Story on Language of Friendship in Marathi : दोस्तीची भाषा गोष्ट.
रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी होती. सकाळीच मित्र घरी आला. म्हणाला, “कंटाळा आलाय. चल फिरायला.” म्हटलं, “चल.”
पायांत चपला सरकवल्या नि निघालो. म्हटलं, “कुठे जाऊ यात?” मित्र म्हणाला, “मला कुठे माहिताय ? भटकू यात इकडे-तिकडे. टाइमपास करू. कंटाळा गेला की परतू घरी.”
मित्राचा प्लॅन अगदीच कंटाळवाणा होता. त्याला म्हटलं, “तू भलताच बोअर आहेस. काही तरी आयडिया काढ कंटाळा घालवण्याची. कुठे तरी जाऊ यात, कुणाशी तरी बोलू यात. मजा येईल असं काही तरी करू यात.”
त्याला काही सुचेना. बराच वेळ तो इकडे-तिकडे बघत बसला. मग मध्येच काही तरी आठवल्यासारखा ताठ बसला नि म्हणाला, “चल माझ्या एका मित्राकडे. तुझी-त्याची ओळख नाही. त्याच्याकडे जाऊन गप्पा मारू.”
मी म्हटलं, “ठीक.”
मित्राच्या मित्राचं घर जवळच होतं. धडकलो. मित्राचा मित्र गॅलरीत वाचत बसलेला होता. अगदी मन लावून. एकाग्रचित्ताने. पुतळ्यासारखा.
मित्र म्हणाला, “हाच तो.”
मी म्हटलं, “हाक मार ना मग. बोलाव त्याला.”
मित्र म्हणाला, “तू थांब इथे. मी घेऊन येतो त्याला.” मला काही कळेना. हाक मारली असती किंवा शिट्टी मारली असती तरी त्याचं लक्ष वेधून घेता आलं असतं. मी म्हटलंही मित्राला. ‘थांब’ अशी हातानेच खूण केली त्याने आणि तो गेला त्याच्या घरी.
दोनच मिनिटांत दोघं बाहेर आले. एकमेकांच्या गळ्यात हात घालून दोघं हसत हसत येत होते.
माझ्या जवळ आल्यावर मित्राने आमची ओळख करून दिली. आम्ही हातात हात मिळवले. मंदसे हसलो.
मित्राचा मित्र मनाने उमदा असावा असं वाटलं. हसरा चेहरा. बोलका. केसाचा भांग नीट पाडलेला, तेल वगैरे लावून. कपडेही टापटीप. त्याला पाहिल्यावर प्रसन्न वाटलं.
त्याला म्हटलं, “आपल्या घरांतलं अंतर काही खूप नाही. जवळच राहतो तसं म्हटलं तर, पण कधी भेटलो नाही आपण. कुठे बघितल्यासारखंही वाटत नाही.”
तो काही बोलायच्या आतच मित्र म्हणाला, “तो इथे नव्याने आलाय. त्याच्या वडिलांची इथे बदली झाली, म्हणून हल्लीच ते इकडे आलेत राहायला.”
तो ‘हो हो’ अशी मान हलवत होता, मंदसं हसत होता. मग मी त्याला आणखी काय काय विचारू लागलो… कुठल्या शाळेत आहेस ? कितवीत आहेस ? आधी कुठल्या गावात राहत होतास?
तो काही बोलायच्या आधीच माझा मित्र मध्ये तोंड घालायचा आणि उत्तरं द्यायचा. मित्राचा मित्र ‘हो हो’ अशी मान हलवायचा.
मित्राला म्हटलं, “तू गप बैस. आम्हाला बोलू देत. तू नको मध्ये तोंड घालू.”
मित्र म्हणाला, “अरे यड्या, तो बोलू शकत नाही. ऐकूही शकत नाही.”
मी गपकन शांत बसलो. कुणी तरी कानफटीत मारल्यासारखं वाटलं. मला याची कल्पनाच नव्हती. मी गोंधळून गेलो. काय करावं कळेना.
मी त्याच्याकडे पाहिलं, तर तो मंदसं हसत माझ्याकडे पाहत होता. त्याने स्वतःच्या ओठ आणि कानांवर बोट ठेवून मग हातानेच तसं खुणावलं.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने सहज जवळ घेतलं.
मला प्रश्न पडला की आता याच्याशी बोलायचं कसं ? मित्राला माझी अडचण कळली असावी. तो म्हणाला, “तू बोल त्याच्याशी. त्याला कळतं आपण काय बोलतो ते. मी बोलतो ते तरी कळतं. हळूहळू जमतं.”
तो पुढे म्हणाला, ‘तो काय सांगू पाहतोय ते आपल्याला सुरुवातीला ” कळत नाही, पण तेही जमतं हळूहळू.” मी हादरून गेलो होतो. काय करावं, * कसं बोलावं, काय बोलावं काहीच कळत नव्हतं; पण ते दोघं एकमेकांशी आपापल्या भाषेत बोलत होते, हसत होते, टाळ्या देत होते.
also read : The Old Fairy and The Princess in Marathi
मग आम्ही थोड्या वेळाने निघालो. खाणाखुणा करून मी त्याचा निरोप घेतला. मी नि मित्र आपापल्या घरी गेलो.
पुढे कित्येक दिवस मित्राच्या मित्राची ओळख झाल्याचा प्रसंग मनात उलगडून जायचा. अस्वस्थ वाटायचं.
एक दिवस मित्राला म्हटलं, “चल, तुझ्या मित्राकडे जाऊ या ना. मला तो मुलगा आवडलाय. त्याच्याशी दोस्ती होईल असं वाटतंय.”
मित्र म्हणाला, “चल.”
त्याच्या घरी गेलो. माझ्याकडे पाहून तो ओळखीचं हसला आणि खाणाखुणा करून काही सांगू लागला. बोलताना त्याच्या तोंडून ‘ऊं ऊं… आ आ’ एवढेच तुटक आवाज निघत होते. त्यातून तो काय सांगू पाहतोय हे कळत नव्हतं. त्याचे बोलके डोळे आणि चेहऱ्यावरील हावभाव यावरून थोडा अंदाज यायचा. डोळे विस्फारले की एक अर्थ, डोळे बारीक करून चेहरा नकारार्थी हलवला की दुसरा अर्थ, हसून मान सकारार्थी हलवली की तिसरा अर्थ, ओठ मुडपून नजर तिरपी फिरवली की चौथा अर्थ. त्याच्या चेहऱ्याकडे आणि हातवाऱ्यांकडे पाहून मी अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होतो; पण तो इतक्या वेगाने साऱ्या हालचाली करत होता, की तो बराच पुढे जाई आणि मी आधीच्या हालचालींचाच अर्थ लावण्यात गुंतल्याने मागे पडे. माझा मित्र मात्र त्याच्या वेगाच्या जवळपास असे आणि त्यामुळे त्यांच्यात संवाद होत असे.
या भेटीत मला एवढं कळलं, की त्याला बोलता- ऐकता येत नसलं तरी आज ना उद्या त्याच्याशी आपण बोलू शकू, त्याचं सांगणं आपण समजून घेऊ शकू.
मग मी जमेल तसा त्याच्याकडे जाऊ लागलो. मी गेलो की तो उत्साहाने माझ्याशी बोलू लागे, काही सांगू लागे. मला त्यातलं काही कळे, काही नाही. त्याला माझं बोलणं किती कळत होतं ते त्यालाच माहीत.
पण जसजशा भेटी वाढत गेल्या तसतसं आम्हाला एकमेकांचं बरंचसं कळू लागलं. त्याच्याशी बोलताना सुरुवातीला बरीच ओढाताण होत असे. पुढे ती कमी होत गेली. त्याच्याशी बोलताना हळूहळू माझे हातवारे वाढत गेले आणि बोलणं कमी होत गेलं. कधी कधी तर तोंडातून अवाक्षर न काढता नुसत्या हातवाऱ्यांनी मी त्याच्याशी बोलू लागलो. नकळत अनेकदा माझ्याही तोंडून फक्त ‘ऊंऊं… आआ’ असे तुटक आवाज निघत.
असे आम्ही तासन्तास गप्पा मारू लागलो, मिळून खेळू लागलो. पत्त्यांपासून क्रिकेटपर्यंत काहीही खेळण्यात आम्हाला अडचण येत नव्हती. पाहता पाहता आम्ही मित्रच बनलो.
एक दिवस आम्ही असेच हसत खिदळत असताना त्याची आई तिथे आली. ती म्हणाली, “काय हसाहशी चाललीय मघापासून? मजा करताय दोघंजण?” मी हसलो. त्याची आई म्हणाली, “नेहमी येतो इकडे तर तुझ्या आईलाही घेऊन ये की आमच्या घरी.” मी म्हटलं, “घेऊन येईन की.”
मित्र खाणाखुणांनी त्याच्या आईला म्हणाला, “आपणच जाऊ यात त्याच्याकडे. मी याचं घर बघितलेलं नाही.”
त्याच्या आईचा निरोप मी माझ्या आईला दिला. ती म्हणाली, “येऊ देत की त्यांना.”
मग ठरवाठरवी झाली आणि मित्र नि त्याची आई आमच्या घरी आले. आम्हा दोघांच्या आया आतल्या खोलीत गेल्या नि आम्ही बाहेरच्या खोलीत बसलो. मित्र पहिल्यांदाच घरी आलेला असल्याने घर बघत होता. घरातल्या वस्तू बघत होता. बारकाईने गोष्टी टिपत होता.
आतल्या खोलीतल्या गप्पा ऐकू येत नव्हत्या, पण अचानक माझ्या आईचं आश्चर्याचं बोलणं मला ऐकू आलं. आई म्हणत होती, “काय सांगता? तुमच्या मुलाला बोलता-ऐकता येत नाही? मग हे दोघं तासनतास एकत्र काय करत असतात?”
त्याची आई सांगत होती, “त्याला हा मित्र मिळाल्यापासून तो अगदी खूष आहे. आधी घराबाहेर पडायला तयार नसायचा. सारखं पुस्तकात डोकं खुपसून बसायचा. आता दोघं गप्पा मारतात, खेळतात, फिरायला जातात. परवा तर म्हणत होते, तीन मित्र मिळून सर्कस बघायलाही जाणार आहेत.’
मित्राशी खेळता-बोलता माझा एक कान आतल्या खोलीत होता. आत काय बोलणं चाललंय याबद्दल मला कुतूहल वाटत होतं. मी डोकावून पाहिलं ते आईच्या लक्षात आलं. माझ्याकडे पाहत ती मित्राच्या आईला अगदी हळू आवाजात म्हणाली, “तुम्हाला म्हणून सांगते, पण गेल्या काही दिवसांपासून… महिन्यापासून म्हणा, आमचं हे लेकरू घरात अगदी कमी बोलायला लागलं होतं. काही विचारलं तर खाणाखुणांनी नि हातवाऱ्यांनीच उत्तरं. अगदीच जड झालं तर तोंडातून शब्द निघणार ! मला आधी वाटलं, की याचं कुठे बिनसलं की काय? मग वाटलं, नवं काही तरी खूळ घेऊन बसलेलं दिसतंय आमचं ध्यान ! पण हे तर भलतंच निघालं.”
आई माझ्याबद्दल जे सांगत होती ते तर माझ्याही लक्षात आलेलं नव्हतं. कारण आपण कमी बोलतोय आणि खाणाखुणांनीच व्यक्त होतोय हे आपोआप घडून गेलेलं होतं.
मग आणखी एक गोष्ट चमकून गेली.
दोस्ती होण्यासाठी बोलता येण्याची गरज नसते. ऐकू येण्याचीही गरज नसते. आमची दोस्ती बोलण्या- ऐकण्यापलीकडची होती. आम्हा दोघांना कळेल अशी बिनबोलण्या-ऐकण्याची भाषा आम्ही शोधून काढली होती – दोस्तीची भाषा!
Leave a Comment