आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवावं लागायचं. त्या गवताळ प्रदेशात मधूनच एखादं झाड उगवलेलं असे. त्या झाडावर चढून दूरवरच्या परिसराचं निरीक्षण करावं लागे. टोळीच्या आसपासच्या गवताळ प्रदेशात एखादं नवं बीळ दिसलं तर त्यात काही धोकादायक प्राणी नाही ना याची खात्री करून घ्यायची आणि त्याबद्दल बायकांना सांगायचं; एखादं पळपुटं आणि चुकार पोरगं तळापासून दूर भरकटलं तर त्याचा शोध घेऊन, कान पकडून त्याला परत आणायचं, अशीही कामं त्यांना करावी लागायची.

ही कामं महत्त्वाची होतीच; तरी या मुलांचं मन त्यात फारसं रमत नसे. त्यांना मोठ्यांबरोबर शिकारीला जावंसं वाटायचं. शिकार करायला गेलेले टोळीकर संध्याकाळी परत आल्यावर शेकोटीभोवती बसून दिवसभरात काय काय घडलं ते सांगायचे. त्यांचे पराक्रम ऐकून या मुलांनाही तसंच काही तरी करावंसं वाटायचं. त्यात एखादा टोळीकर जखमी झालेला असेल तर त्याचं जास्तच कौतुक केलं जायचं; बाकीचे सगळे त्याची सेवा करायचे; तेव्हा त्याच्या जागी आपण असायला हवे होतो, असंही या मुलांना राहून राहून वाटत असे. एखाद्या वेळी टोळीतला कुणी तरी शिकारीत किंवा दुसऱ्या टोळीशी झुंजताना मारला जायचा. त्याची जागा आपल्याला मिळावी, म्हणजे आपण शत्रूच्या टोळीशी लढून या गोष्टीचा बदला घेऊ, अशीही त्यांची इच्छा व्हायची; पण यातलं काहीही लगेच तरी होणार नव्हतं.

या मुलांवर आणखीही काही कामं सोपवलेली होती. बायका अन्न वेचत असताना त्यांना काही दगडांचे तुकडे मिळत असत. ते गारेचे तुकडे काही वेळा रंगीत असत. बहुतेक वेळा ते चांगलेच टणक असत. त्यांना शस्त्रांची टोकं करण्यासाठी वापरता येत असे. काही दगडांचे तुकडे केवळ चांगले दिसतात म्हणूनही गोळा केले जात. हे जपून ठेवण्याचं कामही त्यांना करावं लागायचं. ते टणक दगड एकमेकांवर आपटून त्यांचे छिलके उडवणं, बायकांना हवी तेव्हा आग पेटवून देणं, ही कामंसुद्धा त्यांचीच होती.

सुरुवातीला म्हटलं तो दिवस तसा नेहमीप्रमाणेच उजाडला. आज टोळीतले सदस्य मावळतीकडे शिकारीला गेले होते. आदल्या दिवशी शेकोटीभोवती गप्पा चालू असतानाच दुसऱ्या दिवशी कुठे जायचं ते ठरत असे. गवताची वाढ, वेगवेगळ्या प्राण्यांच्या पावलांचे ठसे , ढगांचा रंग आणि आकार अशा अनेक गोष्टींचा अर्थ लावून मग शिकारीसाठी योग्य प्राण्यांचे कळप कुठे असतील याचा अंदाज घेतला जाई. तसंच टोळीच्या यानंतरच्या मुक्कामासाठी योग्य जागाही निश्चित करावी लागत असे. साधारणपणे जराशा खोलगट पण पाणवठ्याजवळच्या जागा तळासाठी निवडल्या जात. एखाद्या नदीचं नाही तर ओढ्याचं कोरडं पात्र असेल तर त्याच्या काठापासून थोड्या अंतरावर पण जरा उंचच जागी तळ पडत असे; कारण कोरड्या पात्रात मोठ्या दगडांखाली साप, विंचू असत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे अशा पात्रात पाण्याचा लोंढा अतिशय जोराने येत असे. तो केव्हा आणि का येतो हे कुणी सांगू शकत नसे. त्याचं कारण कळायला त्या काळात तरी मार्ग नव्हता.

तर, त्यांची टोळीही अशा प्रवाहापासून जराशा दूर अंतरावर एखाद्या उंचवट्यावर तळ ठोकायची. मग त्या कोरड्या पात्रात एखादा खड्डा खणला जायचा. अशा खड्ड्यात हळूहळू पाणी भरलं जायचं. ते खड्ड्यातून काढून द्यायचं काम या पोरांचं असे. काही वेळा हे पाणी प्यायला जंगली जनावरं येत असत. जनावरं छोटी असली तर त्यांना मारायचा प्रयत्न करायला हरकत नसे. मात्र, मोठा हिंस्र प्राणी असल्यास त्याच्या वाटेला जायचं नाही, अशी सर्वांना सक्त ताकीद होती. टोळीची शिस्त कडक होती. नियम मोडणाऱ्याला टोळीतून हाकलून दिलं जायचं. त्यामुळे सहसा कोणी नियम मोडत नसे.

त्या दिवशी हे दोघं झाडावर चढून काही दिसतंय का हे बघायचा प्रयत्न करत होते, तर त्यांना पाण्यासाठी खणलेल्या एका खड्ड्यात काही तरी हालचाल दिसली. झाडावरून खाली उतरण्यापूर्वी त्यांनी त्या दिशेला इतर कोणतंही संकट नाही याची खात्री करून घेतली. अतिशय सावधगिरी बाळगत मग ते हळूहळू त्या खड्ड्याजवळ पोहोचले. खड्ड्यात हळूच डोकावून बघतात तो काय, आत एक लहानसा प्राणी पाण्यात थरथर कापत उभा होता. तो मधूनच मागील. पायांवर उभा राहून पुढच्या पायांनी त्या खड्ड्याच्या भिंतीवर चढायचा प्रयत्न करत होता, परत खड्ड्यात पडत होता.

also read : Story on Language of Friendship in Marathi.

त्या गवताळ प्रदेशात या देखण्या, रुबाबदार प्राण्यांचे कळप हिंडताना, गवत खाताना दिसायचे. गवत खाता खाता संकटाची चाहूल लागली तर कळप उधळायचा. चौखूर धावताना तर ते प्राणी अधिकच रुबाबदार दिसायचे. शिकार करायचं सोडून माणसं त्या प्राण्यांकडे आश्चर्याने बघत राहत. तेव्हा ते त्या प्राण्याला काय म्हणत होते हे ठाऊक नाही, पण पुढे त्याला घोडा म्हणण्यात येऊ लागलं. तर त्या खड्ड्यात एक शिंगरू म्हणजे घोड्याचं एक पिल्लू पडलं होतं.

त्या दोघांजवळ गवताची वळलेली एक दोरी होती. त्याचा फास करून त्यांनी त्या शिंगराच्या गळ्यात टाकला. दोरीचा फास करून गवतातले हरणांसारखे प्राणी पकडण्याचं काम ते शिकलेले होते. बऱ्याच वेळा गळ्यात दोरीचा फास पडताच तो प्राणी उधळायचा आणि फासाची दोरीही त्याच्याबरोबर गायब व्हायची ते वेगळं. शिकताना चुका होणारच; पण हळूहळू सरावाने बहुतेकांना ते जमायचं. इथे तर खड्ड्यात पडलेलं एक गरीब बिचारं शिंगरू पकडायचं होतं. त्यांना ते शिंगरू फासात अडकवायला फार वेळ लागला नाही. त्याला बाहेर खेचून काढणं हे मात्र खरंच कष्टाचं काम होतं. दोघांचीही ते करताना चांगलीच दमछाक झाली; पण अखेरीस ते बाहेर आलं आणि निपचित पडलं; पण त्याची छाती वर-खाली होत होती. म्हणजे ते जिवंत होतं.

आधी त्यांच्या डोक्यात आलं, याला मारलं तर चांगली मेजवानी होईल. पण त्या गोंडस जीवाला कशाला मारा, असंही त्यांना वाटलं. तोपर्यंत त्यातला एकजण त्याच डोकं थोपटू लागला. दुसऱ्याने आजूबाजूला उगवलेलं गवत उपटून आणलं, एका कवटीत पाणी भरलं आणि ते त्याच्या तोंडापाशी ठेवलं. शिंगराने हळूच डोळे उघडले. ते उठायची धडपड करू लागलं. ते चांगलंच दमलं होतं; पण अखेरीस त्याला उभं राहणं जमलं. त्याने पाण्यात तोंड घातलं आणि अक्षरशः एका क्षणात पाणी संपवलं. मग त्याने जवळ उभ्या असलेल्या मुलाच्या अंगाला डोकं घासलं. यानेही त्याचं डोकं थोपटलं. त्या क्षणी त्यांची दोस्ती झाली !

दोघांनी त्या शिंगराला कोवळं गवत भरवलं. ते शिंगरू आता त्यांच्या मागे मागे फिरू लागल. संध्याकाळी त्या शिंगराला घेऊन ते वस्तीवर परतले. त्यांनी टोळीप्रमुखाच्या विनवण्या केल्या आणि त्यांच्या या नव्या मित्राला टोळीत ठेवून घेतलं. काही काळातच टोळीतल्या सगळ्यांशी त्याची दोस्ती झाली. लहान मुलं त्याच्या पाठीवर बसू लागली. त्या मुलांबरोबरच तेही वाढत होतं. पुढे लक्षात आलं, की ती घोडी होती. हे दोघं आता टोळीचे शिकारी सदस्य होते. अधूनमधून ते त्या घोडीवर बसून रपेट करू लागले. त्यांच्या सांगण्यावरून कुठल्याही शिकारीच्या वेळी एखादं शिंगरू कळपापासून मागे पडलेलं दिसलं की पूर्वीप्रमाणे त्याला मारून न टाकता पकडून टोळीत आणलं जाऊ लागलं.

एक दिवस ती घोडी- पहिली माणसाळलेली घोडी अचानक नाहीशी झाली. ती कुठे गेली, का गेली हे कुणालाच कळलं नाही. काही काळाने ती परतली तेव्हा ती पिल्लाला जन्म देणार असं तिच्या शरीरावरून वाटत होतं. दरम्यानच्या काळात इतर काही टोळीकरांनीही घोड्यांच्या कळपातून शिंगरं वेगळी करून पकडली होती. पोरंटोरं त्यांच्या पाठीवर बसायचा प्रयत्न करताना पडत होती, अंग सडकून घेत होती. एका मुक्कामावरून दुसऱ्या मुक्कामाला जाताना जरा मोठ्या झालेल्या शिंगरांच्या पाठीवर आता सामान लादलं जाऊ लागलं. आयांच्या कडेवरची पोरं चामड्याच्या खोळीत ठेवून या घोड्यांच्या पाठीवर ठेवली की काम व्हायचं. यामुळे टोळीच्या प्रवासाचा वेग वाढला. या घोड्यांच्या पाठीवर स्वार होऊन त्यांना जोरात पळवू शकणारे काही साहसी वीर टोळीत तयार झाले. टेहेळणी, पुढच्या मुक्कामाची जागा हेरून ठेवणं, ही कामं सोपी झाली. जंगलात त्यांना असलेला धोकाही कमी झाला.

जे एका टोळीने केलं ते इतर टोळ्यांमध्येही घडू लागलं. मग सर्वत्र घोडेस्वार दिसू लागले. मग हळूहळू घोडेस्वारीसाठी जीन, रिकीब, लगाम अशा गोष्टी निर्माण झाल्या. मानवी टोळ्या दूर दूर हिंडू लागल्या. अधिकाधिक लांबचा प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न व्हायला लागला…

…आणि त्यासाठी माणूस युद्ध करू लागला.

Share This News

ताज्या बातम्या

Leave a Comment

आमच्या विषयी

Hello Beed मध्ये आपले स्वागत आहे. बीड शहरातील ताज्या बातम्यांचे हे आपले विश्वसनीय ठिकाण आहे. आम्हाला तुमच्यापर्यंत अचूक आणि वेळेवर बातम्या पोहोचवायच्या आहेत. आजच्या वेगवान जगात अद्ययावत राहणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला बीडमधील बातम्या, सरकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती देतो.