Story of Examination in Marathi : परीक्षा गोष्ट.

Story of Examination in Marathi : परीक्षा गोष्ट.

ज्ञानमंदिर शाळा, प्रार्थनेनंतर सगळे विद्यार्थी आपापल्या वर्गात बंदिस्त – ७ वी ‘अ’च्या वर्गात कमालीची शांतता. कारण पहिला तास होता पाठक सरांचा – गणिताचा. त्यांना वर्गात गोंधळ चालायचा नाही. दंगा करणाऱ्या मुलांना ते शिक्षा करायचे. त्यामुळेच सगळी मुले चिडीचूप ! पाठकसर केव्हाही वर्गात येण्याची शक्यता. पण त्या दिवशी वेगळेच घडले. पाठक सरांऐवजी वर्गात आले महाजन सर- मराठीचे. आल्या आल्या ते म्हणाले, ‘पाठकसर आज रजेवर असल्यामुळे मी वर्गावर आलो आहे.’

महाजनसर म्हणजे मज्जा ! मुलांना ते खूप आवडायचे. म्हणून मुलांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले आणि मुलांच्यात दंगा सुरू झाला. ‘सर, हे करूया, ते करूया. अंताक्षरी खेळू या.’

सरांनी टेबलवर डस्टर आपटले आणि म्हणाले, ‘आज आपण गप्पा मारूया!’ मुलांचे चेहरे प्रश्नार्थक. मग सर म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात मोठी एकादशी होती. कुणी कुणी उपास केला?’

वर्गातले बरेचसे हात वर झाले. ज्यांचे हात वर होते त्यांना शाबासकी देऊन सरांनी विचारले, ‘त्या दिवशी काय काय खाल्ले आणि काय काम केले?’ मग बरीच नावे भराभरा सांगितली गेली. खिचडी, वऱ्याचे तांदूळ, दाण्याचे लाडू…

गौरव म्हणाला, ‘मी विठोबाच्या दर्शनाला गेलो होतो.’ सौरभ म्हणाला, ‘आम्ही पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन घेतले.’ आर्यनने विठोबाचे गाणे ‘माझे माहेर पंढरी’ म्हणून दाखवले.

सरांनी सगळ्यांचे ऐकून घेतले. नंतर म्हणाले, ‘मुलांनो, पंढरपूरच्या नावावरून मला एक प्रसंग आठवला!’ ‘सर, सांगा ना मग तो!’ मुले ओरडली.

सर आता तो प्रसंग सांगणार म्हणजे एखादी छान-छोटी गोष्टच असणार. मुलांच्या मनात आले आणि सरांची गोष्ट ऐकण्यासाठी मुले उत्सुक झाली.

सर सांगायला लागले- काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. माझा मुलगा सुशांत त्या वेळी नुकताच शाळेत जायला लागला होता आणि मी तेव्हा पंढरपूरच्या शाळत पाचवी-सहावीला मराठी आणि इतिहास शिकवायचो. एकदा काही कामासाठी मी पुण्याला गेलो होतो. एक दिवसातच परत यायचे होते म्हणून सुशांतही बरोबर होता. त्याला त्याच्या आजोळी सोडले आणि मी माझ्या कामाला गेलो. अपेक्षेपेक्षा काम लवकरच आटोपले. माझ्या मनात आले संध्याकाळची एसटी मिळाली तर रात्रीपर्यंत आपण पंढरपूरला पोहोचू, मग मी घाईघाईने सुशांतला घ्यायला गेलो. निघताना त्याच्या आजोबांनी त्याच्या हातावर पाच रुपयांच्या दोन नोटा ठेवल्या. तिकडे गेल्यावर खाऊ आण, असे म्हणाले. एसटी स्टँडवर आलो तर पंढरपूरची गाडी लागलेलीच होती. बऱ्यापैकी गर्दी होती. आम्ही तिकीट काढले. आत चढताना मी सुशांतला म्हटले, ‘चल, लाल परीत बसू या.’

बसला लाल परी म्हटल्यामुळे सुशांतला जरा गंमत वाटली. तो टाळ्या वाजवत म्हणाला, ‘ही परी आता जादू करणार!’ आम्ही बसण्यचीच लाल परी जणू काही वाट बघत होती. आम्ही बसल्यावर ती लगेच चालू झाली. निरनिराळी गावे मागे पडत होती. लोक उतरत होते-चढत होते. मध्येच कुठेतरी गाडी थांबली, ते एक छोटेसे गाव होते. एसटी स्टैंड रिकामाच होता. फक्त एक म्हाताऱ्या आजीबाई बसची बाट बघत तिथे थांबल्या होत्या. त्यांच्याजवळ त्यांचे गाठोडे होते. त्यात त्यांचे कपडे असावेत. त्यांच्या हातात एक काठी आणि कसलीशी पुरचुंडी होती. जीर्ण साडीचा पदर त्यांनी डोक्यावरून घेतला होता. कपाळावर ठळक कुंकू, गळ्यात मंगळसूत्र.

‘चला आजी’ कंडक्टर त्यांना म्हणाला.

त्या म्हणाल्या, ‘यायचे तर आहेच रे बाबा; पण मला कुठे बसमध्ये चढता येतेय? माझे पाय बघ ना किती कापतायत !’

‘मग मी काय करू?’

‘मला उचलून आत ठेवतोस ? फार उपकार होतील. तुझ्यामुळे विठूरायाचे दर्शन घडेल.’

कंडक्टरने मग दोघांना मदतीला बोलावले. एकाने आजींचे सामान घेतले. दुसऱ्या दोघांनी त्यांना उचलून आत ठेवले. गाडीत आल्यावर अपनी म्हणाल्या, ‘मी आपली खालीच बसते. मला नाही वर बसता येणार!’ आणि त्या खालीच बसल्या.

‘आजी, तुम्हाला पंढरपूरचे तिकीट देतो. निधे कुणी उतरवून घ्यायला येणार आहे का?’

नाही बाबा !’

‘मग तुम्ही जाणार कशा?’

‘जाईन हळूहळू, करेल कुणीतरी मदत. आता तू नाही का केलीस.’

‘हे घ्या तिकीट. तिकिटाचे पैसे देताय ना?’ ‘किती पैसे द्यायचे बाबा?’

कंडक्टरने आकडा सांगितला. आजींनी त्यांच्याजवळची पुरचुंडी उघडली आणि त्या पैसे मोजायला लागल्या. त्यात सुटे पैसे होते. मोजताना त्यांची जास्तच हलायला मान लागली. मग त्या म्हणाल्या, ‘तू म्हणतोयस तेवढे पैसे होत नाहीत. काय करू? मला तर पंढरपूरला जायचेच आहे!’

also read : Story of When the king gets scared…

मग कंडक्टरने सगळ्या प्रवाशांना आवाहन केले. ‘आजींसाठी कोण कोण पैसे द्यायला तयार आहे? सगळ्यांनी मिळून पैसे जमा केले तर आजींना विठोबाचे दर्शन घडेल.’ कंडक्टरचे बोलणे ऐकून प्रवाशांमध्ये थोडी गडबड सुरू झाली. कुणी एक, कुणी दोन, कुणी पाच, असे कंडक्टरकडे पैसे जमा होत होते.’

महाजनसर ‘तो’ प्रसंग सांगण्यात अगदी तल्लीन होऊन गेले होते. सांगता सांगता ते म्हणाले, ‘मुलांनो, तुम्हाला सांगतो – आमच्या सुशांतने खिशात हात घालून त्याला आजोबांनी खाऊसाठी दिलेली पाच रुपयांची नोट त्याने बाहेर काढली आणि म्हणाला, ‘बाबा, हे पैसे मी आजीच्या तिकिटासाठी देतो.’

मी म्हटले, ‘अरे, मी दिलेत दोन रुपये.’ पण त्याने ऐकले नाही. त्याने ते पाच रुपये कंडक्टरच्या हातात ठेवलेच. म्हाताऱ्या आजीबाई त्याच्याकडे टकमक बघत होत्या. ‘सगळ्यांच्या सहकार्याने आजींचे तिकीट निघाले.’ कंडक्टर म्हणाला.

बस चाललीच होती. मी मधून मधून आजींकडे बघत होतो. त्यांना आता झोप यायला लागली होती. मीही डोळे मिटून घेतले. सुशांतही माझ्या मांडीवर झोपून गेला. पंढरपूर आल्यावर एकदम सगळ्यांची उतरण्याची घाई सुरू झाली. मी सुशांतला घेऊन खाली उतरलो. कंडक्टर खालीच उभा होता. आणि मला एकदम त्या आजींची आठवण झाली. मी कंडक्टरला म्हटले, ‘त्या आजींना उतरवायचे असेल ना?’

कंडक्टर म्हणाला, ‘खरंच की! म्हातारी अजून वरच बसलीया’ आणि ती बसच्या पायऱ्या चढून वर गेला. मीही व्याच्या मागोमाग… बघतो तर काय आजी त्यांच्या जागेवर नव्हत्याच! कंडक्टरला आश्चर्यच वाटले, तो म्हणाला, ‘आजीबाईंना धड उभेही राहता येत नव्हते आणि एवढ्या गर्दीतून त्या कशा उतरल्या? त्यांना न्यायलाही कुणी येणार नव्हते. इतक्या झटकन त्या गेल्या तरी कुठे?’

आम्ही असे बोलत असताना एक वेगळाच सुगंध आपल्या अवतीभवती दरवळतोय, असे आम्हाला जाणवत होते. एखाद्या देवळात असतो तसा तो सुगंध होता. नंतर आमच्या असे लक्षात आले की आजीबाई जिथे बसल्या होत्या त्याच जागेवरून तो सुगंध येत होता. आम्ही जरा आश्चर्यचकीत झालो. नंतर आमच्या मनात पुन्हा तोच प्रश्न आजीबाई एवढ्या लवकर गाडीतून खाली उतरून गेल्या कुठे?

तेवढ्यात ड्रायव्हर कंडक्टरला म्हणाला, ‘त्या म्हाताऱ्या आजींबद्दलच बोलताय ना तुम्ही? ज्यांना तुम्ही उचलून गाडीत ठेवलेत?’

‘हो… हो… त्याच आजीबाई!’

‘अहो, त्या तर मला आत्ता आपल्या गाडीपुढून मुख्य देवळाच्या दिशेने जाताना दिसल्या. घाई घाईने झपझप पावले टाकत चालल्या होत्या.’

‘काय सांगताय? चला, आपण बघू या दिसतायत का त्या आजी.’ कंडक्टर म्हणाला आणि आम्ही इकडेतिकडे हिंडून बघितले; पण त्या कुठेच दिसल्या नाहीत.’

महाजन सर इथपर्यंत आले. मग त्यांनी मुलांना विचारले, ‘आता मला सांगा मुलांनो, तुम्हाला काय वाटते? त्या आजीबाई कोण असतील?’

पहिल्या बाकावर बसलेला राजेंद्र म्हणाला, ‘मला वाटते त्या आजीबाई लबाड असतील. त्यांना बसमधल्या प्रवाशांना फसवायचे असेल.’

नंतर प्रथमेश म्हणाला, ‘त्या आजी कदाचित जादूटोणा वगैरे करणाऱ्या असतील. त्यांनी • सगळ्या बसवरच म्हणजे लाल परीवर जादू केली असेल आणि प्रवाशांच्या डोळ्यांवरही त्याच जादूमुळे गुंगी आली असेल. जादूचा प्रभाव कमी होण्याआधी त्या आजी उतरून गेल्या असतील. • उतरताना काहीतरी लंपास केले असेल.’ त्याचे बोलणे चालू असतानाच विराजस म्हणाला, ‘हे सगळे आपण थोडा वेळ बाजूला ठेवू या. पण मला वाटतेय की त्या म्हाताऱ्या आजी म्हणजे विठोबाची रखुमाई असतील.’

गरिबांबद्दल अजूनही लोकांच्या मनात सहानुभूती आहे का हे त्यांना बघायचे असेल. म्हणूनच स्वतःजवळ तिकिटापुरतेसुद्धा पैसे नाही। असे भासवून, बसमधल्या लोकांची त्यांनी परीक्षा घेतली असेल. त्यांच्या भावना त्यांनी दिलेले पैसे लक्षात घेऊन त्यांना मार्क दिले असतील. परीक्षा घेऊन झाल्यावर त्या बसमधून उतरल्या असतील आणि देवळाच्या दिशेने गेल्या असतील. शेवटी रखुमाईची जागा देवळातच ना!’

विराजसचे बोलणे सरांना पटल्यासारखे वाटले. तेवढ्यात खिडकीजवळ बसलेला पंकज घाईघाईने उठला आणि म्हणाला, ‘सर, आत्ता विराजस जे म्हणाला ना रखुमाईने परीक्षा घेतली असेल, ते ऐकून माझ्या आपले मनात आले… तुमच्या सुशांतला रखुमाईने सगळ्यात जास्त मार्क दिले असतील. कारण त्याच्या खाऊच्या पैशातले पैसे त्याने आजींच्या तिकिटासाठी दिले ना!’

ते ऐकून सरांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. ते म्हणाले, ‘छान! गरिबांना मदत करण्याची शिकवण या प्रसंगाने तुम्हाला दिली. आणखी एक म्हणजे एकाच प्रसंगाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसे बघता येते, हेही आज तुम्हाला कळले. राजेंद्र, प्रथमेश, विराजस या घटनेकडे बघण्याचा या प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा होता.’

सर असे बोलत असतानाच तास संपल्याची घंटा झाली.

Leave a Comment