Story of Fashion Show in Marathi

Story of Fashion Show in Marathi : फॅशन शो गोष्ट.

1 min read

Story of Fashion Show in Marathi : फॅशन शो गोष्ट.

एका घनदाट जंगलांत विविध पशु, प्राण्यांचे वास्तव्य होते. या जंगलात पशुप्राण्यांनी आपापल्या हक्काचे परिसर स्वतःच्या नावे करून घेतले होते. त्या परिसरांची नावे पण निराळी होती. जसे की, बाघोबाची डरकाळीवाडी, सिंहांची साहसवाडी, चित्त्यांची चपळवाडी, हत्तींची हस्तीनापूरवाडी, जिराफांची उंचवाडी, झेब्रांची झेडवाडी, लांडग्यांची लबाडवाडी, कोल्हांची कोल्हट वाडी, सश्यांची ससेवाडी, हरणांची हरसूलवाडी, खारुताईची खारवाडी, मुंग्या, मुगळ्याची घोळकेवाडी…. अशा विविध वाडींच्या नावांची पाटी जंगलात प्रत्येक समूहाने त्यांच्या परिसरात झाडावर लावलेली होती. जेणेकरून पाटी लावल्यामुळे कोणाचे वास्तव्य या परिसरात असेल हे समजायला सोपे जावे.

एके दिवशी काही खारुताईंनी सभा भरवली. सभेमध्ये सगळ्यांनी विचारविनिमय करून ठरवले, आपला परिसर सोडून इतर परिसरात फेरफटका मारायला जायचे. दुसऱ्या दिवशी सगळ्या सख्या ठरल्याप्रमाणे निघाल्या. जाता जाता जिराफांची उंचवाडी ही पाटी दिसली. थोडे डोकावून उंचवाडीमध्ये पाहिले. तेव्हा सगळ्या खारुताईंना फार हेवा वाटला कारण, सगळे जिराफ छान ऐटीत नंद माना हलवत हलवत चालत होते. तेव्हा खारुताईंना वाटले, खरंच जिराफ किती मस्त उंचीचे असतात. त्यांची मान कुठेही सहज पोहचते. उंच उंच जिराफांना पाहून एक खारुताई म्हणाली, त्यांच्या या परिसराचे नाव उंचवाडी पडले असणार.कमेव बाकी खारुताईनी पण दुजोरा दिला, होऽ होऽ असेच असणार हं..

अळम टळम करत करत आता खारुताईंचा समूह पुढे निघाला. नव्या परिसरात नवे खाद्य मिळवताना एकमेकींमध्येच खारुताईं भांडू लागल्या. मध्येच त्यांना वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. ऽऽ ऽऽ ऽऽ ऽऽ.. त्या घाबरल्या.. त्या आपापसातले भांडण अर्ध्यातच सोडून एकदम गप्प झाल्या. घाबरत घाबरतच हळूहळू शांतपणे पुढच्या परिसरात पोहोचल्या.

या परिसराची नावाची पाटी होती घोळकेवाडी. पाटीवरच्या नावामुळे सगळ्यां खारुताई थोडावेळ गोंधळल्या… त्या विचार करू लागल्या इथे कोण बरे राहात असेल? पाटीवरचे नाव, परिसरातील शांतता, आजूबाजूला पाहिले तर कोणीच दिसत नव्हते. म्हणून सगळ्याजणी काही दगडांच्या मागे जाऊन बसल्या, कोणी दिसते का या परिसरात हे पाहण्यासाठी. तैवेधातच गुपचूप गुपचूप काही झाडांवरून, काही झुडुपांमधून, काही मातीतून अल्हादपणे कोणीतरी चालते आहे असे जाणवले. थोडीशी वाऱ्याची झुळूक आली म्हणून पुन्हा सगळे शांत झाले.

स्वभावाने चंचल सगळ्या खारुताई चुळचूळ करू लागल्या. जागा बदलून पुढे पुढे गेल्या. समोरच मातीचा मोठा ढिगारा दिसला. त्या ढिगाऱ्याच्या पायथ्याशी एक गुहा दिसली. गुहेचे प्रवेशद्वार तसे छोटेसे होते.. गुहेत कोण असेल बरं? यामुळे खारुताईंचं कुतूहल चाळवलं. गुहेत त्यांनी डोकवायचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वार त्यांच्या उंचीपेक्षा छोटेसे असल्याने सगळ्या गुहेत शिरू शकत नव्हत्या… नेमकं अशावेळेस त्या सर्वांना खूप भारी वाटत होते. कारण आपणही कोणापेक्षा उंच आहोत, या भावनेनेच त्या हुरळून गेल्या होत्या. आता त्या जिराफांना दाखवू शकणार होत्या की, आम्हीपण कोणापेक्षा तरी उंच आहोत… या भारीपणात एकमेकींमध्ये शान करत त्यांच्या शेपट्या आपोआप डोलत होत्या. त्या गुहेपाशीच गलका करु लागल्या गुहेत जाण्यासाठी… सगळ्यांमध्ये एकाच इवली, बारीकशी खारुताईची उंची फारच कमी होती. सगळ्यांनी संगनमत करुन त्या इवल्या खारुताईला गुहेत पाठवले. बाकी सगळ्या गुहेबाहेरून डोकावून आत काय सुरू आहे ते बघण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होत्या.

इवली खारुताई गुहेत आत गेल्या गेल्या गुहेची सजावट पाहून आश्चर्यचकीत झाली. गुहेमध्ये सगळीकडे छोट्या छोट्या हिरव्या बियांना, दोयर्यात ओवून टांगलेले होते. जणू हिरवे दिवेच. स्टेजवरती नाजूक रानफुलानी बॅनर बनवलेले होते. त्या बॅनरवर ‘फॅशन शो’ असे लिहिलेले होते आणि बॅनरवर मुंगी व मुंगळ्यांचे चित्र काढलेले होते… मुंगी व मुंगळ्यांचा ‘फॅशन शो’ कल्पनाच भन्नाट आहे. स्टेजवर जाण्यासाठी हिरव्या पानांचे हिरवे कार्पेट खाली अंथरलेले होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. अशी होती गुहेतील मनमोहक सजावट.

also read : Story of Pranav and Pari in Marathi

इवल्या खारुताईने अंदाज घेतला. अजून कोणी स्टेजवर आले नाही म्हणून गुहेबाहेर ती तिच्या सख्यांना सांगायला आली. ती बाहेर येताच सगळ्या खारुताईंनी तिला प्रश्नांनी भांडावून सोडले. मग तिने सांगितले की, तुम्ही ऐकाल तर चकीतच व्हाल. गुहेमध्ये ‘फॅशन शो’ आहे, तेही मुंग्या व मुंगळ्यांचा! काय? खरंच !! सगळ्या खारुताईंनी तेवढ्याच आश्चर्याने जोरात विचारले. मज्जा आहे गं तुझी. तू इवली, बारीकशी, बुटकी असल्याने तुला ‘फॅशन शो’ बघता येणार.. आम्ही मात्र गुहेच्या बाहेरच राहणार… हं!

जरा कडेकडेने जाणाऱ्या मुंगळ्यांनी खारुताईंचे बोलणे ऐकले. त्यांची तीव्र इच्छा जाणली. तो खारुताईंना म्हणाला, गुहेला दुसरे प्रवेशद्वार आहे. तुम्ही येऊ शकता आमच्या कार्यक्रमात. हे ऐकताच सगळ्या सख्यांचा आनंद गगनात न मावणारा होता. त्या रुबाबदार मुंगळ्याच्या मागून सगळ्या खारुताई दुसऱ्या प्रवेशद्वाराने गुहेत शिरल्या. गुहेची सजावट बघून त्या सगळ्यांच थक्क झाल्या. प्रेक्षकांसाठी बसायला झाडांचे गोलाकार खोड ठेवले होते. त्या खोडांवर सर्व खारुताई विराजमान झाल्या.

प्रेक्षकांच्या उत्सुकतेमुळे लगेच सुरू झाला फॅशन शो. सुरुवात झाली कार्यक्रमाची. एक सिनियर मुंगळे आजोबा अँकरींग करत होते. त्यांनी सूट बूट घातलेले पाहून सगळ्या खारुताईंना भारी वाटले. मुंग्या, मुंगळ्यांचा फॅशन शो म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच… मुंग्या नाजूकशा, बाजरीच्या दाण्यापेक्षा लहान… तर मुंगळे थोडेसे तब्येतीने मुंग्यांपेक्षा बरे, गव्हाच्या दाण्याएवढ्या उंचीचे… मात्र यांच्यात सारखेपणा म्हणाल तर अंगांचा रंग, शरीराची लवचिकता… आज काहीतरी भन्नाट, जबरदस्त बघायला मिळणार अशी आशा लावून खारुताई स्टेजकडे एकटक बघत होत्या.

पहिला समूह आदिवासी वेशात आला, हातात काठी घेतलेली, कंबरेला पानांनी बांधलेले… दुसरा समूह कोळी वेशात आला, मुंग्यानी छोटी लुगडी तर मुंगळ्यांनी छोटी लुंगी, कान टोपेरा घातलेली… तिसरा समूह आला- मुंग्यांनी नऊवारी साडी तर मुंगळ्यांनी धोतर घातलेले… चौथा समूह आला- त्यांनी सगळ्या प्रकारचे कपडे, म्हणजे ग्रामीण व शहरी असे मिश्र स्वरूपाचे घातलेले… पाचव्या समूहाने लहान मुला-मुलींचे कपडे घातले होते; पण लहान मुलांसारखे रांगणे, उठणे, चालणे, नाचणे अशा कृतींमधून त्यांचे वेगळेपण दाखवले.

हा ‘फॅशन शो’ बघताना खारुताई आपापसात कुजबूजू लागल्या. हे सगळे असे समूहाने का आले स्टेजवर? सारखे घोळक्यातच वावरताना का दिसतात ?

तेव्हा, एका सिनियर मुंगी आजीने सांगितले, आम्ही सगळे समूहातच राहात असतो. फार अचितच एकटे एकटे फिरतो… तुम्ही आमच्या परिसराची पाटी वाचली नाही का? घोळकेवाडी!

ओह. अच्छा अच्छा. त्या पाटीवरच्या नावामुळे आम्ही गोंधळलो होतो. आता आले लक्षात. ‘फॅशन शो’ शेवटच्या टप्प्यात भाजाने सच खारुताई त्यांच्या आवाजाने शिट्ट्या वाजवत होत्या. टणाटणा उड्या मारत होत्या. त्यांच्या उत्साहामुळे कार्यक्रमाची सांगता करताना आजच्या आदरणीय खारुताई प्रेक्षकवर्गाला आम्ही विनंती करतो की, त्यांनी आज त्यांना आवडलेल्या समूहाला विजेते घोषित करावे. सगळ्या खारुताई स्टेजवर गेल्या. त्यांच्या शेपटीचा तोरा पाहून सगळ्या मुंग्या, मुंगळ्यांनी त्यांना मुजरा केला. खारुताईंनी पाचव्या समूहाला विजेते घोषित केले. त्यावेळी त्या एकमताने बोलल्या, तुम्ही सगळे समूहाने राहता. समूहाने सुख-दुःख वाटून घेता आणि आज समूहात राहून ‘फॅशन शो’ केलात. हे बघून आम्हाला पण ऊर्जा मिळाली… असा ‘फॅशन शो’ आम्हीपण करू. तेव्हा तुम्ही प्रेक्षक म्हणून या आमच्याकडे. सगळ्यांचे अभिनंदन व धन्यवादही.

असा पार पडला आगळा वेगळा ‘फॅशन शो’.. या घनदाट जंगलात एका घोळकेवाडीत असं काही होत असेल याची मात्र कल्पना बाकी पशुप्राण्यांना नव्हती. सगळ्यांनी मिळून एकत्रित काही केलं तर अजून मज्जा येते.

हो ना माझ्या बालदोस्तांनो !!

Share This News

ताज्या बातम्या

Leave a Comment

आमच्या विषयी

Hello Beed मध्ये आपले स्वागत आहे. बीड शहरातील ताज्या बातम्यांचे हे आपले विश्वसनीय ठिकाण आहे. आम्हाला तुमच्यापर्यंत अचूक आणि वेळेवर बातम्या पोहोचवायच्या आहेत. आजच्या वेगवान जगात अद्ययावत राहणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला बीडमधील बातम्या, सरकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती देतो.