Pahalgam Attack :- जम्मू-कश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भीषण उलगडा

Pahalgam Attack :- जम्मू-कश्मीरच्या शांत, निसर्गरम्य पहलगाम परिसरात मंगळवारी घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा धक्कादायक उलगडा झाला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची निर्दयी हत्या केली. सुरक्षा दलाच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी बायसरन खोऱ्यात अंधाधुंध गोळीबार करत धर्माची विचारणा केल्यानंतर, हिंदू ओळखून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

हल्ल्याआधी आठवडाभर ‘रेकी’, 6 दहशतवाद्यांचा सहभाग

Pahalgam Attack :- खुफिया यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 7 एप्रिलदरम्यान दहशतवाद्यांनी परिसराची रेकी केली होती. हा हल्ला ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या लष्कर-ए-तैयबाशी संलग्न गटाने रचला असून, कमांडर सैफुल्ला हाच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी जवळच एक नोंदणी नसलेली मोटारसायकल सापडली असून, तिचा वापर दहशतवाद्यांनी केल्याचा संशय आहे.

हल्ल्यात 26 मृत, 20 जखमी

गोळीबारात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, अनंतनाग येथील नागरिकांसह नेपाळ व युएई येथील दोन विदेशी पर्यटकांचा समावेश होता. मृतांमध्ये शिवमोग्गा (कर्नाटक) येथील उद्योजक मंजुनाथ राव, त्यांच्या पत्नीने सांगितले की, दहशतवाद्यांनी त्यांना मारण्याऐवजी, “जाऊन मोदींना सांगा,” असे सांगितले.

सरकारची प्रतिक्रिया, पंतप्रधानांचा दौरा रद्द

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सऊदी अरेबियातील दौरा तात्काळ रद्द केला व भारतात परत येत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत आपत्कालीन बैठक घेतली. गृहमंत्री अमित शाह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तातडीची बैठक घेत, नंतर श्रीनगर गाठले.

सुरक्षा यंत्रणांचा मोठा सर्च ऑपरेशन

सेना, जम्मू-कश्मीर पोलीस व सीआरपीएफने संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. रस्त्यांवर कडेकोट नाकाबंदी करण्यात आली असून, हेलिकॉप्टरच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

एनआयएकडे तपास सोपवला

या घटनेचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार आहे. स्थानिक मदतगारांचा यात सहभाग असण्याचा संशय वर्तवला जात आहे.

मुख्यमंत्री व उपराज्यपालांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याला ‘अमानवीय व क्रूर’ म्हणत तीव्र शब्दांत निंदा केली. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी गृहमंत्र्यांसोबत सुरक्षा बैठकीत उपस्थित राहून स्थितीचा आढावा घेतला.

हा हल्ला फेब्रुवारी 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.

Leave a Comment