Story of Ground Sports in Marathi : मैदानी खेळ कथा
मुलांनो, तुमच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या असतील. आता दिवसभर दंगामस्ती, इकडेतिकडे फिरणं, टीव्हीवर कार्टून, वाचायला पुस्तकं आणि गेम्स खेळायला मोबाईल. खायला बर्फाचा गोळा, आइस्क्रीम, प्यायला सरबतं, माठातलं गारेगार पाणी म्हणजे सगळी गंमतच. या सगळ्या गमतीत एक गोष्ट मात्र विसरू नका ती म्हणजे ‘मैदानी खेळ’. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल यांच्या जोडीला आता कबड्डी, लगोरी, कुस्ती, खो-खो, लंगडी या खेळांचा पण आनंद लुटा.
आता तुम्ही म्हणाल ‘एवढ्या उन्हात घरी बसायला सांगायचं सोडून हा दादा बाहेर खेळायला जायला का सांगतोय?’ तर त्याचं कारण असं आहे की या मैदानी खेळांचे खूप फायदे आहेत. आता तुम्हांला परत प्रश्न पडला असेल ‘की याचे काय फायदे असणार?’ तर मुलांनो मैदानी खेळ खेळल्याने आपण तंदुरुस्त आजच्या भाषेत ‘फीट अँड फाईन’ राहतो. ऑपल्या शरीराचा भरपूर व्यायाम होतो. आपलं बजन ताब्यात राहतं. तुम्ही खेळायला जाल तिथे तुम्हांला आणखी नवे मित्रमैत्रिणी भेटतील. तुम्ही तुमची सुट्टी तुमच्या मित्रांसोबत मजा करत घालवू शकता. ‘मला बोर होतंय, मी काय करू?’ हा प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटेल.
जसं बुद्धिबळ खेळल्याने आपली एकाग्रता वाढते तसंच मैदानी खेळ खेळल्याने आपली ताकद आणि आपला स्टॅमिनाही वाढतो. आता तुम्ही आजूबाजूला अनेक खेळाडू बघत असाल. कोणी क्रिकेटर असेल, कुणी फुटबॉलपटू, एखादा कुस्तीपटू असेल तर एखादी टेनिस प्लेअर. त्यातले तुमचे आवडते खेळाडू काढले तर त्यांची किती मोठी लिस्ट होईल ना? या सगळ्या स्टार प्लेअर्समध्ये एक गोष्ट मात्र सारखी असेल ती म्हणजे या सगळ्यांना लहान वयापासूनच खेळाची फार आवड होती. ती आवड त्यांनी जपली आणि आता सगळं जग त्यांना ओळखतं.
तुम्हांला सचिन तेंडुलकरचा एक किस्सा सांगतो. सचिन लहान असताना तुमच्या माझ्यासारखाच फार मस्तीखोर होता. आपल्यासारखाच तो दिवसभर मित्रांसोबत दंगा करायचा, कैऱ्या पाडायचा आणि भरपूर खेळायचा. खेळताना कुणाची काच फुटायची तर कुणाची झोप मोडायची. मग संध्याकाळी सगळे जण तक्रारी घेऊन सचिनच्या घरी! सचिनचा मोठा भाऊं अजित क्रिकेट खेळायला आणि शिकायला जायचा त्याला वाटलं आपल्या लहान भावामध्ये इतकी एनर्जी आहे तर तिचा योग्य वापर झाला पाहिजे. आणि मग सचिनसुद्धा त्याच्या अजितदादासोबत आचरेकर सरांकडे क्रिकेट खेळायला जाऊ लागला. त्यावेळी सचिनचं वय होतं फक्त ११ वर्ष. एवढ्या लहान वयापासून मेहनत घेणारा सचिन आता ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जातो. आता मला सांगा, जर सचिन मैदानावर गेलाच नसता, घरातच काहीतरी खेळत किंवा टीव्ही बघत बसला असता तर? आपल्याला हा क्रिकेटचा सुपरस्टार मिळालाच नसता.
Also Read : Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024
तुमच्यातसुद्धा फार एनर्जी आहे. मग ती घरात टीव्ही बघत, फोनवर गेम्स खेळत वाया घालवण्यात काही अर्थ नाही. अनेक मैदानी खेळ तुम्ही मित्रमैत्रिणी सहज खेळू शकता आणि आता कित्येक खेळांचे प्रशिक्षण वर्ग (क्लासेस) सुद्धा आहेत. तुम्ही सगळे अभ्यासात फार हुशार आहातच. आता या सुट्टीत खेळातही हुशार व्हा. खेळात कुठला नंबर मिळाला नाही तरी हरकत नाही कारण तंदुरुस्ती आणि आनंदाचे एक्स्ट्रा मार्क्स नक्की मिळतात. आता एवढं सांगितलं आहेच तर काही मातीतल्या खेळांची माहिती आणि त्यांचे फायदेही सांगतो.
१. कबड्डी : ७ जणांच्या दोन संघांनी (टीम्स) खेळायचा हा खेळ तुम्ही माती आणि मॅट दोन्हीकडे खेळू शकता. तुमच्या श्वासावर नियंत्रण आणण्यात, तुमची चपळता वाढवण्यात ह्या खेळाची फार मदत होते. तुम्ही सगळे जण टीव्हीवर ‘प्रो कबड्डी’ बघत असालच. आत्ता छान खेळलात आणि या खेळात प्रगती केलीत तर येणाऱ्या काळात आम्ही सगळे तुम्हांला टीव्हीवर नक्की बघू.
२. कुस्ती : अस्सल मातीतला हा रांगडा खेळ आता मॅटवरपण खेळला जातो. मुलांच्या जोडीला आता मुलीही या खेळात पुढे जात आहेत. तुम्ही दंगल चित्रपटात हे बघितलंच. कुस्तीमुळे तुमची शारीरिक क्षमता वाढते आणि एकदा झालेली ही तब्येत तुम्हांला आयुष्यभर निरोगी राहण्यास मदत करते.
३. खो-खो आणि ॲथलेटिक्स : तुम्ही फार जोरात धावत असाल, लांब किंवा उंच उडी मारू शकत असाल तर ह्या खेळाचे तुम्ही सुपरस्टार आहात. तुमचा फिटनेस, चपळता, एकाग्रता आणि ताकद या सगळ्याच गोष्टी या खेळांनी वाढतील.
असे कित्येक मैदानी खेळ तुम्ही या सुट्टीत खेळू शकता. याचा कंटाळा आलाच तर नवीन खेळ मोबाईलवरच्या ‘गुगल’वर शोधायच्या आधी ‘आजी- आजोबा’ नावाच्या गुगलला नक्की विचारा. त्यांच्या पोतडीत मैदानी खेळांची फाईल फार आधीपासून सेव्ह आहे.
चला तर मग पटकन ठरवा या सुट्टीत तुम्ही कोणकोणते खेळ खेळणार आहात आणि तयारीला लागा. वाचन, खाणं, भटकणं यासोबतच नवनवीन खेळ खेळा आणि मजा करा. या खेळांमध्ये तुमचं करिअरसुद्धा होऊ शकतं बरं का.. काय मग तुम्हीसुद्धा मोठं होऊन ‘स्टार प्लेअर’ होणार ना?