Story of Gold Cage in Marathi : सोन्याचा पिंजरा गोष्ट
एका शहरात कापडाचा एक व्यापारी होता. त्याचे नाव दीपचंदशेटजी होते. आजूबाजूच्या गावांतील लोक त्यांच्या दुकानात कापड खरेदीसाठी येत असत. दीपचंदशेटजी कधी कधी आपल्या ग्राहकांना कापड उधारसुद्धा देत असत. त्यामुळे दीपचंदशेटजींना आजूबाजूच्या गावांत उधारी वसूल करण्यासाठी जावे लागत असे.
एकदा दीपचंदशेटजी एका गावात उधारी वसूल करण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना शेटजी जंगलामध्ये एका झाडाखाली आराम करण्यासाठी बसले आणि थोड्याच वेळात त्यांना झोप लागली. जेव्हा ते झोपेतून जागे झाले, तेव्हा त्यांना त्यांच्या आजूबाजूला पोपटांचा थवा दिसला. हिरवागार रंग, लालचुटुक चोच आणि गळ्यावरती काळी पट्टी असलेले ते सारे पोपट पाहून शेटजींना वाटले, “किती सुंदर आहेत हे पोपट ! एक-दोन पोपट बरोबर घेऊन गेलो आणि ते पाळले तर मजा येईल. घरातील सर्वांना ते खूपच आवडेल.” असा विचार करून शेटजींनी आपल्या पंचाने एका पोपटाला पकडले. त्या पोपटाला शेटजी आपल्या घरी घेऊन गेले.
दीपचंदशेटजींनी घरी गेल्यावर त्या पोपटासाठी सोन्याचा एक सुंदर पिंजरा तयार करून घेतला. त्या पिंजऱ्यात पोपटासाठी एक बैठक आणि एक झोका ठेवला. पाणी पिण्यासाठी एक वाटी आणि खाण्यासाठी एक छोटीशी ताटलीसुद्धा ठेवली. पोपट सोन्याच्या पिंजऱ्यात राहू लागला. त्याला पेरू, मिरच्या अशा मनपसंत वस्तू खाण्यासाठी मिळू लागल्या. घरातली मुले, तसेच दीपचंद- शेटजीसुद्धा पोपटाशी गप्पा मारत. पोपट थोडे थोडे बोलायलासुद्धा शिकला. सर्वांना खूप आनंद झाला.
दुसऱ्या वेळी जेव्हा दीपचंदशेटजी उधारी वसूल करण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांनी पोपटाला विचारले, “पोपटराव, मी उधारी वसूल करण्यासाठी जातोय्. परत येताना मी तुझ्या आईवडलांना आणि सग्यासोयऱ्यांना भेटेन. तुला त्यांच्यासाठी काही निरोप पाठवायचा असेल तर सांग !”
पोपट म्हणाला, “शेटजी, त्या सर्वांना सांगा –
“पोपट भुकेलेला नाही, पोपट तहानलेला नाही.
पोपट सोन्याच्या पिंजऱ्यात मजा करत आहे.”
दीपचंदशेटजी उधारी वसूल करून परत येताना त्याच झाडाखाली आराम करण्यासाठी थांबले. तेव्हा पोपटांचा एक थवा त्यांच्यावर तुटून पडला. ते पोपट त्यांना चोची मारू लागले. त्या थव्यातील एका पोपटाने दीपचंदशेटजींना विचारले, “शेटजी, आमचा पोपट काय करत आहे ?”
also read : Story of flute player in Marathi
दीपचंदशेटजी त्यांना शांत करत म्हणाले –
“पोपट भुकेलेला नाही, पोपट तहानलेला नाही.
पोपट सोन्याच्या पिंजऱ्यात मजा करत आहे.”
हे ऐकून सर्व पोपट काही न बोलताच मेल्यासारखे जमिनीवर कोसळले. दीपचंदशेटजी त्यांच्याजवळ गेले. त्यांनी पोपटांना हलवून पाहिले; पण जणू काही सर्व पोपट धक्क्याने मरण पावले आहेत असेच वाटत होते.
दीपचंदशेटजी घरी परत आले. शेटजींना पाहताच पोपटाने आपल्या आईवडलांची तसेच सग्यासोयऱ्यांची चौकशी केली.
दीपचंदशेटजी म्हणाले, “पोपटराव, तुझ्या आईवडलांना आणि सग्यासोयऱ्यांना जेव्हा मी तुझा निरोप सांगितला, तेव्हा ते सर्व खाली कोसळले. त्यांना धक्का बसला असेल काय ?”
पोपटाने काहीही उत्तर दिले नाही. शेटजीचीं गोष्ट ऐकून तो पोपट स्वतः सुद्धा पिंजऱ्यामध्ये झोक्यावरून खाली कोसळला. शेटजींनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि पोपटाला हलवून पाहिले. हा पोपटसुद्धा धक्का बसून मरण पावला, असेच शेटजींना वाटले. शेटजींनी पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढले आणि थोड्या अंतरावर नेऊन ठेवले. संधी पाहून पोपट पंख फडफडवत उडून गेला.
जाता जाता तो म्हणाला, “शेटजी, मी आपला आभारी आहे. मला माझ्या आईवडलांचा निरोप मिळाला आहे. मी त्यांना भेटायला जात आहे. तुमचा पिंजरा सोन्याचा होता, पण तो शेवटी पिंजराच होता. माझ्यासाठी तो कैदखानाच होता.”
पोपट उडत उडत जंगलामध्ये आपल्या आईवडलांकडे आणि सग्यासोयऱ्यांकडे पोचला. त्याला परत आलेले पाहून सर्वजण खुश झाले.
आता तो पोपट जंगलामध्ये सर्व पोपटांबरोबर मुक्त वातावरणात स्वच्छंदपणे बागडू लागला.