Story of Greta Thunberg in Marathi : ग्रेटा थनबर्ग
ग्रेटा थनबर्ग, १६ वर्षांची एक स्वीडिश मुलगी. गेले काही महिने बातम्यांमधून तिचं नाव सतत ऐकायला येतं आहे. काय केलंय तिने ? लहान वयात खेळातला एखादा विक्रम ? किंवा अभ्यासातला काही पराक्रम? नाही, तिने जे केलंय ते याहून खूप वेगळं आहे. तिने जागतिक तापमानवाढ, प्रदूषणाचे दुष्परिणाम याच्या विरोधात आवाज उठवला आहे.
ग्रेटा आठ वर्षांची असताना तिने तिच्या शाळेच्या शिक्षकांकडून ऐकलं, की माणूस खूप इंधन वापरत सुटला आहे; पेट्रोल, लाकूड, कोळसा, गॅस सगळ्याचाच वापर अति वाढला आहे.; त्यामुळे प्रदूषणही खूप वाढलं आहे; आपणच आपल्या पर्यावरणाचं नुकसान करत निघालो आहोत. हे चुकीचं आहे, इंधनाचा वापर कमी करायला हवा, असं शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून सांगत आहेत; ते कसं करायचं यावरचे काही उपायही त्यांनी सुचवले आहेत.
ते ऐकल्यावर ग्रेटाला प्रश्न पडला, की शास्त्रज्ञांनी उपाय सुचवलेले असूनही आपण ते वापरत का नाही? मग तिने या विषयाबद्दल आणखी वाचायला सुरुवात केली, तसं तिला कळलं, की पृथ्वीच्या पोटातील इंधन (पेट्रोल, डीझेल इ.) उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे, संपत चाललं आहे. इंधनाच्या बेसुमार वापराने प्रदूषण, तापमान वाढत आहे. याबद्दल शास्त्रीय उपाय म्हणून उर्जा बचतीबाबत परिषदा, चर्चा, करारही होतात. पण पुढे काहीच होत नाही. इंधन कमी वापरलं जावं यासाठीचे प्रत्यक्ष नियम करावेत असं कुठल्याच देशाला वाटत नाही; ऊर्जेची बचत करावी असं कुणाच्याच वागण्यातून दिसत नाही.
असं का, हा प्रश्न ग्रेटाला सतत त्रास द्यायला लागला. असंच सुरू राहिलं तर पृथ्वीचं पुढे काय होईल, आपल्यानंतर जन्माला येणारी माणसं कशी जगतील, याची तिला चिंता वाटायला लागली; इतकी, की अकराव्या वर्षी ती चक्क आजारी पडली; तिचं बोलणं कमी झालं; खाणं-पिणं कमी झालं; दोन महिन्यांत तिचं दहा किलो वजन कमी झालं. ती फार पुढचा विचार करत होती- अरे, पुढली पिढी आम्हाला विचारेल की तुम्ही आमच्यासाठी, हे पर्यावरण चांगलं राखण्यासाठी काहीच का केलं नाही? तर काय उत्तर देणार आपण? आताच्या चुका पुढे भविष्यात कशा सुधारता येतील ?
गेल्या वर्षी तिने ठरवलं, आता बस्स! आता आपली ही चिंता बोलून दाखवायलाच हवी. तिने काय केलं ? तर, आधी आपल्या आई-वडिलांना आपल्या सवयी बदलायला लावल्या. आणि गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तिने थेट स्वीडनच्या संसदेच्या बाहेर बसून एकटीने हरताळ सुरू केला. ऑगस्टमध्ये शाळा सुरू झाल्यावरही तिने दर शुक्रवारी ‘पर्यावरणासाठी शाळा बंद’ अशी मोहीम सुरू केली. सुरुवातीला तिच्याकडे कुणीच फारसं लक्ष दिलं नाही. तिला पाहणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं, तिने शिकावं, मोठं व्हावं आणि पर्यावरणरक्षणाचे उपाय शोधावेत. पण याआधी शोधलेले उपाय पुरेसे आहेत, त्याचा वापर करा, हेच तर ती सांगत होती. नक्की काय आहेत हे उपाय? तर, मांसाहार कमी करणं; विमानं खूप इंधन पितात, म्हणून विमानप्रवास कमी करणं; प्लास्टिकचा वापर बंद करणं; प्रदूषण कमी करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सगळं करणं.
also read : Story of Follow The Lizard On The Forest Path in Marathi
हळूहळू वर्तमानपत्रं, बातम्यांची टीव्ही चॅनल्स यांनी ग्रेटाबद्दलच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. तिच्या का मोहिमेबद्दल इतर देशांतल्या मुलांना समजलं, बघता बघता १६९ देशांतील ३५ लाखांहून अधिक मुलामुलींनी पर्यावरण वाचवा’ या मागणीसाठी दर शुक्रवारी शाळेत जा बंद केले आहे. त्या दिवशी मुलं आपापल्या देशात, आपापल्या गावांमध्ये एकत्र जमतात, पर्यावरण रक्षणाबद्दल चर्चा करतात; आपापल्या देशांतील संसदेपुढे शांतपणे मोर्चे काढतात.
जगभरात ग्रेटाचं कौतुक झालं. अनेकांनी तिला भविष्यात होणारा विनाश दाखवणारी मुलगी अशी नावही ठेवली. पण ती म्हणते, प्रदूषणाने भविष्यात होणारं भयंकर नुकसान तिने नव्हे, तर वैज्ञानिकांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे; आपण आता त्याप्रमाणे बागायला सुरुवात करायला हवी आहे. कुणाला बाटेल, मी एकट्याने तसं करून काय उपयोग? त्यावर ती म्हणते, तिच्यासारख्या मुलीचं म्हणणं इतक्या जण्णांनी ऐकलं, तर सर्वांनी अशी मागणी केली तर नक्की बदल होईल.
गेल्या वर्षी एकटी, खिन्न असलेली ग्रेटा आता जगभरात अनेक ठिकाणच्या सभांमध्ये आपलं म्हणणं मांडायला लागली आहे. यंदा ऑगस्टमध्ये ती अमेरिकेतल्या पर्यावरण बदल परिषदेलाही जाऊन आली. तो प्रवास तिने विमानाने किंवा मोठ्या जहाजाने केला नाही, तर पर्यावरणस्नेही छोट्या बोटीने केला. त्या प्रवासाला तिला १५ दिवस लागले. तिच्या पालकांनी आता विमानप्रवास, मांसाहार सोडला आहे; आपल्या गरजा कमी केल्या आहेत. तिची आणि तिला पाठिंबा देणाऱ्या मुलामुलींची मागणी एकच आहे- प्लास्टिक वापर, कोळसा वापर, इंधन वापर कमी करा ! या मुलांना त्यांचे पालक, शिक्षक सगळेजणच पाठिंबा देत आहेत. त्या सर्वांचं काम आत्ता कुठे सुरू झालं आहे. मनात आणलं तर शाळेत जाणारी एक मुलगीही खूप मोठं काम करू शकते हेच ग्रेटाने दाखवून दिलं आहे. आपण तिचं कौतुक तर करूयाच; पण ती सांगते आहे, तसं प्रदूषण कमी करण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते सुद्धा करूया.